आठवणीतील गुरू...
गुरुपौर्णिमेनिमित्त हेमलता-चव्हाण-नवले यांनी निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील त्यांच्या शिक्षिका विमल नारायण फडतरे यांच्यावर लेख लिहीलेला लेख...गुरुपौर्णिमेनिमित्त हेमलता-चव्हाण-नवले यांनी निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील त्यांच्या शिक्षिका विमल नारायण फडतरे यांच्यावर लेख लिहीलेला लेख...
प्रथमत: माझ्या सर्व गुरूजनांना आणि बंधूभगिनींना माझा प्रेमपूर्वक सादर प्रणाम!🙏🏻🙏🏻🙏🏻आणि गुरूपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छाही! 💐💐💐
प्रत्येकाच्याच आयुष्यात गुरू हा फार महत्त्वाचा असतो. आपल्या संपूर्ण शालेय जीवनात आपल्याला अनेक गुरु भेटतात. पण, त्यातील काहीच आपल्या मनावर कायमचे अधिराज्य गाजवतात. आपण त्यांना कधीच विसरू शकत नाही. तसेच माझ्याही आयुष्यात मला असे काही शिक्षक भेटले की ते आजही माझ्या स्मरणात आहेत. त्यांच्याबद्दल मी आज लिहिणार आहे .
आयुष्यात मागे वळून पाहताना मला सर्वात आधी आठवतात त्या माझ्या बालवाडीच्या फडतरे बाई. पूर्ण नाव विमल नारायण फडतरे ! उंचपुर्या, लांब काळेभोर केस, गव्हाळ वर्ण, सहावारी साडी, साधी पण नीटनेटकी राहणी. चेहऱ्यावर सतत हास्य असणाऱ्या या माझ्या बाई. हो, मला बाईच म्हणायला आवडतं! मॅडम शब्द मला कसातरीच वाटतो. बाई म्हणजे बाप आणि आई यांचे मिश्रण! बापाचा धाक आणि कठोरता तसेच आईची माया, ममता आपल्याला एकाच वेळी या व्यक्तीमध्ये पाहायला मिळते, म्हणून मला बाई हा शब्द अधिक आवडतो. असो!
मी साधारण साडेचार-पाच वर्षाची असेल तेव्हा मला या फडतरे बाई शिकवायला होत्या. आमच्या घरापासून बालवाडी जेमतेम २००-२५० मीटर अंतरावर असेल. एका ब्राह्मणाच्या वाड्यातील मोठ्या खोलीत आमचा वर्ग भरायचा. पंचवीस-तीस मुले-मुली असतील वर्गात. शाळा भरली की बाई राष्ट्रगीत, प्रार्थना म्हणायच्या. आम्ही त्यांच्या मागे म्हणायचो. मग बाई आम्हाला गाणी-गोष्टी, एबीसीडी, मुळाक्षरं हे सगळं तोंडी शिकवायच्या. तेव्हा आत्ताच्या सारखे पाटी-पेन्सिल वह्या-पुस्तकं नव्हतं! बाई सगळं मुखोद्गत करून घ्यायच्या. घरचा अभ्यास नाही, काही नाही त्यामुळे शाळा म्हणजे मज्जा असायची ! अशा शाळेत जायला आम्ही कधी कंटाळा केला नाही. नंतर जेवणाची सुट्टी झाली की प्रत्येकाने डबा आणला आहे का? हे बाई पहायच्या. वदनी कवळ म्हणून आम्ही जेवायला बसायचो. कधीकधी बाई आमच्यासाठी एखादा पदार्थ बनवून आणायच्या.
असाच एकदा बाईंनी गोड शिरा आमच्या साठी बनवून आणला. आम्ही गोल करून जेवायला बसलो. बाईंनी आम्हाला सर्वांना शिरा वाटला आणि शिल्लक राहिलेला शिरा आमच्या वर्गातील भोला नावाच्या मुलाला दिला. मी बाईंना म्हणाले, बाई भोलाला दोनदा आणि आम्हाला? बाईंनी माझ्याकडे पाहिलं, जवळ आल्या आणि म्हणाल्या, अगं छोटू, तुम्ही सर्वजण नेहमी काहीना काही खाऊ आणता, भोलाच्या डब्यात असा खाऊ कधीच नसतो म्हणून त्याला दिला! किती लक्ष असायचं बाईंचं प्रत्येकाकडे! भोलाच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. आई मोलमजुरी करून घर चालवायची हे आम्हाला नंतर समजले, पण आमच्या फडतरे बाईंना प्रत्येक मुलाची कुंडली माहीत होती!
ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावी
ही कविता बाई जगत होत्या आणि नकळत आम्हालाही जगायला शिकवत होत्या!
एकदा बाईंच्या मिस्टरांच्या ओळखीचे काही पाहुणे पुण्याहून आमची शाळा पाहायला आले. त्यामध्ये एक खूप गोरा इंग्रज माणूस होता. त्याचे नाव 'जो' (उच्चार तालव्य-ज्यो). ते सर्व पाहुणे आमच्या वर्गात आले, आमच्याशी गप्पा मारल्या. आम्ही गाणी गोष्टी म्हटली. त्या गो-या साहेबांबरोबर आमचे फोटो काढले. आम्हाला खूप भारी वाटलं ! असं सगळं काही हसत-खेळत चाललं होतं.
असंच एकदा बाईंनी आमची सहल काढायची ठरवली ती पण पुण्याला !सर्कस पाहायला! बाईंचे शिक्षण पुण्यात झाल्यामुळे त्यांना पुण्याची विशेष ओढ.पण साडे चार, पाच, साडे पाच वर्षाच्या आमच्यासारख्या मुलांना पुण्याला सहलीला घेऊन जाणं ही काही वाटतं तितकी सोपी गोष्ट नव्हती! वर्गातील १२-१५ मुलांच्या पालकांनी मुलांना सहलीला पाठवायला सहमती दर्शवली. त्यात माझेही पालक होते. झालं! सगळं ठरलं!! आमच्या गावात त्यावेळी एकच एसटी येत होती. रात्री अकरा वाजता ती मुक्कामी यायची पुण्यावरून आणि सकाळी आठला तीच पुन्हा पुण्याला जायची. त्या गाडीने सहल जायची ठरली. आम्ही खूप आनंदात होतो .सर्कस मध्ये विदूषक असतो एवढेच आम्हाला त्यावेळी माहीत होते. कधी एकदा सहलीला जातोय असं झालं होतं .
आणि अशातच माशी शिंकावी तसं झालं ! घरात भावंडांबरोबर खेळत असताना मी जोरात पडले आणि कपाळाला जखम झाली, तीन चार टाके पडले. आताआपल्याला सहलीला जायला मिळणार नाही म्हणून मला वाईट वाटत होते. दुस-या दिवशी बाई मला भेटायला आल्या. मला कोण आनंद झाला म्हणून सांगू! वडील म्हणाले आता हिला सहलीला पाठवत नाही, विनाकारण तुम्हाला त्रास होईल!
बाई म्हणाल्या, तुम्ही काही काळजी करू नका तिला मी सुखरूप नेईल व आणील, बिनधास्त पाठवा तिला. वडिलांनीही परवानगी दिली. केवढा विश्वास होता त्यांचा आमच्या बाईंवर! मी तर उड्याच मारायला लागले.
ठरलेल्या दिवशी सकाळी आठच्या एसटीने आम्ही पुण्याला गेलो. तिथे वेगवेगळी ठिकाणं पाहिली सर्कसही पाहिली. वाघ, सिंह, हत्ती, घोडे, ससे हे आत्तापर्यंत केवळ चित्रात पाहिलेले प्राणी प्रत्यक्ष पाहायला मिळाले! प्रत्यक्ष अनुभूती हा परिणामकारक शिक्षणाचा गाभा असतो ह्याची जाणीव बाईंना होती. आपण आजारी आहोत हे मी कधीच विसरून गेले होते मी! रात्रीच्या एसटीने आम्ही अकरा वाजता गावी पोहोचलो. येताना मला झोप लागली होती. बाईंना त्यांच्या मांडीवर मला झोपवून आणलं होतं. खूप काळजी घेतली माझी आणि सर्वच मुलांची, अगदी आईसारखी! तुम्हीच सांगा, अशा प्रेमळ बाईंना मी कधीतरी विसरू शकेन का?
आमच्या गावापासून पन्नास साठ किलोमीटर पुणे! एवढ्या दूर बालवाडीची सहल काढण्याचा बाईंचा निर्णय किती धाडसी होता! हे आज समजतेय. बाई, सलाम तुमच्या धाडसाला आणि जिद्दीला !
अशा या माझ्या बाई किती धाडसी जिद्दी होत्या हे पुढे अनेक प्रसंगातून समजले. बालवाडी संपली पण बाईंशी असलेलं नातं कधीच संपलं नाही. तेवढा जीवच लावला होता बाईंनी मला ! बालवाडीचे वर्ग चालूच होते.अशातच एक घटना घडली. बाई डिलीव्हरीसाठी माहेरी गेल्या त्यांना कन्यारत्न झाले. बाळ केवळ एक महिन्याचे असेल. दरम्यान, त्यांच्या मिस्टरांचे अपघाती निधन झाले. आणि बाईंवर आभाळच कोसळले!
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते,
कुठेतरी मी उभीच होते कुठेतरी दैव नेत होते!
असंच काहीतरी बाईंच्या बाबतीत घडलं होतं. पण त्याही परिस्थितीत बाई डगमगल्या नाही, एवढ्या लहान वयात आलेलं वैधव्य आणि पदरी छोटं बाळ, कसं सावरलं असेल त्यांनी स्वतःला? या विचारांनीच आजही मन सुन्न होतं! गावातील चांगल्या माणसांनी त्यांना धीर दिला. लहान मुलीचे पालनपोषण करत तिच्या आई व वडिलांची भूमिका एकाच वेळी खंबीरपणे पार पाडली. मुलीला वडिलांची उणीव कधीही भासू दिली नाही. तिला उत्तम घडवलं व तिचे दोनाचे चार हात करून दिले. अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यात बाईंनी स्वत:ला कायम व्यस्त ठेवलं.
अशा या माझ्या बाई मला परत शिकवायला आल्या ते मी आठवीला असताना हिंदी विषयाला. (विद्या विकास मंदिर निमगांव म्हाळुंगी हे माझ्या शाळेचे नाव. हे नाव आणि माझी शाळा मला आजही खूप आवडते!) दरम्यानच्या काळात त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता वाढवली होती. मला चांगलंच आठवतं, बाई पाठाचे वाचन एवढं प्रभावी करायच्या, की त्यांच्या कायिक व वाचिक अभिनयातून पाठातील प्रसंग आमच्या डोळ्यासमोर उभे राहायचे. पाठ जीवंत करण्याची जबरदस्त ताकद बाईंच्या वाचनात होती!
मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे बाई आमच्याबरोबर खो-खो, रिंग, थाळीफेक खेळायच्या. आमच्या शाळेत मुलींबरोबर खेळणाऱ्या त्या एकमेव शिक्षिका होत्या! एकदा बाईंनी हिंदीचा गृहपाठ लिहायला दिला. पहिलाच गृहपाठ खूप छान अक्षरात लिहायचा असं मी ठरवलं. कारण माझ्या आवडत्या बाईंना माझे अक्षर आवडले पाहिजे. बसले गृहपाठ लिहायला! खोटं नाही सांगत थोडी जरी खाडाखोड झाली की मी लगेच वहीचं पान फाडायचे .अशी तीन पाने फाडून झाली चौथ्या वेळेस जरा चांगलं जमलं आणि एकदाचा माझा गृहपाठ पूर्ण झाला! जेव्हा बाईने तो तपासला व मला A ग्रेड दिली तेव्हा मला एवढा आनंद झाला म्हणून सांगू! तेव्हापासून नीटनेटकं लिहायची सवय लागली ती कायमची!
आजही कधी माहेरी गेले तर बाईंना फोन करते त्यांना भेटायला जाते. बाई माझ्या प्रत्येक सुखदुःखाच्या साक्षीदार आहेत आणि मी त्यांच्या !
मी बीएडला विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होऊन कॉलेजमध्ये पहिली आले हे बाईंना कळले त्यांना खूप आनंद झाला. जेव्हा मी माहेरी गेले तेव्हा बाई मला भेटायला आल्या आणि त्यांची छानशी साडी त्यांनी मला भेट दिली. अजूनही मी ती जपून ठेवली आहे! बाई तुमच्या मायेची ऊब आहे त्यात!ती साडी पाहून मला बळ मिळतं जगण्याला, जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जायला! अजूनही गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन या दिवशी बाईंची हमखास आठवण येते. कधी कधी फोनही नही करते त्यांना. एकदा मी म्हणाले, बाई तुम्ही अँड्रॉइड फोन घ्या ना म्हणजे आपल्याला गप्पा मारता येतील. बाई म्हणाल्या, नको, ज्यांना माझी खरंच आठवण येते ते फोन करतातच. मग कशाला हवा अँड्रॉइड फोन? फोनवर बोलताना जी आपुलकी वाटते ती रोजच्या चॅटिंगमध्ये नसते. केवढे मोठे तत्त्वज्ञान !
एक बालवाडीशिक्षिका ते आदर्श मुख्याध्यापिका असा बाईंचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. आता बाई सेवानिवृत्त होऊन नातवासाठी वेळ देत आहेत, काही मुलांची ट्युशन घेत आहेत. अजूनही त्यांनी आपले अध्यापनाचे व्रत चालू ठेवले आहे .त्याबरोबरच त्या आरोग्याचीही काळजी घेतात रोज नियमितपणे योगासने, प्राणायाम करतात त्यामुळे त्यांना कधीही पाहिलं तरी त्या एकदम उत्साही दिसतात. योग्य आहार, विश्रांती आणि व्यायाम ही आरोग्याची त्रिसूत्री त्यांनी अजूनही सांभाळली आहे.
स्वत:साठी वेळ देऊन त्या स्वत:च्या आवडीनिवडी,छंद जोपासतात. म्हणूनच बाईंविषयी म्हणावेसे वाटते-
रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा!
खरंच बाई, तुम्ही माझा आदर्श आहात!
अशा या माझ्या आवडत्या बाईंना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराकडे मागणी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा! बाई,पुन्हा एकदा आपणास गुरूपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!🙏🏻💐🙏🏻
मुरलीधर सोपाना कळसकर
Posted on 9 July, 2020आपल्या आवडत्या शिक्षिकेबद्दल अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी लेख.