कोंढापुरी - डी. एल. नाना बनले यशस्वी उद्योजक!

कोंढापुरी येथील दत्तात्रेय लहानबा गायकवाड गायकवाड (डी. एल. नाना) हे यशस्वी आज यशस्वी उद्योजक बनले असून, तरुणांपुढे एक आदर्श ठेवला आहे. नानांचे शिक्षण अवघे तिसरीपर्यंत. मात्र, बुद्धीचातुर्याबरोबरच मनाच्या गोडव्याची उपजत शक्ती. नानांनी कोणत्याही कामाला कमी न लेखता कष्ट, प्रचंड मेहनत, धाडसी स्वभाव, जोखीम पत्करण्याची तयारी, या उद्योजकतेच्या गुणांचा अवलंब करून येथे श्रीराम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची सुरवात केली. मराठी माणसाने उद्योगात टाकलेले धाडसी पाऊल पाहून खासदार प्रकाश जावडेकर यांनी नानांच्या उद्योगाला भेट दिली. नानांच्या जिद्दीची प्रेरणा इतरांनाही मिळेल, असे श्री जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

नाना लहानपणीच मातृत्वाला पोरके झाले तर वडील लहानबा सालकरी म्हणून काम करायचे. नानांनी गावातील सहकारी दूध संस्थेत कर्मचारी म्हणून कामाला सुरवात केली. त्याचबरोबर पूर्वीच्या प्रसिद्ध लोकनाट्यांमध्ये गावातील मित्रमंडळींबरोबर मिळेल ते काम करत. काही काळ त्यांनी शासनाच्या फवारणी विभागातही काम केले. खडकवासला येथील एनडीएच्या परिसरातही त्यांनी रोजगारासाठी भटकंती केली. गावात पहिला कारखाना सुरू झाल्यानंतर या कारखान्यात मजुरांपासून ते रखवालदारापर्यंतची सर्व कामे केली. मात्र, चाकरी करण्यापेक्षा मालक बनण्याची त्यांची मनोमनत त्यांच्या मनात इच्छा होती. पुढे त्यांनी कंपनीतील कामगारांना डबे (जेवण) पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला. अवघ्या दोनशे रुपयांवर हा व्यवसाय सुरू केला. पत्नी उषा यांनी या व्यवसायाला साथ दिली. या व्यवसायातून नानांचे अनेक अधिकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध निर्माण झाले. ओळखीचे रूपांतर व्यवसाय वृद्धीसाठी झाले. दूरदृष्टी ठेवून त्यांनी 1998 मध्ये "माउली एंटरप्राइजेस'ची स्थापना करून कंपन्यांना कामगार पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला. आज यात सुमारे पाचशे कुशल व अकुशल कामगार काम करीत आहेत. यातील सुमारे दीडशे कामगार कायम आहेत आजही ते नानांना गुरू मानतात.

नानांच्या व्यावसायिक धडपडीला पुढे मुले अजय व विनय यांनी उत्तम साथ दिली. 2000 मध्ये "अजय ट्रान्स्पोर्ट' हा फर्म सुरू करून व्यवसायात आणखी यशस्वी पाऊल टाकले. एका गाडीपासून चोवीस गाड्यांपर्यंत व दोन क्रेन अशी व्यवसायाची व्याप्ती वाढविली. याचबरोबर त्यांनी तरुणांना स्वतःचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली. व्यवसायाचा आलेख दिवसेंदिवस वाढत राहिला. 2004 मध्ये त्यांनी "रणजित एंटरप्राइजेस' या फर्मची स्थापना केली. या मार्फत कारखान्यांना पॅकिंग मटेरिअल पुरविण्याचे काम केले. कामातील अचूकता, आत्मविश्‍वास व प्रामाणिकपणा हे ब्रीदवाक्‍य डोळ्यांसमोर ठेवून "राम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' या कंपनीची त्यांनी नुकतीच स्थापना केली आहे.रणजित एंटरप्रायझेसचा विस्तार करण्यासाठी अजय व विनय यांनी बदलत्या काळानुसार धाडसी पाऊल टाकून "पॉली प्लॅस्टिक मटेरिअल' निर्मितीला 2010 पासून सुरवात केली. व्यवसायाबरोबरच गावची सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या कुटुंबाने कुलदैवत खंडोबाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. नाना वारकरी संप्रदयातही आघाडीवर आहेत. तीन वर्षांपासून "आळंदी ते पंढरपूर' आषाढी पायी वारीतील माउलीच्या रथावर सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. गावातील हरिनाम सप्ताह नानांशिवाय अपुराच. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मुलांनी मित्रमंडळींच्या सहकार्याने "श्री बालाजी कॉर्पोरेट' ही सेवाभावी संस्था कार्यरत ठेवली आहे. आज रणजित एंटरप्राइजेस व अजय ट्रान्स्पोर्ट या उद्योगसमूहाचा वटवृक्ष वाढलेला असला तरी त्याच्या मुळाशी नानांच्या कष्टाची व घामाच्या झऱ्याची वाट वाहत आहे.
नानांच्या जिद्दीला सलाम!!!!

Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1