कवठे यमाई - यांत्रिक वस्तूंमुळे कुंभार व्यवसायास घरघर!

पूर्वी ग्रामीण भागासह शहरांमध्येही कुंभारांनी बनविलेल्या पारंपरिक वस्तूंना मोठी मागणी होती. खेड्यात तर सर्रास चुलींवर स्वयंपाक केला जात होता.  मात्र, यांत्रिक युगात गॅस, स्टोव्ह, हिटर, फ्रिजच्या सर्रास वापर होऊ लागल्याने मातीचे डेरे, चुली, शेगड्या, रांजण या कुंभारांनी मेहनतीने व हाताने बनवलेल्या वस्तूंची मागणी कमी होऊ लागली आहे. यांत्रिक उपकरणांमुळे कुंभार बनवत असलेल्या वस्तूंना मर्यादा पडत चालल्या आहेत. एके काळी भरभराटीस असलेल्या कुंभारांच्या या व्यवसायास घरघर लागली आहे, अशी खंत येथील चंद्रभागा फकिरा कुंभार यांनी व्यक्त केली.

उन्हाळ्याचे दिवस जवळ आले की, गावोगावच्या कुंभारवाड्यात मातीचे डेरे, रांजण, चुली, शेगड्या बनविण्यासाठी कुंभारांना खूप मेहनत घ्यावी लागे. ग्रामीण भागा बरोबरच शहरी भागातील घराघरांतून कुंभारांनी बनविलेल्या या वस्तूंना जोरदार मागणी असायची. काळ बदलत गेला मातीच्या वस्तूंची जागा यांत्रिक तयार वस्तूंनी घेतली. कुंभारांनी बनविलेल्या मातीच्या वस्तूंना पर्यायाने मागणी कमी होत गेली. त्यामुळे या समाजातील अनेक जणांना वेगवेगळी कामे शोधण्याची वेळ आली. पूर्वी सारखे महत्त्व आज मातीपासुन बनविलेल्या वस्तूंना न राहिल्याने कुंभार समाजातील सर्व सामान्यांच्या हालअपेष्टा सुरू झसल्या असल्याची खंत चंद्रभागा कुंभार यांनी व्यक्त केली. एकंदरीत यांत्रिक युगात लोप पावण्याच्या अवस्थेकडे निघालेल्या कुंभार व्यवसायातील कुंभार काम करणा-या सर्वसामान्य कुटुंबांना शासनाचा आधार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाने अशा कुटुंबीयांचे सर्वेक्षण करून त्यांना चरितार्थ चालविण्यासाठी वेगळा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून ठोस मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असेही चंद्रभागा यांनी सांगितले.

पती फकिरा व मुलगा गोपीनाथ जरी त्यांना या पारंपरिक कुंभार कामात मदत करीत असले तरीही सध्यस्थितीत कुंभार व्यवसायातून मिळत असलेल्या पैशांमधून घरखर्चाचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून, त्यांना इतर जोड व्यवसाय करणे क्रमप्राप्त ठरले आहे.

- सुभाष शेटे

- हे सदर वाचकांसाठी मुक्त व्यासपीठ आहे. आपण केलेल्या कविता, किस्से, गाव, शाळेविषयी माहिती या सदरातून प्रसिद्ध केले जातील. आपण फक्त आमच्याकडे आपली माहिती ई-मेल वर पाठवावी.
संपर्क- shirurtaluka@gmail.com, अथवा गणेश पवार- ९७६६७३२७२९

संबंधित लेख


वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य