हिवरे - 'विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले' - सुरेखा पुणेकर

पूर्वी, वडील बैलगाडीत संपूर्ण महाराष्ट्रात आपला फड घेऊन जात. ते स्वतः उत्तम नट, नाचे अन फडमालक होते. सर्व भूमिका ते लीलया निभावत. वडिलांचे हेच संस्कार आम्हा बहीणींवर कधी झाले हे समजले नाही. मी, अगदी छोटी असताना वडिलांच्या तमाशात नृत्य करायला लागले. प्रेक्षक कौतुकाने यात्रेतल्या 'शेव-रेवडी'च्या माळा गळ्यात घालायचे. पुढे तीच अंगातील नृत्याची लय, ऊर्मी अन गती स्वस्थ बसून देत नसल्याने वडीलांनंतर आम्ही दोघी बहिणी त्याकाळी प्रचंड लोकप्रिय असलेल्या दत्तोबा तांबे यांच्या तमाशा फडात गेलो. त्या तमाशातील आम्ही दोघी बहींनींचे महत्त्व पाहता आम्ही स्वतःच फडमालक होण्याचे स्वप्न पाहिले. पुढे साहेबराव नांदवळकर व चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशात केवळ 'शिध्यावर' काही दिवस नृत्यसेवा करून सन 1986 ला "लता-सुरेखा पुणेकर' नावाने स्वतःचा फड सुरू केला.

गावाकडून सहा हजार उसने व घरातील दाग-दागिने विकून पंचवीस हजार रुपये एकत्रित करून फड उभा केला. आमचा प्रयोग नंदूरबार जिल्ह्यातील डांगसौंदाना (सुरतच्या सीमेजवळील गाव) येथे ठरला. त्याच दिवशी त्याच गावात त्याकाळी बऱ्यापैकी नावलौकिक असलेल्या शंकर कोतुरे यांच्या फडाचाही कार्यक्रम त्याच गावात पलीकडच्या पेठेला होता. आमच्या फडाचा दबदबा निर्माण झाल्याने गण-गौळण, रंगबाजी अन वगाची सुरवात होण्याच्या दरम्यानच कोतुरेंच्या काही कार्यकर्त्यांची मारामारी नेमकी आमच्या तिकीट खिडकीवर झाली. या मारामारीत आमच्या फडातील एक बिगारी युवक गंभीर जखमी झाला. या युवकाची परिस्थिती एवढी गंभीर होती की, तो मृत पावल्याचा सगळ्यांचाच समज झाला. मी तर पुरती हबकून गेले. जाहिरातीसाठी फिरणाऱ्या आमच्याच जीपला बोलावून घेतले. जीप आली अन त्या मुलाला गाडीतही ठेवले. चालकाने जीप हळू-हळू मागे घ्यायला सुरवात केली. काही क्षणातच जीप मागे कुठेतरी खोल खड्ड्यात जाऊन पडली.

गाडीत चालक, जखमी मुलगा, ढोलकीवाला अन दोन बिगारी असे गाडीत होते. मोठा गोंधळ निर्माण झाला. गावातील लोक जमा झाली अन म्हणू लागली "अहो मालकीनबाई मागं दोनशे फूट दरी आहे, तुम्ही काय झोपंत चालकाला सांगितलं का काय..?' भर मध्यरात्र झाली असताना हा सगळा 'तमाशा' घडल्यावर आपण आयुष्यातून उठतो की काय, याची जाणीव मला त्यावेळी झाली. बहीण लता मला धीर देत होती. युद्ध पातळीवर स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं काम सुरू झालं. पाच पैकी वरती किती परत येतात याकडे लक्ष लागले होते.

काही वेळातच पहिल्यांदा चालक व्यवस्थित चालत वर आला. काही वेळाने ढोलकीवाला असं एकेक करीत चौघेही वर आले. विशेष म्हणजे जो जखमी होता तो ही अस्ताव्यस्त चेहऱ्याने वर आला. मी आणि लता एकमेकींकडे पहातच राहिले. आम्ही सगळ्यांनी पाच जणांना किती लागलंय काय याची चौकशी केली अन जवळच्या दवाखान्याची चौकशी करीत असताना पहाटचं तांबडं उजाडलं.

रात्र कशी गेली कळलही नाही. गावकऱ्यांनीही बैलगाडीच्या मदतीने जीपगाडी वर काढली. ग्रामस्थांनी गावातील म्हसोबाला नारळ न फोडल्याने झाल्याचे सांगितले. वास्तवात जे घडले ते मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. या प्रसंगाच्या निमित्ताने एवढेच समजले की, "मला घडविण्यासाठीच त्या विश्‍वनिर्मात्याने हे सर्व काही घडविले होते. असे काही अचंबित व अघटित घडविले नसते तर कदाचित आजची यशस्वी "सुरेखा पुणेकर' नक्‍कीच यशस्वी म्हणून संपूर्ण महाराष्ट्‍राला दिसली नसती.

- देवेंद्र पचंगे

- हे सदर वाचकांसाठी मुक्त व्यासपीठ आहे. आपण केलेल्या कविता, किस्से, गाव, शाळेविषयी माहिती या सदरातून प्रसिद्ध केले जातील. आपण फक्त आमच्याकडे आपली माहिती ई-मेल वर पाठवावी.
संपर्क- shirurtaluka@gmail.com, अथवा गणेश पवार- ९७६६७३२७२९

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही