मलठण - बुलेटचा वापर शेतावर औषध फवारणीसाठी!

लठण येथील प्रकाश बबनराव गायकवाड या तरुण शेतक-याने शेतीतील फळबागा व पिकावर औषध फवारणी करण्याकरिता एक वेगळी कल्पकता वापरली आहे. स्वतःच्या बुलेट मोटरसायकलला इंजिन जवळ आल्ट्रेशन करीत अत्यल्प खर्चात एसटीपी फवारणी यंत्र जोडून शेतीस फवारणी करण्याची पद्धत शोधून काढली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तो या पद्धतीने आपल्या शेतीवर व फळबागेवर औषध फवारणी करीत असून, फवारणी झाल्या बरोबरच काही मिनिटात हे यंत्र बाजूला काढून बुलेटचा वापर करता येत असल्याचे प्रकाशने सांगितले.

कवठे येमाई-मलठण रोड नजीकच्या गायकवाड वस्तीवरील प्रकाश या पदवीधर शेतकरी तरुणाने आपल्या एकत्रित कुटुंबातील बागायती शेती व फळबागांना लागणारी सततची औषध फवारणीसाठी लागणारी महागडी औषध फवारणी यंत्र, मजुरांची भेडसावणारी समस्या व त्यासाठी येणारा वारेमाप खर्च लक्षात घेत दोन वर्षांपूर्वी त्याच्याकडे असलेल्या चालू व उत्तम स्थितीतील डिझेलवर चालणा-या मोटार सायकलला आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करीत फवारणी साठीचा एसटीपी पंप जलद जोडता व काढता येईल अशी रचना बुलेट मोटारसायकलला करून घेतली. त्यासाठी त्याला जेमतेम एक हजार रुपये खर्च आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून आपल्या संपूर्ण बागायती शेतीस व फळबागेवर याच पद्धतीने फवारणी करीत आहे.या कामी त्याचा ७ वीत शिकणारा मुलगा जय व भाऊ नीलेश यांची मदत मिळतेय.

एरवी अशा प्रकारच्या मोठ्या शेतीतील पिकांवर फवारणी करण्या करिता डिझेल इंजिन किंवा विजेवर चालणा-या मोटारीचा सहारा घ्यावा लागतो. त्यासाठी खर्च पण मोठ्या प्रमाणात येतो. विजेची वेळेवर अनौपल्ब्धता, मजूर टंचाई या सर्वच गोष्टींचा सामना शेतक-यांना करावा लागतो. प्रकाशने डिझेल बुलेटला जोडता येणारे फवारणी यंत्राचे तंत्र शोधत एक तासात जेमतेम ३० रुपयांच्या डिझेलच्या खर्चात त्याच्या दीड एकरफळबागेतील भगवा जातीच्या  ६०० डाळिंबाच्या झाडांवर फवारणी करता येते. त्यामुळे अत्यंत कमी खर्चात, कमी श्रमात वेळेची बचत होत व फवारणी ही वेगवान होत असल्याने समाधान मिळत असल्याचे त्याने सांगितले.

दुष्काळी परिस्थितीत ही त्याने आपल्या विहिरीतील उपलब्ध पाण्यावर ठिबक सिंचन राबवून झाडांच्या थेट बुंध्याजवळ पाणी कसे पाहचेल याची पूर्ण दक्षता घेतली आहे. फळबागेचा आगामी काळात पहिलाच तोडा होणार असून, फळबागेची योग्य निगा राखल्याने व वेळोवेळी रोग प्रतिबंधक औषध फवारणी करीत असल्याने कमीत कमी सहा लाख रुपयांचे उत्पन्न हमखास मिळणार असल्याचे प्रकाशने सांगितले.

- सुभाष शेटे, ९४२३०८३३७६, ९९७५६७४२८६

संबंधित लेख

  • 1