वाघाळे - अन्न हे पुर्णब्रम्ह...(किरण पिंगळे)

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे,
सहज हवन होते नाम घेता फुकाचे;
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह,
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म.

असा श्लोक एकीकडे रोज आपण जेवताना म्हणतो, पण जेवताना मात्र आपण किती अन्न वाया घालवतो याचा विचार करत नाही.

आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत.तसेच अन्न हेच जीवन आहे.अन्नदानासारखे पुण्य या जगात कुठलेही नाही.सर्व प्राणिमात्रांचे जिवंत राहण्याचे महत्त्वाचे  साधन म्हणजे अन्न होय.त्यामुळेच मानवाची सर्व संस्कृती,त्यांची विचार सरणी अन्नाभोवती फिरते.भाषेच्या दालनात एकदा  बघा ना...? सर्वत्र अन्नदेवतेचाच संचार दिसेल.आपले रोजचे जगणे,रोजचे बोलणे,रोजचा व्यवहार अन्नाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे उल्लेख झाल्याशिवाय रहात नाही.अगदी आपल्या बालपणापासून एक घास काऊचा एक घास चिऊचा हे वाक्य म्हणत म्हणत आपल अन्न खाऊन पोषण होत असत.सर्व सजीवांचा जीवच अन्नमय प्राण आहे.म्हणूनच संस्कृतीने या अन्नाला पूर्णब्रम्ह म्हंटले आहे.म्हणूनच अन्नाचा मान ठेवला पाहिजे.अपल्याला हवे तेवढेच अन्न घेणे हे तुमचे आमचे सर्व सजीवांचे कर्तव्य आहे.

आपण सर्वानी असे ठरविले पाहिजे कि अन्नाची नासाडी होणार नाही.पण आजही घरोघरी अन्न हे कचऱ्यात फेकले जाते.लग्न समारंभात होण्याऱ्या अन्नाची नासाडी पहावत नाही.अन्नाची नासाडी करू नका समाजातील गरजवंत लोकांना अन्न द्या.स्वतःच्या ताटातील दोन घास गरजू व्यक्तींना द्या.जो माणूस दुसऱ्याचा विचार न करता स्वतःचा विचार करतो.आणि स्वतःच्या ताटातील अन्न स्वतः न  खाता फेकुन देतो.तो खरंच फारच मोठं पाप करतो.तसेच प्रत्येक घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा होणार अपमान होय.एखादा माणूस जर जेवायला बसला तर तेवढ्यात घरात किरकिर सुरु होते.पती-पत्नी मुले किंवा आई-वडील ह्यापैकी कुणीतरी अचानक नको नको ते विषय काढतात मग शब्दाला शब्द वाढत जातात त्यामधून वाद निर्माण होतात.मग कुणीतरी त्या वादामधून जेवत्या ताटावरून उठून जातो.मग ते अन्न तसेच राहते मग त्या अन्नाची नासाडी होते अन्नाचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान होतो.

घरातील कोणताही कर्ता पुरुष किंवा स्त्री जेवायला बसले असता.त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका.त्यांना शांतपणे जेवण करू द्यात.जरी आपला एखादा शत्रू जेवण करत असेल तरीही त्याला सुखाने आनंदाने जेवण करू द्यात.त्याला जेवत्या ताटावरून रागाने उठणारी व्यक्ती किंवा त्याला तसे करण्यास भाग पडणारा कुणीही असो त्या दोघांनाही अन्नाचा शाप लागतो.मनुष्य राबतो पोटासाठी पण तेच अन्न जर आपण सर्व जण शांतपणे जर खात नसाल.तर त्या शेतकऱ्याच्या राबण्याचा काहीच उपयोग नाही.आपल्याला ज्योतिष शास्रात असे सांगितले आहे कि,अतिथी देव भव हि महती त्यासाठी वापरतात.

अन्नदान केल्याने आपल्या मधील सर्व दोष नष्ट होतात.स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते.आपल्या शरीरात जर अन्न पुरेशा प्रमाणात गेले नाही.तर माणूस दुबळा अशक्त होतो.त्याचे वजन कमी होते.त्या व्यक्तीमध्ये काम करण्याची ताकत राहत नाही.आणि तो आजारी पडण्याची शक्यता असते.आपले अन्न तीन घटकांपासून बनलेले असते.स्निग्ध पदार्थ,प्रथिने,पिष्टमय पदार्थ अशाच प्रकारे आपल्या शरीराला पाणी,मीठ,जीवनसत्वे,साखर अशा इतर पदार्थांचीही गरज असते.चांगल्या आरोग्याची व्याख्या जर सांगायची म्हंटल तर शरीराच्या पचनसंस्थेचे सुरळीत चालणारे कार्य आपल्या शरीरात जर अन्नाचे व्यवस्थापन चांगले होत असेल तर इंद्रिये आणि मन प्रसन्न राहते.

अन्न हे पूर्णब्रम्ह आहे.असे आपल्याकडे बऱ्याचदा म्हणत असले तरीही ते प्रत्यक्ष कृतीत उतरत नाही.विशेषतः विवाहासारख्या मंगल कार्यात व एखाद्या धार्मिक उत्सवात किंवा सार्वजनिक समारंभानंतरच्या जेवणाच्या वेळी अन्न वाया जाण्याचे प्रमाण मोठया प्रमाणावर असते.पूर्वीच्या काळी लग्नात पंगती बसायच्या जेवायला बसलेल्या लोकांना पदार्थ विचारून वाढले जायचे.वाढताना पूर्वीच्या काळी आग्रह करून वाढण्याची पद्धत होती.विशेषतः यजमान मंडळी पंक्तीत फिरून आग्रह करत असत.मात्र तेव्हा अन्न वाया घालवण्याचे किंवा वाया जाण्याचे प्रमाण खूप मर्यादेत होत.आग्रह करणार्याने कितीही आग्रह केला.तरीही घेणारा मात्र जेवढं अन्न पाहिजे तेवढंच अन्न पानावर घेत असत.आणि पानावर कधीही उष्ट टाकत नसे.

आताच्या जमान्यात बुफे सिस्टीमचा जमाना आलाय ते म्हणजे एक रांगेत सर्व पदार्थ मांडलेले असतात.आणि हातात ताट घेऊन अगदी मीठ लिंबापासून ते स्वीट डिश पर्यंत सर्व पदार्थ स्वतःनेच घ्यायचे असते.नाही म्हणल तरी आजकालच्या जमान्यात जेवणासाठी ८ ते १० पदार्थ नक्कीच असतात.बऱ्याच वेळा असेही होते कि पुढच्याने घेतले म्हणून माघचाही सर्व पदार्थ घेतो.आपल्याला नंतर कोणता पदार्थ पाहिजे असेल तर परत आपल्याला लायनीत यावं लागत.म्हणून बऱ्याच वेळा काही जण सढळ हाताने जास्त वाढून घेतात.एवढे सर्व पदार्थ पाहूनच अर्धे पोट भरते नंतर जेवणाचीही इच्छा रहात नाही.मग ते ताटातील बरेच पदार्थ तसेच राहतात नंतर ते अन्न फेकून दिले जाते त्याची नासाडी होते.हि अन्नाची नासाडी खरं तर आपल्या भारतासारख्या देशाला परवडणारी नाही पण तरीही मोठया प्रमाणावर अन्नाची नासाडी होतेच आपण बऱ्याच वेळा अन्न कचऱ्यात टाकून देताना जान ठेवली पाहिजे.उपाशीपोटी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची आणि उपासमारीने जीव जाणाऱ्या लाखो लहान मुलांची...!

मला या वर एक वाक्य आठवत खाऊन माजा पण फेकुन माजू नका...! पानातले सगळे संपल्याशिवाय उठायचे नाही.ताटात काहीही ठेवायचे नाही हि जुन्या काळी घरोघरी असणारी शिकवण उगाच नहुती.पूर्वीच्या काळच्या लोकांना अन्नाची किंमत माहिती होती.म्हणून त्या काळी जास्त झालेले अन्न पदार्थ किंवा उरलेले अन्न एखाद्या गरीब गरजू व्यक्तींना दान करायचे.त्यांच्या मुखी लावायचे पण आता ,मात्र असे दिसून येत नाही.आपण उरलेले अन्न कचऱ्यात टाकतो त्याची नासाडी करतो पण एखाद्या गरजवंत व्यक्तीला ते देत नाही.पण आता मात्र असे दिसून येते कि हॉटेलमध्ये लग्नसमारंभाच्या बुफे पद्धतीमध्ये किंवा  घरी असे मिळून लाखो टन अन्न अक्षरशः कचऱ्याच्या पेटीत टाकले जाते हि परिस्थिती फक्त आपल्या भारतातच नाही तर अख्या जगात हीच परिस्थिती आहे.

एकीकडे गरिबी उपासमार कुपोषण आणि दुसरी कडे अन्नाची प्रचंड नासाडी ह्या समस्या मोठया प्रमाणात भेडसावत आहेत.पुरेसे आणि सकस अन्न मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत मानवी अधिकार आहे.अन्नाची नासाडी हा मानव प्रजातीसमोरचा मोठा प्रश्न आहे.तयार झालेल्या अन्न पदार्थांपैकी एक तृतीयांश अन्न वाया जात असं नाही.ती पैशाची,पाण्याची,ऊर्जेची,जमिनीची आणि वाहतुकीची नासाडी असते.अन्न जर वाया घालवण्याऐवजी जर वृद्धाश्रमात,अनाश्रमात,अन्नदान करा.ज्यांना अन्न मिळत नाही,ज्यांना अन्नाची गरज आहे,अशांना जेवू घाला,त्यांच्या मुखी अन्न जाऊ द्या,अन्ननासारखे पुण्य दुसरे नाही.ह्या चांगल्या गोष्टी आपल्या समाजातील लोकांच्या आचरणात आल्या.तर आपल्या भारतातील अनेक जीव वाचू शकतात.

आपला भारत देश हा कुपोषितग्रस्त देश म्हणून तिसऱ्या क्रमांकावर आहे.या भारत देशात कितीतरी लोक दररोज भुकेने मृत्यू मुखी पडतात.तर काही लाखो लोक उपाशी पोटी झोपी जातात.म्हणून सर्व लोकांनी अन्न वाया जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची.कोणत्याही कार्यक्रमात आपल्याला लागेल तेवढेच अन्न ताटात घ्यायचं आपल्या कार्यक्रमात जर अन्न शिल्लक राहिले तर गोरगरीब लोकांना वाटावे.आपण जर आपल्या कार्यक्रमा करिता खूप पैसे खर्च करतो.मेहनत करतो तर आपण सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा आपल्या कार्यक्रमाचाच एक भाग समजून गरिबांना चांगले जेवण खाऊ घालण्याचे कार्य म्हणजेच पुण्य करा.आजच्या काळात ह्या भारत देशात अन्नाची गरज लाखो गरिबांना आहे.

तर कचऱ्यात हे अन्न वाया जाऊ न देता गरजवंताच्या मुखात हे अन्न पडू द्या अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली.अन्नदानाला आपल्या भारतात खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे.अन्नदान हेच श्रेष्ठदान मानलं जात.पण तरीही बऱ्याचदा आपण अन्न वाया घालवतो.अन्नाच्या प्रत्येक कणाकणावर प्रचंड मेहनत घेतलेली असते.अन्न आपल्या ताटात येईपर्यत अनेक लोकांनी आपला घाम गाळलेला असतो.त्यांची मेहनतही आपण मातीमोल करतो.अन्नाचा अपमान करणं म्हणजे साक्षात परमेश्वराचा अपमान असतो.त्यामुळे अन्नाची नासाडी होऊ नये असे प्रोत्साहन दिले पाहिजे.चांगले अन्न वाया घालवणे म्हणजे जीवन वाया घालवण्यासारखेच आहे.

किरण दिपक पिंगळे (रांजणगाव गणपती)
९३७३५४१३०८

संबंधित लेख