काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

नवी दिल्ली | राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद आता मोदी सरकारच्याच अंगाशी आला आहे. काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्सच्या नावाची शिफारस केल्याचं उघड केलं होतं. तसंच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडे दुसरा पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. ओलांद यांच्या खुलाशानंतर गेल्या 24 तासांत काँग्रेस

आणखी >>

जिल्ह्यातील ८५ शाळा अनधिकृत

पुणे। दि. १ (प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यात तब्बल ८५ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आले आहे. या सर्व शाळांना शिक्षण हक्क कायद्यातील कलम १८ अतंर्गत नोटिसा देण्यात आल्या असून, संबंधित सर्व शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी अशा शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी केले आहे.
शासनाने शिक्षण हक्क कायद्या अतंर्गत आता कोणालाही शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाची मान्यता, ना हरकत प्रमाण पत्र घेतल्याशिवाय शाळा सुरू करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा प्ररकारे मान्यता न घेता शाळा सुरु केल्यास संबंधित संस्था चालकांवर १ लाख रुपयांचा दंड व नोटीस दिल्यानंतरही अनधिकृतरित्या शाळा सुरु ठेवल्यास प्रतिदिन १0 हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच अशा सर्व
अनधिकृत शाळांवर त्वरित कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खालील अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेळ घेऊ नये.

आणखी >>

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ

पुणे। दि. २४ (प्रतिनिधी)
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफ होण्याबाबत शासन स्तरावर बोलणे झाले असून, २६ हजार ६00 विद्यार्थ्यांच्या नावांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. त्याप्रमाणे त्यांची परीक्षा फी माफ झाली असल्याने त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. वासुदेव गाडे यांनी स्पष्ट केले.
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांंकडून घेण्यात येणारी फी माफ करावी, अशी सूचना विद्यापीठातील अधिसभेमध्ये सदस्य डॉ. शिवाजी साबळे यांनी केली.
दरम्यान, गरजू विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत महाविद्यालय किंवा विद्यापीठामध्ये शिकत असताना पैसे कमविण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. परंतु उन्हाळी सुटीत ही योजना सुरू नसल्याने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांंना तीन महिने आर्थिक झळ सोसावी लागेल. त्यामुळे उन्हाळी सुट्टीतही दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांंना ‘कमवा व शिका’ योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी साबळे यांनी केली.
‘‘ही योजना उन्हाळी सुटीतही घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांंना या योजनेचा लाभ घेता येईल’’, असे कुलगुरू डॉ. गाडे यांनी सांगितले.
‘कमवा व शिका’ योजनेप्रमाणे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांंकरिता वेगळी तरतूद अर्थसंकल्पात व्हायला हवी, अशी मागणी अधिसभेत करण्यात आली होती. त्यावर गाडे यांनी ही योजना आधीपासूनच सुरू असल्याचे स्पष्ट केले.

आणखी >>

आता शिक्षणातही ‘क्रेडिट कार्ड’

अशोक निंबाळकर।
दि. २२ अहमदनगर
शिक्षण क्षेत्रातही आता ‘क्रेडिट सिस्टिम’ (श्रेयांक पद्धती) येऊ घातलीय. क्रेडीटवर विद्यार्थ्यांची शैक्षणिक ‘पत’ ठरविणार आहे. यूजीसीच्या निर्देशानुसार २0१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून देशातील सर्व विद्यापीठांनी पदव्युत्तर पदवीसाठी ही पद्धती लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. विद्यार्थी सर्व दृष्टीने परिपूर्ण व्हावा यासाठी नॉलेज कमिशनने या सिस्टिमचा उपाय ‘यूजीसी’ला सुचवला होता.
पुणे व मुंबईसह राज्यातील विद्यापीठांनी कॅम्पसमध्ये शिकवल्या जाणार्‍या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ही पद्धती राबविली जाते. पुणे विद्यापीठाने पुढील शैक्षणिक वर्षापासून कॅम्पसबाहेरही ही पद्धत राबविण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्या मसुद्याला विद्या परिषदेच्या सभेत अंतिम मान्यता मिळेल. प्रारंभी पदव्युत्तर पदवीसाठी नंतर
पदवीसाठीही ती राबविण्यात येणार असल्याचे समजते. परदेशातील विद्यापीठात याच पद्धतीचा अवलंब करण्यात येतो, असे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.
ही पद्धती राबविताना प्राध्यापकांनी अद्यापनाची पद्धती बदलावी. टी.व्ही., सीडी, व्हिडिओ कॉन्फरन्स, गटचर्चा घडवून आणाव्यात. इतर संस्थांच्या साधनांचा उपयोग करून घ्यावा. विविध अभ्यासक्रम आणावेत, असे यूजीसीने विद्यापीठांना सुचविले असल्याचे नगर उपकेंद्र संचालक एस.एस. रिंढे यांनी सांगितले.

कसे मिळेल क्रेडिट ?
विद्यार्थ्यांना गुणांकनाऐवजी श्रेयांक (ग्रेड) मिळेल. महाविद्यालयातील आणि विद्यापीठ परीक्षेतील परफॉर्मन्सवर ती अवलंबून असेल. यात प्रकल्प सादरीकरण, तोंडी परीक्षा आणि उपस्थिती आदींसाठी ५0 टक्के आणि परीक्षेसाठी ५0 टक्के गुण असतील. एकूण ७५ ते १00 गुणांसाठी (आऊटस्टँडिंग) ६ पॉईंट, ६५ ते ७४ गुणांसाठी (व्हेरी गुड) ५ पॉईंट, ४0 च्या कमी गुण मिळाल्यास शून्य पॉईंट म्हणजेच तो विद्यार्थी नापास ग्रा धरला जाईल. या पद्धतीत प्राध्यापकांचाही किस पडणार आहे.

बहिस्थ विद्यार्थ्यांना फटका
जे विद्यार्थी रोज वर्गात उपस्थित राहतील, त्यांनाच परफॉर्मन्स देता येईल. यात विद्यार्थी तावूनसुलाखून बाहेर पडेल.मात्र, काम करून शिकणार्‍यांना यापुढे पदव्युत्तर पदवी घेणे मुश्कील होणार आहे. बहिस्थ विद्यार्थ्यांना ही पद्धत लागू केल्यास याचा मोठा फटका बसू शकतो. सध्या एकट्या पुणे विद्यापीठात एम.ए.,एम.कॉम.साठी ५0 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याची जाणीव विद्यापीठाला करून देऊ.
-प्राचार्य संभाजी पठारे, सदस्य, पुणे विद्यापीठ.

आणखी >>

शाळांच्या गुणवत्तेची होणार तपासणी

मुंबई। दि. १९ (प्रतिनिधी)
राज्यातील शाळांची गुणवत्ता पाहण्यासाठी लवकरच तपासणी होणार असून, या बाबत नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी आज विधान परिषदेत दिली.
वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर विधान परिषदचे पक्षनेते विनोद तावडे यांनी २६0 अन्वये सोमवारी प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावरील चर्चा संपल्यानंतर सरकारतर्फे आज उत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान बोलत होत्या.
शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्य शासनाचा प्रयत्न असून, त्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार नियमावली केली आहे. प्रत्येक गावात शाळा असावी या संदर्भात अंमलबजावणीही सुरु आहे. सरकार आता प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर शाळा आणणार आहे. शिक्षण सेवकांच्या अर्हतेला प्राधान्य, कॉपीमुक्त अभियान, सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून वर्ग खोल्या, पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. शाळांच्या मुल्यांकनाचाही अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण तसेच अल्पसंख्याक शैक्षणिक धोरणही तयार करण्यात येणार आहे. जीवन शिक्षण आणि शिक्षक संक्रमण याचाही विचार करण्यात येईल, असेही फौजिया खान यांनी सभागृहात सांगितले.

बहिष्काराबाबत तोडगा आठवड्यात निघणार
राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापकांनी पुकारलेल्या बहिष्काराबाबत या आठवड्यात शासन तोडगा काढण्यास यशस्वी होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी सांगितले. अध्यापक संघटनेचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री यांची बैठक उद्या होणार असून, या बैठकीत बहिष्कार मागे घेण्यासंदर्भातील निर्णय होईल असेही डी.पी. सावंत म्हणाले.

आणखी >>

मराठी चित्रपट भागविणार मनोरंजनाची तहान

- उन्हाळ्याच्या सुटीत महत्त्वाकांक्षी सिनेमांची गर्दी, एप्रिलमध्ये १२ चित्रपटांची मेजवानी

महेंद्र सुके। दि. ९ (मुंबई)
ज्यांच्या दिग्दर्शनाने मराठी चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेले, अशा काही दिग्गजांच्या नव्या कलाकृतींसह अनेक सिनेमांची प्रचंड गर्दी आगामी दोन महिन्यांत होणार आहे. भरउन्हाळ्यात येणारे हे चित्रपट मुलांच्या परीक्षेनंतर मनोरंजनाची तहान भागवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकाच दिवशी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने, हे ओव्हरलॅपिंग टाळण्यासाठी तारखा बदलण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. तारखा बदलणार असल्या तरी ते उन्हाळ्याच्या सुटीतच येणार हे मात्र निश्‍चित आहे. या प्रदर्शनाच्या गर्दीमुळे अनेकांना पाहिजे त्या थिएटरमध्ये, पाहिजे ती वेळ मिळविण्यासाठी चढाओढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
येत्या १५ मार्चला दोन चित्रपट सिनेमागृहांत धडकणार असून, त्यात सतीश मनवर दिग्दर्शित ‘तुह्या धर्म कोंचा’ आणि मानसिंग पवार दिग्दर्शित ‘आकांत’चा समावेश आहे. त्यानंतर २९ मार्चला चंद्रकांत कुलकर्णी यांचा ‘आजचा दिवस माझा’ हा सिनेमा दाखल होणार आहे. एप्रिल महिन्यात तब्बल १२ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती असून, त्यात ५ तारखेला ‘संशयकल्लोळ’, ‘दणक्यावर दणका’ असे दोन तर १२ एप्रिलला धामधूम, परीस आणि प्रेमसूत्र हे तीन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतील. रामनवमीचा मुहूर्त साधून १९ एप्रिलला तब्बल ५ चित्रपट धडकणार असल्याची चर्चा असून, त्यात येडा, चिंटू २, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे, टुरिंग टॉकिज आणि कुरुक्षेत्रचा समावेश आहे.
२९ एप्रिलला अमोल पालेकर यांचा ‘वी आर ऑन.. होऊन जाऊ द्या’ हा विनोदी सिनेमा आणि राजीव पाटील दिग्दर्शित ‘वंशवेल’ हे दोन चित्रपट येताहेत.
३ मे रोजी शशिकांत डोईफोडे दिग्दर्शित ‘तेंडल्या निघाला ऑस्करला’, संजीव कोलते दिग्दर्शित ‘तानी’ तर १0 मे रोजी महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘कोकणस्थ’ हे तीन महत्त्वाचे चित्रपटही उन्हाळ्याची सुटी साजरी करणार आहेत.
याशिवाय ‘धमक’, ‘धग’, ‘चांदी’, ‘मात’, ‘अब्रान’ अशा अनेक चित्रपटांच्या तारखा ठरल्या नसल्या तरी तेही उन्हाळ्याच्या सुटीतच येणार आहेत.

काही वैशिष्ट्ये..
१अमोल पालेकर आणि संध्या गोखले दिग्दर्शित ‘वी आर ऑन.. होऊन जाऊ द्या’मध्ये अनेक दिग्गज कलावंतांनी भूमिका साकारल्या असून, अमोल पालेकर यांचा हा पहिला विनोदी चित्रपट आहे.
२चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘आजचा दिवस माझा’मध्ये एका सामान्य माणसाच्या छोट्याशा कामासाठी मुख्यमंत्र्याने केलेल्या ‘रात्रीच्या दिवसा’ची रंजक कथा आहे. यात महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि अश्‍विनी भावे प्रमुख भूमिकेत आहेत.
३सतीश मनवर यांचा ‘गाभ्रीचा पाऊस’नंतरचा ‘तुह्या धर्म कोंचा’ हा आदिवासींच्या जीवनावरचा चित्रपट असून, त्यात उपेंद्र लिमये, विभावरी देशपांडे, किशोर कदम यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
४मानसिंग पवार दिग्दर्शित ‘आकांत’मध्ये सामाजिक विषयावर महत्त्वाचे भाष्य करण्यात आल्याची माहिती असून, त्यात मिलिंद शिंदे आणि आदिती सारंगधर मुख्य भूमिकेत आहेत.

आणखी >>

विवाह समारंभाच्या काटकसरीतून दुष्काळग्रस्तांना मदत

वडगाव निंबाळकर। दि. २५ (वार्ताहर)
लग्न समारंभ म्हणजे उत्सव मौजमजा प्रतिष्ठा पणाला लावून मोठय़ा धडाक्यात लग्नाची इच्छा प्रत्येकाची असते. पण इतर ठिकाणी दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासाठी शेतकर्‍यासह ग्रामस्थ हैराण आहेत. या पार्श्‍वभूमीवर विवाह समारंभात होणारा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील पंडितराव दरेकर कुटुंबियांनी घेतला.
रविवारी (दि. २४) येथील दरेकर वस्तीवर पंडितराव दरेकर यांचे चिरंजीव लालासो दरेकर यांची मुलगी सारिका हिचा विवाह किरण दत्तात्रय राजपुरे (रा. शेटफळगढे, ता. इंदापूर) यांच्याशी दुसरे चिरंजीव दिलीप दरेकर यांची मुलगी शितल हिचा विवाह मयूर नंदकुमार मोरे (रा. खेड, ता. कर्जत) यांच्याशी साधेपणाने साखरपुड्यात करण्यात आला. नियोजनाप्रमाणे दरेकर कुटुंबियातील दोन्ही मुलींचा साखरपुडा रविवारी दुपारी उरकला. परंतु, कार्यक्रमातच दुष्काळाविषयी सर्वांच्यात चर्चा झाली. यावेळी दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर विवाह साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून बचत झालेल्या पैशातून दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी कुटुंबियांनी पुढाकार घेतला. या प्रस्तावाला सर्वांनीच संमती दर्शविली. त्यानंतर अवघ्या दोन तासात साधेपणाने विवाह उरकला. या कार्यक्रमासाठी सोमेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे, येथील सरपंच सुनिल ढोले, उपसरपंच संजय साळवे, माजी महसूल उपायुक्त शिवाजीराजे निंबाळकर, संगीताराजे निंबाळकर, बाबू शहा, राजकुमार शहा, निलेश आगम, संदीप साळुंके, जितेंद्र पवार इत्यादी उपस्थित होते. यावेळी पंडितराव दरेकर यांनी दुष्काळग्रस्तांना पंचवीस हजार रुपयांची मदत देण्याचे कबूल केले. राजवर्धन शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. दरेकर कुटुंबियांनी लग्न साधे केल्यामुळे परिसरात आदर्श निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली.

आणखी >>

२५ मनोरुग्ण नोकरी, व्यवसायात स्थिरावले.

- ‘दुभंगा’ने मोडून गेलेल्यांना पुन्हा भरारी

विश्‍वास खोड। दि. १७ (पुणे)
मनोविकारामुळे दुभंगलेल्या मनांमुळे मोडून गेलेली माणसे पुन्हा उभे करण्यासाठी राज्यातील मनोरुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या योजनांमध्ये गेल्या ३ वर्षांत २५ जणांचे पुनर्वसन झाले आहे. दीर्घकाळ उपचार घेऊन सामान्य झालेल्यांचा यात समावेश असून पैकी दोन जणांना ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात प्रत्येकी १६ हजार रूपयांच्या वेतनाची नोकरी मिळाली आहे.
राज्यातील चार मनोरुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या ‘मेंटल हेल्थ प्रोग्राम’मध्ये मिळालेल्या निधीतून मनोरुग्णांना उभारी देण्याचे व सामान्य जीवन जगण्याची संधी मिळवून देण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये दीर्घकाळ सरकारी मनोरुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रूग्णांचे निरीक्षण करून ज्यांची लक्षणे नियंत्रित आहेत, अशांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण किंवा स्वयंरोजगाराचे शिक्षण दिले जाते. त्यांचा कल, आवड व उपजत गुण व शैक्षणिक पात्रता लक्षात घेतले जातात. नेप्च्यून फाऊंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाते. सुतारकाम, शिवणकाम, बागकाम, शेतीकाम आदी कामांबाबत व्यवसाय उपचार तज्ज्ञ व समुपदेशकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून संबंधितांना मनोरूग्णालयातून मुक्त केले जाते.

‘पैलू’पाडण्याचे काम..
या ‘तराशा’ म्हणजे पैलू पाडणे या योजनेत १0 महिलांची निवड झाली होती. टाटा समाज विज्ञान संस्थेच्या सहकार्याने यापैकी ७ महिलांचे पुनर्वसन झाले. काही रुग्णांना रुग्णालयातच काम दिले जाते.
दरमहा पाच हजार रुपये वेतन दिले जाते. तर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ‘मॉल’मध्ये रुग्णांनी निर्माण केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंचे किंवा शुभेच्छापत्रांचे, दिवाळीच्या पदार्थांंचे प्रदर्शन व विक्री केली जाते. तराशा योजनेत ६ रुग्णालयात ३ तर अन्य १६ जणांना खासगी ठिकाणी नोकरी मिळून किंवा स्वतचा छोटासा व्यवसाय उभारून देऊन त्यांचे पुनर्वसन झाले आहे.

मनोरुग्णांना कोणी वाली नसते. कुटुंबियांचे दुर्लक्ष होणे हे सर्वांत दुर्देवी असते. भरकटलेले असे लोक कोठेही भटकत राहतात. मुंबईत देशभरातून येणार्‍या मनोरुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. असे रुग्ण पोलिसांच्या माध्यमातून मनोरूग्णालयांमध्ये दाखल होतात. त्यांच्यावर योग्य उपचार केल्यानंतर त्यांच्या स्मृती जाग्या होतात. अशा रूग्णांचे कुटुंबाशी पुनर्मिलन करून दिले जाते.
- डॉ. संजय रा.कुमावत,
मानसिक आरोग्य विभागाचे उपसंचालक

आणखी >>

कोथिंबिरीवर देशीचा डोस!

बाबासाहेब म्हस्के ।
दि. १६ (जालना)
जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. खरीप व रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी पूर्णत: वाया गेली. अशा स्थितीतही पाणी उपलब्ध असणारे शेतकरी सूक्ष्म नियोजन करून भाजीपाला उत्पादन घेत आहेत. कोथिंबिरीसारख्या पालेभाजीचा रंग हिरवा राहावा, वाढ चांगली व्हावी यासाठी झिबॅ्रलिक अँसिड या संजीवकात शेतकरी चक्क देशी दारू मिसळून त्याचा वापर पालेभाज्यांवर फवारणीसाठी करीत आहेत.
बाजारपेठ जवळच असल्यामुळे शेतकरी सकाळीच ताजा भाजीपाला विक्रीसाठी आणतात. पालेभाज्या हिरव्यागार दिसाव्या, फांद्यांची लांबी व उंची वाढावी म्हणून पालेभाज्या तज्ज्ञ यासाठी संजीवनी प्रेरक म्हणून झिब्रॅलिक अँसिड पावडरचा वापर फवारणीसाठी करण्याचा सल्ला शेतकर्‍यांना देतात, असे कृषी विज्ञान केंद्रातील कीटकनाशक तज्ज्ञ डॉ. अजय मिटकरी यांनी सांगितले. झिब्रॅलिक अँसिड पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे शेतकरी देशी दारू व झिबॅ्रलिक अँसिडचे मिश्रण तयार करून ते पाण्यात टाकून पालेभाज्यांवर फवारत आहेत. पालेभाज्यांचा रंग व वाढ चांगली होत असल्यामुळे दीड वर्षापासून या परिसरातील शेतकरी हा प्रयोग करत असल्याचे इंद्रजीत पाखरे, अशोक वाघ या भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांनी सांगितले. आलेला अनुभव व एकमेकांचे पाहून बहुतांश शेतकरी हा प्रयोग करताना पाहावयास मिळत आहे.
सकाळी बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रीसाठी नेल्यानंतर ग्राहक गर्द हिरव्या रंगाच्या पालेभाज्यांना पसंती देतात. या भागातील शेतकरी झिब्रॅलिक अँसिड पावडरमध्ये देशी दारू टाकून हे मिश्रण पाण्यामध्ये टाकून पालेभाज्यांवर फवारतात. या प्रयोगाचा मागील काही वर्षांपासून चांगला परिणाम जाणवत आहे.
- संजय इंगळे, शेतकरी, जामवाडी
पालेभाज्या, द्राक्षे याची वाढ चांगली व्हावी., रंग हिरवा दिसावा, यासाठी झिबॅ्रलिक अँसिड पावडरच्या फवारणीची शिफारस आहे. ही पावडर पाण्यात विरघळण्यासाठी अँसिटोन, नायट्रिक अँसिडचा वापर करावा लागतो. हे घटक प्रयोगशाळेत उपलब्ध असतात. शेतकर्‍यांना ते सहजासहजी उपलब्ध होत नाही. अँल्कोहोलमध्ये झिब्रॅलिक अँसिड विरघळते, म्हणून शेतकरी देशी दारू व झिब्रॅलिक अँसिडचे मिश्रण करून ते कोथिंबीर व मेथी यासारख्या पालेभाज्यांवर पाण्याबरोबर फवारत असतील. आरोग्यावर याचा कोणताही विपरीत परिणाम जाणवत नाही. शेतकर्‍यांनी फवारणीनंतर लगेच पालेभाज्या विक्रीसाठी आणू नयेत.
- सुहास महाले, पालेभाज्या
तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जालना

आणखी >>

मुलींनी दिला मातेला खांदा!

जीवन चौधरी।
दि. १७ (दहिगाव, जि. जळगाव)
किरकोळ कौटुंबिक वादापासून अगदी थेट आपल्या जन्मदात्यांशी संबंध तोडणारेही अनेक आहेत. पण वृद्ध आईला वार्‍यावर सोडून गेलेल्या अन् तिच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर अंत्यसंस्काराचा ‘हक्क’ बजाविण्यासाठी आलेल्या एका मुलाला त्याच्याच चार बहिणींनी हा हक्क नाकारत दूर ठेवले. कल्पनेच्या पलीकडचा हा प्रसंग अगदी स्मशानात सार्‍यांदेखत घडला तेव्हा त्या मुलाला आयुष्याच्या सार्‍याच कडूगोड आठवणी डोळ्य़ासमोरून तराळून गेल्या शेवटी तेथून काढता पाय घेण्याखेरीज पर्याय त्यांच्यासमोर शिल्लक राहिला नाही.
यावल तालुक्यातील दहिगावामधील सोजाबाई पाटील (७0) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना एक मुलगा व चार मुली अशी अपत्ये. वृध्दापकाळात मुलगा शांताराम हा आईचा सांभाळ करण्याचे कर्तव्य विसरला. कारण आईशी पटत नव्हते. त्यामुळे सोजाबाई आयुष्यभर एकटीच जीवनाशी लढा देत होत्या. हातमजुरी करुन उदरनिर्वाह चालवित होत्या. आईचे हे दु:ख तिच्या मुलींना पाहावत नव्हते. मुलींनी भावाला समजावूनही सांगितले होते. पण त्याचा उपयोग होत नव्हता. चार मुली कधीमध्ये तिच्याकडे किंवा ती त्यांच्याकडे जात असे. असेच म्हातारपण जात असताना आजचा प्रसंग थेट अंत्ययात्रेत उफाळून आला. जीवनभर न वागविणारा मुलगा अंत्ययात्रेत आईला खांदा देण्यास पुढे आला. त्याचवेळी वेदनेने व रागाने संतप्त झालेल्या चारही बहिणींनी भाऊ शांतारामला यास चक्क अंतयात्रेतून दूर लोटले. या चारही बहिणींनी स्वत: पुढे होऊन आईला खांदा दिला.

अग्नी देण्यापासून रोखले
त्यांनी भावाला अग्निही देण्यापासून रोखले. तो भाऊबंदांनी दिला. या प्रकाराने अंत्ययात्रेसाठी आलेले लोकही आवक झाले. या प्रसंगाने व बहिणींनी कर्तव्याची जाणीव करुन दिली. त्यामुळे शांतारामला स्मशानभूमीतून काढता पाय काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.

आणखी >>

शालेय पोषण आहारात मिळणार भाकरी

धर्मराज पवळे । दि. १७ (वाफगाव)
शालेय पोषण आहारांतर्गत रोज मिळणार्‍या खिचडीतून विद्यार्थ्यांची सुटका होणार असून, आता आठवड्यातून एकदा ‘ज्वारीची भाकरी’ दुपारच्या जेवणात मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची जरी सोय होणार असली, तरी आधीच वाढत्या महागाईमुळे खिचडी शिजवताना मेटाकुटीस आलेले शिक्षक आणि बचत गट यांच्या चिंतेत भर पडली आहे.
शालेय पोषण आहार योजनेत २६ जानेवारीपासून आठवड्यातून एकदा ज्वारीची भाकरी दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. शाळांना खिचडी शिजविण्यासाठी व्यावसायिक दराने गॅस भरून घ्यावा लागतो. प्राप्त निधीत ही योजना राबविताना मेटाकुटीस आलेल्या शाळांना त्याच गॅसवर भाकरी भाजावी लागणार असल्याने मुख्याध्यापक व महिला बचत गट काळजीत पडले आहेत. न्यायालयीन आदेशान्वये मुलांची उपस्थिती टिकावी म्हणून ही योजना कार्यान्वित ठेवणे मुख्याध्यापकांना बंधनकारक आहे. अशीच काहीशी स्थिती अंगणवाड्यांचीही आहे. त्यांनाही ‘गॅस’चा तडाका बसत असल्याचे चिंचबाईच्या मनीषा गार्डी, चौधरवाडीच्या वंदना चौधरी या सांगतात.
यासाठी एक तर शाळा व अंगणवाड्यांना अनुदानित गॅस पुरवावा; अन्यथा मानधन व इंधनखर्चात वाढ करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सल्लागार गौतम कांबळे, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दत्ता शिंदे यांनी केली आहे.

आणखी >>

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘किसान कोष’ स्थापन

नागपूर। दि. १३ (प्रतिनिधी)
शेतकरी आत्महत्यांनी व्यथित होऊन मध्य प्रदेशातील सिहोर येथील रफी अहमद किदवई कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘किसान कोष’ची स्थापना केली आहे. तीन दिवस चालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनार शेतकर्‍यांची दशा व दिशा सुधारण्याकरिता तासभरात दोन लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला.१९५२ मध्ये भोपाळ जवळ सिहोर येथे हे कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आले. त्यावर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीतील सुवर्ण पदक विजेते विद्यार्थी आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेले पद्मश्री डॉ. संत सिंह विरमानी यांच्या कल्पनेतून ४0 माजी विद्यार्थी नुकतेच सिहोरला पुन्हा एकत्र आले होते. यावेळी नागपूर येथील विश्‍वेश्‍वर जागेश्‍वर श्रीखंडे व प्रा. राजेंद्र पहेलवान यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विरेंद्र सिंह गौतम, मध्य प्रदेशचे पहिले कृषी निदेशक डॉ. पृथ्वीसिंग लांबा, अमेरिकेसह विविध देशांमध्ये भारताचे राजदूत राहिलेले गजानन वाकणकर, डॉ. डी. पी. सिंग, प्रा. ए. के. सिंग, अरुण डिके, छतरपूरच्या अपर जिल्हाधिकारी प्रीती मैथिल, चंदुलाल व्यास, ओमप्रकाश माथुर, मानवेंद्र सिंह आदीं उपस्थित होते.

आणखी >>

शिक्षकांचे वेतन आता एक तारखेला

मुंबई। दि. ४ (खास प्रतिनिधी)
राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका व खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते आता नव्या वर्षापासून ‘शालार्थ’ या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून एक तारखेलाच देण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे व लातूर या चार जिलंची पथदश्री प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर महिन्यात हा निर्णय घेतला होता. त्यानंतर महिनाभरात आदेश निघाल्याने त्याचे स्वागत होत आहे. संबंधित चार जिल्ह्यांतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे जानेवारी महिन्याचे वेतन एक फेब्रुवारीलाच या प्रणालीद्वारे देण्यात येईल. वेतन देण्यास उशीर झाल्यास संबधित अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात येणार आहे. खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसंदर्भात २0१२-१३ या वर्षातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या नोंदीची जबाबदारी संबधित वेतन व भविष्य निवार्ह निधी पथकाचे अधीक्षक व शिक्षणाधिकार्‍यांवर तर जि.प. शाळांतील नोंदणीची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच महापालिका क्षेत्रातील शाळांतील शिक्षकांची जबाबदारी प्रशासन अधिकारी, मुख्याधिकार्‍यांसह शिक्षण उपसंचालकांवर सोपविण्यात आली आहे. १0 जानेवारीपर्यंत ही नोंदणी पूर्ण करायची आहे.‘

आणखी >>

सर्वच शाळांमध्ये बसणार तक्रार पेट्या

भातसानगर। दि. ४ (वार्ताहर)
महिला व मुलींवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांची तत्काळ माहिती पोलिसांना मिळावी आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सुटावा, यासाठी ग. वि. खाडे विद्यालयासह सर्वच शाळांमध्ये तक्रार पेटीची सुविधा शहापूर पोलीस उपअधीक्षक प्रशांत वाघुडे यांनी उपलब्ध करून दिली व अत्याचारांची माहितीही एक विशिष्ट क्रमांक देऊन त्यावर देण्याची सुविधाही देण्यात आली.
शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालयात पोलीस उन्नत दिनाचे औचित्य साधून या योजनेची सुरुवात करण्यात आली. या वेळी मुलींच्या सुरक्षेविषयी माहिती देण्यात आली. महिला अथवा विद्यार्थिनींवर होणार्‍या अत्याचारांची माहिती मिळण्यासाठी (ड्रॉप बॉक्स) तक्रार पेटी असून, या तक्रार पेटीत मुलींनी त्रास देणार्‍या व्यक्तीची तक्रार लिहून ठेवल्यास त्या मुलीची माहिती व नाव गुप्त ठेवून अत्याचार करणार्‍याला मात्र धडा शिकविला जाणार आहे. यासाठी पोलीस उपअधीक्षकांनी दिलेल्या क्रमांकावर एसएमएस केला तरी त्यांची गंभीर दखल घेतली जाणार असल्याचे शहापूरचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत वाघुडे यांनी सांगितले.
ही तक्रार पेटी रोज उघडण्यात येणार असल्यामुळे केलेल्या तक्रारी लवकर कळून त्यांच्यावर लगेचच कार्यवाही होणार असल्याने अशा घडणार्‍या घटनांवर जरब बसणार असल्याचे शहापूरचे पो. निरीक्षक गणपत पिंगळे यांनी सांगितले.

आणखी >>

विद्यार्थिनींसाठी ५४१ स्वतंत्र स्वच्छतागृहे

पुणे। दि. ३१ (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साडेसहा कोटी रूपये खर्च करून विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र ५४१ स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष प्रदीप कंद यांनी आज सांगितली.
अनेक शाळांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी एकत्रित स्वच्छतागृहे असून ती अपुरी आहेत. एकत्र स्वच्छतागृहांमुळे मुलींना अडचणी येत होत्या. त्यामुळे स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्णय जाणार घेण्यात आला. तीन मुतार्‍या आणि एक स्वच्छतागृहे असे एक युनिट निर्माण केले जाणार आहे.एका युनिटसाठी एक लाख वीस हजार रूपये खर्च करण्यास मंजुरी मिळाली आहे.
हवेली तालुक्यात सर्वाधिक ८४ शिरूरमध्ये ७८ जुन्नरमध्ये ७५ बारामती तालुक्यात ६५ तसेच दौंड तालुक्यात ५५स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत. खेड मध्ये ५२ आंबेगाव तालुक्यात ३३ मुळशीत ३0 पुरंदरमध्ये २८ मावळात २२ या संख्येने स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या, स्वच्छतागृहांच्या सुविधा पुरेशा नसल्याचे मध्यंतरी केलेल्या पाहणीतून आढळले होते.

आणखी >>

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होणार ‘संस्कार वर्ग’

पुणे। दि. २0 (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्काराचे बीज रुजविण्यासाठी पुण्यातील स्वरुप वर्धीनी संस्थेच्या सहकार्याने सर्व शाळांमध्ये खास ‘संस्कार वर्ग ’ घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल कवडे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या पटपडताळणीमध्ये
एका वर्षांत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या
तब्बल १0 हजारांने घटली
असल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेऊन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या मागदर्शनाखाली जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच बरोबर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेत असताना चैतन्य निर्माण करण्यासाठी व काही मुल्यांची जपवणूक करण्यासाठी संस्कार वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये योगासनांपासून, प्रार्थना, अदर्श व्यक्तींचे संदेश, बोधकथा, कृती कार्यक्रम या माध्यमातून चांगले संस्कार रुजविण्यात येणार आहे.
यासाठी पुण्यातील स्वरुप वर्धीनी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील सहा अशा एकूण ७0 शिक्षकांना मुल्य वर्धनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी आठ दिवसांचे संस्कार शिबिर घेण्यात आले होते. आता हे प्रशिक्षित शिक्षक आपल्या तालुक्यातील शाळांमध्ये जाऊन संस्कार वर्गांची माहिती देणार आहे. स्वरुप वर्धीनी संस्थेच्या वतीने नियमितपणे या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे कवडे यांनी सागंतिले.
याशिवाय ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास याबाबत देखील स्वतंत्र शिबिरी घेण्यात येणार असल्याचे कवडे यांनी स्पष्ट केले.

आणखी >>

विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात कधीही दाखला

मुंबई। दि. २0 (प्रतिनिधी)
जुलै अखेरीपर्यंत शाळेत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. मात्र नव्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यामुळे शिक्षण घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यासाठी पालिका शाळेचे द्वार संपूर्ण शैक्षणिक वर्षात खुले राहणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ या अधिनियमाचे सादरीकरण पालिकेच्या विशेष महासभेत आज करण्यात आले. ८६ व्या घटना दुरुस्तीनंतर केंद्र सरकारने हा अधिनियम तयार केला असून तीन महिन्यांत या अधिनियमाची अंमलबजावणी करणे पालिकेला बंधनकारक असणार आहे.
या अधिनियमानुसार ६ ते १४ या वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जाणार आहे. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत शाळेत प्रवेश न घेतल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी अट शिथिल केली जाणार आहे. त्यामुळे मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य होणार असल्याचे सादरीकरणादरम्यान शासकीय अधिकार्‍याने सांगितले.

नव्या अधिनियमानुसार
शाळेच्या परिसरात रॅम्प, संरक्षक भिंत, स्वयंपाकगृह आणि खेळाचे मैदान असणे बंधनकारक असणार आहे.
खेळ व शारीरिक सुदृढता वाढीसाठी विशेष लक्ष देणे.
ल्ल इयत्ता १ ते ८ वीपर्यंत प्राथमिक शिक्षण. ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत शिक्षण. तसेच शाळाबाह्य मुलांनाही मोफत प्रवेश मिळणार आहे.
एक कि.मी. परिसरातील ६ ते ११ वर्षे वयोगटातील २0 बालकांसाठी प्राथमिक शाळा निर्माण करणार.
३0 विद्यार्थ्यांमागे एक प्राथमिक शिक्षक व ३५ विद्यार्थ्यांमागे एक उच्च प्राथमिक शिक्षक असणार आहे. जन्माचा दाखला नसल्यासही प्रवेश.
शाळेतून काढण्यास तसेच शारीरिक शिक्षा व मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध.
मान्यता नसताना शाळा स्थापन केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड. तसेच मान्यतेचे प्रमाणपत्र दर तीन वर्षांंनी नव्याने घेणे सक्तीचे असणार आहे.

आणखी >>

रब्बीच्या क्षेत्रातही घट?

पुणे। दि. १८ (प्रतिनिधी)
पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामानंतर रब्बी क्षेत्रावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुरेश्या ओलाव्याअभावी ज्वारी, गहू, करडई, हरभरा पिकाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५८.६0 लाख हेक्टर असून, त्या पैकी ४१.३९ लाख हेक्टर (७१ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लवकर पेरलेला हरभर्‍याची तुरळक आवक बाजारात होत आहे. ज्वारी पीक फुलोरा, तर गहू मुकूटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. उशीरा आलेल्या मान्सूनमुळे शेतकर्‍यांचे रब्बीचे पीक नियोजनही कोलमडले आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद, लातुर या विभागातील बहुतांश शेतकर्‍यांनी ज्वारी, गव्हा ऐवजी मक्याचे पीक घेणे पसंत केले आहे. त्यामुळे या विभागात मक्याच्या क्षेत्रात दीड ते तीन पटींनी वाढ झाली आहे.
नाशिक विभागात रब्बीचे सरासरी क्षेत्र ३.६0 लाख हेक्टर असून, त्या पैकी १.९२ लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी पुर्ण झाली आहे. ज्वारी व करडई पीकाची पेरणी पूर्ण झाली असून, गहू व हरभर्‍याची पेरण्या सुरु आहे. पुणे विभागाचे सरासरी क्षेत्र २0.८९ लाख हेक्टर असून, पैकी १२.५0 लाख हेक्टरवर (६0 टक्के) पेरणी झाली आहे. लवकर पेरणी झालेली ज्वारी फुलोरा अवस्थेत आहे. मात्र जमिनीत पुरेशी ओल नसल्याने बहुतांश ठिकाणची ज्वारीची पीके सुकू लागली आहेत. कोल्हापूर विभागाचे सरासरी क्षेत्र ४.४६ लाख हेक्टर असून, त्या पैकी ३.८२ लाख हेक्टरवरील (८६ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्वारी व मका फुलोरा, तर हरभरा फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. गहू मुकूटमुळे फुटण्याच्या अवस्थेत असून, करडई पीकाची पेरणी पूर्ण झाली आहे.
औरंगाबाद विभागातील ८.७२ लाख हेक्टरपैकी ५.७६ लाख हेक्टरवर (६६ टक्के) पेरणी झाली असून, कमी पावसामुळे पीके सुकू लागली असल्याचे कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे. अमरावती विभागाचे सरासरी क्षेत्र ४.२७ लाख हेक्टर असून, पैकी ३.८७ लाख हेक्टरवर (९१ टक्के), तर नागपुर विभागात 0.0५ लाख हेक्टरपैकी ३.७७ लाख हेक्टरवर (९३ टक्के) पेरणी झाली आहे. गहू व हरभरा पीके वाढीच्या अवस्थेत आहेत.

आणखी >>

शेतकर्‍यांनो, थेट ग्राहकांना विका माल!

पुणे। दि. १0 (प्रतिनिधी)
मुंबईसह राज्यातील महानगरांमध्ये आता शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्रे सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरही शेतकरी शेतमाल विकताना दिसणार आहे. कृषी व पणन विभाग या योजनेचे नियंत्रण करणार असून, त्याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
शहरात विविध ठिकाणी विक्री केंद्र उभी उभारता येईल का, याबाबतही अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. यासाठी स्थानिक बाजार समितीने शेतकर्‍यांना संपूर्ण सहकार्य देण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी शहरात कोठेही माल विकू शकतील. प्रसंगी शेतकर्‍यांना पोलीस संरक्षणही पुरविण्यात येईल, असेही विखे-पाटील यांनी सांगितले. प्रादेशिक बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले, याबाबत बाजार समितीकडून सहकार्य मिळेल. आडत्यांच्या आंदोलनाचा शेतमालाला फटका बसल्यास, शहरात तातडीने विक्री केंद्र सुरू केली जातील.

शेतकर्‍याला जर स्वत:चा माल स्वत: विकायचा असेल, तर त्याला कोणत्याही बाजाराचे बंधन राहणार नाही. शहरातील रस्त्यांवरही तो थेट ग्राहकाला माल विकू शकेल.
- राधाकृष्ण विखे-पाटील, कृषी व पणन मंत्री

आणखी >>

कांद्याच्या झाल्या चिंगळ्य़ा

लोणी धामणी। दि. ६ (वार्ताहर)
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शेतकर्‍यांनी मोठय़ा कष्टाने लावलेल्या शेतातील कांद्याला पाणी न मिळाल्याने वाढ खुंटून त्याच्या चिंगळ्या झाल्या आहेत, असे शेतकरी आनंदराव जाधव, तुकाराम जाधव व शेतकर्‍यांनी सांगितले.
मुबलक पाऊस पडेल, या आशेवर शेतकर्‍यांनी गादीवाफे तयार करून त्यात संकरित कांदारोपाची लागवड केली होती. मात्र पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे ओढे, विहिरी, तलाव यांची पाणी पातळी खालावली.
परिणामी या कांद्याना पाणी कमी पडले असून, त्यामुळे वाढ खुंटली. एकरभर वाफ्यात २ ते ३ पिशव्या कांदे निघत आहेत. हे कांदे शेतात काढणीविना ठेवता येत नसल्याने, तसेच काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी स्वत:च सावडीने कांदेकाढणी करत आहे. पाण्याअबावी पिक हातातून गेल्याने शेतकरी त्रस्त आहे.
मुंबई-पुणे बाजारात माल कमी असल्याने कांद्याला बाजारभाव बर्‍यापैकी आहे; परंतु शेतात मालच निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या भागात शासनाने त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी आनंदराव जाधव, तुकाराम जाधव व शेतकर्‍यांनी केली आहे.

आणखी >>

पिकांवर मावा, तुडतुडे, करपा, भुरी रोगांचा प्रादूर्भाव

मंचर। दि. ६ (वार्ताहर)
रब्बी हंगामात हवामानात बदल झाल्यास पिकांवर मावा, तुडतुडे, करपा, भुरी रोगांचा प्रादुर्भाव होतो. या रोगांना आळा घालण्यासाठी नगदी उत्पन्न मिळवून देणार्‍या पिकांवर कीटकनाश व बुरशीनाशकांची फवारणी करत शेतकरी काळजी घेऊ लागला आहे.
नगदी उत्पन्न मिळवून देणार्‍या पिकांचे उत्पादन शेतकरी मोठय़ा प्रमाणावर घेतो. रब्बी हंगामातील पिके जोमदार आली आहेत. बारमाही पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पिके घेऊन चांगले उत्पादन घेण्यात शेतकरी यशस्वी झाला आहे. थंडीचे दिवस असले तरी हवामानात कधीकधी बदल होतात. थंडी सुरू असतानाच अचानक दमट वातावरण तयार होते. दोन दिवसांपूर्वी आभाळात सकाळच्या वेळी ढग दिसून आले होते.
हवामानाच्या या बदलाने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कांदा, बटाटा, वालवर, कोबी, फ्लॉवर या पिकांवर मावा, तुडतुडे, करपा, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कीटकनाशक व बुरशीनाशक यांची फवारणी शेतकरी शेतात करताना दिसत आहे.
याबाबत माहिती देताना गुरुदत्त फर्टिलायझर्सचे मालक बाळासाहेब पिंगळे म्हणाले, बर्‍याच वेळा हवामान चांगले राहते मात्र हवामानातील थोड्याशा बदलाने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी शेतकरी औषध फवारणी करतो. पिकांची काळजी घेण्याकडे शेतकर्‍यांचा
कल आहे.

आणखी >>

भीतीला दूर सारत ६८ एचआयव्हीग्रस्त विवाहबद्ध

पुणे। दि. २ (प्रतिनिधी)
एचआयव्ही.. हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीतीची पाल चुकचुकते.. त्यातच आपल्याला एचआयव्ही झाला, हे कळताच अनेक जण स्वत:ला समाजापासून वेगळे करतात.. नाहीतर भीतीपोटी समाजच अशा व्यक्तींना दूर लोटतो अन् सुरू होतो एकांतपणाचा प्रवास.. यात जर एचआयव्हीग्रस्त तरुण असेल तर.. कल्पनाच करवत नाही.. परंतु, या भीतीला आणि त्यातून आलेल्या एकांताला दूर सारत एचआयव्हीची लागण झालेल्या ६८ जणांनी एकमेकांना साथ दिली असून, ते विवाहबंधनात अडकले आहेत. दीपगृह सोसायटी संस्था गेल्या ३-४ वर्षांंंपासून एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करीत आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना त्यांना एचआयव्हीग्रस्तांच्या एकांताचा प्रश्न प्रामुख्याने जाणवला. संस्थेने एचआयव्हीग्रस्तांच्या लग्नाचा विचार सुरू केला. समाजापासून दूर गेलेल्या अशा व्यक्तींच्या जीवनात सुख-दु:ख वाटणारी व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा झाला. आतापर्यंंंत या संस्थेने ३४ जोडप्यांना विवाहाच्या बंधनात अडकवले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक अविनाश चक्रपाणी यांनी दिली.

एचआयव्हीग्रस्तांसाठी मॅट्रीमोनी
एचआयव्हीग्रस्तांना जोडीदार शोधण्यासाठी दीपगृह सोसायटीच्या वतीने मॅट्रीमोनी म्हणजेच विवाहनोंदणी विभाग सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, एचआयव्हीग्रस्त व्यक्ती तेथे विवाहासाठी मोठय़ा संख्येने नोंदणी करीत आहेत.

आणखी >>

शिक्षकांना आता ‘ऑनलाईन’ वेतन

बारामती। दि. १0 (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना दिवाळीनिमित्त एक गोड बातमी आहे. दर महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचे वेतन आता ‘ऑनलाईन’ जमा होणार आहे.
याशिवाय त्यांना एटीएम कार्डही दिले जाणार आहे. या योजनेमुळे अधिक सुलभता येऊन त्यांची वेतनाची प्रतीक्षा थांबणार आहे.
या संदर्भात बारामती पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत कदम यांनी सांगितले की, यासाठी खास प्रणाली कार्यान्वित केली आहे. शिक्षकांची माहिती संकलित केली जात आहे. प्रत्येक शाळेला स्वतंत्र संकेतांक दिला जाणार आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने एटीएम सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे शिक्षकांना कोणत्याही शाखेतून वेतन काढणे शक्य होईल.

आणखी >>

रोजंदारीच्या पैशातून सुरू केली अभ्यासिका

प्रा. विश्‍वनाथ पाटील। दि. ३ (मारवड जि. जळगाव)
युवक व्यसनाधीन झाला अशी नेहमीच ओरड होत असते. मात्र, युवकही विधायक कार्य करू शकतात याचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गोवर्धन या छोट्याशा गावातील युवकांनी आणून दिला आहे. गावातील ५0 तरुणांनी एकत्र येऊन स्वत:च्या पैशातून व प्रसंगी रोजंदारी करीत पैसा उभारून अभ्यासिका सुरू केली आहे. गावातील गरीब, श्रमजीवी परिवारातील महाविद्यालयीन युवकांनी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत ज्ञानार्जनाचा एक स्तुत्य उपक्रम सुरू करीत वेगळाच आदर्श घालून दिला आहे.
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी जागा उपलब्ध नसते. पालक अशिक्षित शेतकरी, शेतमजूर असल्याने घरी अभ्यासाचे वातावरण नसते. तसेच विद्यार्थ्यांचा स्टडी ग्रुपही नसतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची पुरेशी ओळख नसते.
अशा स्थितीत स्पर्धेत उतरून टिकायचे कसे, हा यक्षप्रश्न उभा राहतो. यातून मार्ग काढण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन सार्वजनिक अभ्यासिका सुरू केली. गावातील मुले, विद्यार्थी एकत्र येऊन या ठिकाणी अभ्यास करतात.
ग्रामीण भागात रात्रीचेही भारनियमन असल्याने त्यावर मात करण्यासाठी इन्व्हर्टरदेखील आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी घेतली आहे. या उपक्रमामुळे गावात चांगली वातावरणनिर्मिती झाली.

अभ्यासिकेला दिले
प्रेरणा देणार्‍या मित्राचे नाव
कधी या मित्रांमध्येच रमणारा व अभ्यास करणारा स्व. महेश पंढरीनाथ पाटील याचे एमपीएससी, यूपीएससीद्वारे भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न होते. त्याने सर्वप्रथम आपल्या मित्रांसमोर सार्वजनिक अभ्यासिकेची संकल्पना मांडली. मात्र हे स्वप्न उराशी बाळगणार्‍या या अभ्यासू युवकाला क्रूर काळाने ऐन उमेदीच्या काळात अपघाती निधनाने हिरावून नेले. तेव्हापासून व्यथित झालेल्या या मुलांनी महेशचे अधिकारी होण्याचे स्वप्न आपण साकारून या छोट्याशा खेड्यात महेशच्या विचारांचा व प्रेरणेचा नंदादीप तेवत ठेवला. अभ्यासिकेला त्याचेच नाव बहाल करून ‘स्व. बाळराजे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका’ उभारली.

आणखी >>

पुणे विद्यापीठाचे आता टीव्ही चॅनल!

पुणे। दि. २९ (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा आणि त्याचे सौंदर्य देशभरात घेऊन जाण्यासाठी पुणे विद्यापीठ सरसावले असून, त्याचे टीव्ही चॅनल लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या प्रस्तावाला विद्यापीठाने तत्काळ हिरवा कंदील दाखविला असून, असे टीव्ही चॅनल सुरू करणारे हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरणार आहे.
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या वतीने देशात नव्याने सहा ठिकाणी दूरचित्रवाहिन्या सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी स्वतंत्र दूरचित्रवाहिनी सुरू करण्याची तयारी असल्याचे पत्र पुणे विद्यापीठाच्या वतीने देण्यात आले आहे. विद्यापीठाने या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.’’
या चॅनलसाठी लागणारे सर्व कार्यक्रम विद्यापीठात तयार केले जातील व त्यांचे देशभरात प्रक्षेपण केले जाईल.
विद्यापीठातील एज्युकेशन अँड मीडिया रिसर्च सेंटर (ईएमआरसी)च्या माध्यमातून हे चॅनल सुरू करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व पायाभूत सुविधा विद्यापीठाकडे तयार आहेत. तसेच, हा प्रकल्प हाती घेतल्यास त्यासाठी एमएचआरडीकडून निधीही प्राप्त होणार आहे. त्यासाठी ईएमआरसीमध्ये दोन व मास कम्युनिकेशन विभागात एक असे स्टुडिओ व अद्ययावत तंत्रसामग्रीही तयार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या वतीने इतर सर्व प्रकारच्या सुविधा या चॅनलसाठी दिल्या
जाणार आहेत.

आणखी >>

प्राध्यापकांना नेट-सेट पात्रता हवीच

पुणे। दि. २६ (प्रतिनिधी)
राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीचे निकष विद्यापीठ अनुदान आयोगाने काही प्रमाणात शिथिल केले असले, तरीही व्याख्याता आणि सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी मात्र नेट-सेट बंधनकारक आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना कळवले आहे.
यूजीसीच्या काही बैठकांमध्ये पात्रतेच्या निकषांवर चर्चा करण्यात आली होती. त्यामध्ये त्यातील ठरावांचा आधार घेऊन काही शिक्षण संस्था जाहिरातींमध्ये नेट-सेट पात्रतेच्या निकषांचा उल्लेख करीत नसल्याचे दिसून आले होते. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगून यूजीसीने त्याविषयी विद्यापीठांना खडसावले आहे. यूजीसीच्या बैठकांमध्ये झालेले ठराव हा अंतिम निर्णय नाही. ती केवळ त्या त्या वेळी झालेली केवळ चर्चा आहे. त्यामुळे त्याच्या आधारावर कुणीही किमान पात्रतेचे निकष वगळून प्राध्यापकांची पदे भरू नयेत, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
व्याख्याता तसेच सहयोगी प्राध्यापकांच्या जाहिरातींमध्ये काही शिक्षण संस्था मुख्य नेट-सेटची अट वगळूनच जाहिराती देत असल्याचे दिसून आले आहे. देशातील काही विद्यापीठे हा प्रकार वारंवार व सर्रास करीत असल्याचेही दिसून येत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर यूजीसीने देशभरातील तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनाच उद्देशून पत्र पाठवले आहे. त्यामध्ये नेट-सेट पात्रतेची अट कोणत्याही परिस्थितीत शिथिल केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एखाद्या उमेदवाराकडे यूजीसी २00९ च्या नियमानुसार पीएचडीची पदवी असेल, तरच त्याला नेट-सेट पात्रतेतून वगळण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

- राज्यभरातील सुमारे दीड हजाराहून अधिक प्राध्यापकांनी त्यांना नेट-सेटच्या पात्रतेतून वगळावे व प्राध्यापकांचे सर्व लाभ त्यांना मिळावेत, अशी मागणी करून त्याचा पाठपुरावा केलेला आहे. यूजीसीने त्यासाठी पत्र दिले असल्याचा दावा या प्राध्यापकांनी केला होता.

- मात्र राज्य शासनाने हा प्रश्न अजूनही अधांतरी ठेवला असून, पुन्हा एकदा यूजीसीकडे पाठवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यूजीसीने पाठवलेल्या या पत्राचा आधार घेऊन या उर्वरीत नेट-सेट पात्रता नसलेल्या प्राध्यापकांचे काय होणार, असा प्रश्न आता पुढे आला आहे.

आणखी >>

शैक्षणिक कर्जाला मिळणार ७५% हमी!

नवी दिल्ली। दि. २४ (लोकमत न्यूज नेटवर्क)
उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणार्‍या तरुणांना एक खुशखबर आहे. शैक्षणिक कर्जाच्या ७४ टक्के रकमेला हमी देण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. परिणामी, शैक्षणिक कर्जाची प्रचलित प्रणाली अधिक सुलभ होतानाच कर्ज मंजुरीची प्रक्रियाही विनाविलंब होणार आहे.
चार लाखांच्या कर्जासाठी अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांना सह-कर्जदार व हमीदाराची गरज नसते. मात्र त्यावरील साडेसात लाखांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जाला हमीदार गरजेचा असतो. सह-कर्जदाराअभावी कर्ज वसुलीचा धोका लक्षात घेऊन खासगी बँका शैक्षणिक कर्ज देण्यास टाळाटाळ तर करतातच त्याचबरोबर इतर कर्जांपेक्षा त्यावरील व्याजाची आकारणीही जास्त दराने करतात. पण सरकारनेच जर ७५ टक्क्यांची हमी दिली तर कर्ज मंजुरी लवकरच होईलच, पण कर्ज उलच वाढल्यास व्याजदरात कपात होण्याचीही अपेक्षा बँकिगतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
सरकारी व खासगी बँकांना ७.५ लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी व नियमांतील विसंगती दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने डिसेंबरअखेर १0 हजार कोटींचा ‘क्रेडीट गॅरंटी फंड’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गृहनिर्माण तसेच छोटे व मध्यम उद्योजकांच्या फंडाच्या धर्तीवरच हा कोष तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही क्षेत्रांत सुलभ कर्ज पुरवठा होण्यासाठी एक तांत्रिक समिती नेमण्याचेही सरकारच्या विचाराधीन आहे.
बँकांनी मंजूर केलेल्या कर्जाच्या एक टक्का रकमेचे योगदान त्यांना दरवर्षी ‘क्रेडीट गॅरंटी फंड’साठी द्यावे लागणार आहे.

कर्जाचा मार्ग अधिक सुकर !
- शैक्षणिक कर्जाच्या कोषासाठी सरकार सुरवातीला ५00 कोटींचा निधी देणार.
- बँकांना या निधीच्या २0 पट म्हणजेच १0 हजार कोटींपर्यत कर्ज पुरवठा करता येईल.
- या कर्जाला सरकार ७५ टक्क्यांपर्यंत हमी देणार आहे.

1) बँकांच्या मुल्यमापनानंतर कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर होणार. ३१ मार्चअखेर शैक्षणिक कर्जाच्या रुपाने देशात
४९,0६९ कोटींचे कर्ज थकीत
2) मागील आर्थिक वर्षात शैक्षणिक कर्जाची थकबाकी एकूण कर्जाच्या ६ टक्के होती. कर्जवसुली न झाल्यास बँका ‘क्रेडीट गॅरंटी फंड’कडे नव्या योजनेमुळे दावा करू शकतील.

आणखी >>

कुरवलीत केली मुस्लिम बांधवांनी घटस्थापना

प्रशांत ननावरे।
दि. २0 (बारामती)
कुरवली (ता. इंदापूर) येथील मुस्लिम बांधवांनी घटस्थापना करून हिंदू- मुस्लीम ऐक्याचा आगळावेगळा संदेश दिला आहे. धार्मिक सलोखा जपणारा हा धार्मिक कार्यक्रम गेल्या २७ वर्षांपासून मोठय़ा श्रद्धेने जोपासला जात आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात फक्त चहापाण्यावर कडक उपवासाचे व्रत मुस्लिम बांधव, भगिनींनी स्वीकारले आहे.
नवरात्रौत्सवाबरोबरच शिवजयंती, मोहरम, ईद हे सण येथील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रितरित्या साजरे करतात. येथील (कै .) विष्णू थोरात यांनी जय दुर्गामाता मंडळाची स्थापना केली. त्याचा वारसा लालाभाई सय्यद, आयूब खान दस्तगीर सय्यद यांनी पुढे चालविला आहे. नवरात्रौत्सवापूर्वी दहा ते पंधरा दिवस अगोदर येथील मुस्लिम बांधवांची लगबग सुरु होते. घराची स्वच्छता करणे, कपडे धुणे, रंगरंगोटी करणे, घरे सारवण्यासाठी महिला, पुरुष पुढाकार घेतात.
घटस्थापनेदिवशी दुर्गामातेची दग्र्याशेजारीच प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर नऊ दिवस मुस्लिम बांधव नवरात्रौत्सवाचे कडक व्रत स्वीकारतात. रेहमान सय्यद, हैदर शेख, दस्तगीर सय्यद, शकुर सय्यद, फिरोज सय्यद यांनी उपवसाचे व्रत स्वीकारले आहे. अगदी चहापाण्यावरच नऊ दिवस उपवास धरला जातो. फलाहार, फराळही घेतला जात नाही. याशिवाय अनवाणी राहणे, अंथरुणाचा त्याग करणे, ही बंधने भक्तीभावाने पाळली जातात. मटण, चिकन, अंडी विक्रीचे व्यवसायही बंद ठेवले जातात.
तुळजापूरहून गेल्या २७ वर्षांपासून ज्योत आणण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. सकाळ, संध्याकाळ देवीची आरती केली जाते. त्यासाठी ग्रामस्थांचीही मोठी गर्दी होती. सर्व भाविक या उत्सवासाठी स्वयंस्फूर्तीने वर्गणी जमा करतात. देवीवरील श्रद्धेपोटी मुस्लीम बांधवांनी त्यांच्या व्यवसायाला ‘जय दुर्गा माता बॅन्जो पार्टी’ असे नाव दिले आहे. दिनेश पांढरे, राजेंद्र चव्हाण, दीपक खुडे, गणेश पांढरे, दादा मांढरे, भाऊ दणाने, शंकर थोरात, विजय चव्हाण, अंकुश चव्हाण, भीमराव दणाने, उदयकुमार तांबडे, अजय माने, संतोष पोळ, अर्जुन लोखंडे, संभाजी भागवत, बापूराव दणाने आदींचे या उत्सवासाठी महत्त्वाचे योगदान आहे.

आणखी >>

शाळेत क्रीडा विषयाची सक्ती हवी

सचिनने लिहिले कपिल सिब्बल यांना पत्र

नवी दिल्ली। दि. ९ (वृत्तसंस्था)
देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी अभ्यासक्रमात क्रीडा विषयाची सक्ती करावी, असे महान फलंदाज मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकर याने म्हटले आहे. त्यासाठी सरकारसोबत मिळून कार्य करण्यास तयार असल्याचे तो म्हणाला.
मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांना लिहिलेल्या पत्रात सचिन म्हणाला, भविष्यात मोठमोठय़ा स्पर्धांत भारताला नाव उंचवायचे असेल, तर याची सुरुवात शैक्षणिक संस्थांपासून करणे गरजेचे आहे. यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये खेळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर खेळाचा स्तर सुधारण्यास आराखडा तयार करण्याची तयारी तेंडुलकरने दर्शविली आहे.
सिब्बल म्हणाले, सचिन तेंडुलकरच्या मागणीचे स्वागत आहे. क्रीडा क्षेत्रात ज्या प्रकारे चीन, अमेरिका या देशांनी आपले वर्चस्व निर्माण केले, तशीच कामगिरी भारतीयांकडून भविष्यात अपेक्षित आहे. त्यासाठी सरकार विशेष पुढाकार घेण्यास
तयार आहे.

भविष्यात मोठमोठय़ा स्पर्धांमध्ये भारताला आपले नाव उंचवायचे असेल, तर याची सुरुवात शैक्षणिक संस्थांपासून करणे गरजेचे आहे.
- सचिन तेंडुलकर

मागणीसंदर्भात विस्तृत चर्चा करण्यासाठी सचिनला निमंत्रण पाठविले आहे. लवकरच सचिनच्या मागणीसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ.
- कपिल सिब्बल, मनुष्यबळ विकासमंत्री

आणखी >>

शिक्षकांना ‘ड्रेसकोड’

नागपूर। दि. २८ (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतील शिक्षकांनाही ‘ड्रेस कोड’ लागू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, काही शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला असला तरी २ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी होणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे, हे विशेष.
जिल्हा परिषदेतील शिक्षक शाळेत राहत नाही, शाळेच्या वेळात ते बाहेर फिरत असतात, या बाबत अनेक तक्रारी होत्या. त्यावर उपाय म्हणून शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्यात यावा, असा विचार पुढे आला. यामुळे जि.प. शिक्षक स्वतंत्ररीत्या ओळखले जातील, हा मुद्दाही मांडण्यात आला. शिक्षण विभागानेसुद्धा हा मुद्दा उचलून धरला. शिक्षण समितीच्या बैठकीत ड्रेस कोड बाबत निर्णय घेण्यात आला.
तीन दिवस सक्ती
शिक्षकांसाठी पांढरा शर्ट आणि काळा पॅण्ट तर महिला शिक्षकांसाठी ब्राऊन काठ असलेली सिल्वर रंगाची साडी असा गणवेश निश्‍चित
करण्यात आला. आठवड्यातील तीन दिवस सोमवार, मंगळवार आणि शनिवार या दिवशी ड्रेस कोडचे नियमित पालन करणे बंधनकारक राहील.

१५ दिवसपर्यंत शिक्षकांना ड्रेस शिवून घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. परंतु, त्यानंतर शिक्षकांना गणवेश सक्तीचा होईल.
- वंदना पाल, सभापती, शिक्षण समिती

आणखी >>

दप्तराचे ओझे होणार कमी

पुणे। दि. १७ (प्रतिनिधी)
पहिली - दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात आता भाषा आणि गणित या दोन विषयांचीच पुस्तके आणि एक शंभर पानी वही एवढेच ओझे असेल.
२0१३-१४मध्ये पहिली-दुसरीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. २0१४-१५मध्ये इयत्ता तिसरी, पाचवी आणि सातवीचा अभ्यासक्रम बदलेल, तर २0१५-१६मध्ये इयत्ता चवथी, सहावी आणि आठवीचा अभ्यासक्रम बदलेल आणि पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दप्तर हलके राहण्याचे वतरूळ पूर्ण होईल.

आणखी >>
  • 1