जांबूत - सोनाली यांची व्यवसायातील धाडसी जिद्द!

शारीरिक दृष्ट्या कष्टप्रद व मेहनतीच्या कामात सर्वस्वी पुरुषांचीच मक्तेदारी आपणास दिसून येते. पण काही महिला विशेषतः ग्रामीण भागातील धाडसी व मेहनत घेणा-या महिला ही पुरुषांचीच मक्तेदारी असणा-या व्यवसायातून जिद्दीने काम करत आपल्या प्रपंचाचा गाडा यशस्वी चालवत आहेत. याचेच एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जांबुत येथील सोनाली बबन जोरी ही विवाहित महिला.

गेल्या पाच वर्षांपासून जांबूत येथे दुचाकी व चारचाकी गाड्यांचे वॉशिंग व ग्रिसिंगचे काम व घर सांभाळत आपल्या पतीच्या बरोबरीने जिद्दीने काम करून प्रपंचास चांगलाच हातभार लावत आहेत. सोनाली यांची व्यवसायातीतील धाडसी जिद्द समाजातील इतर महिलांनाही निश्चितच प्रेरणादायी ठरू शकते.

जांबूत बस स्टँड जवळच फाकटे रोडवर बबन जोरी गेल्या १० वर्षांपासून दुचाकी व चारचाकी गाड्यांचे वॉशिंग व ग्रिसिंगचे काम करत आहेत. त्यांचे शिक्षण जेमतेम ८ वी पर्यंतचं झालेले. पत्नी सोनालीने मात्र १० पर्यंत शिक्षण घेतले आहे. सोनालीच्या आई वडिलांच्या घरी कुठल्याही प्रकारच्या व्यवसाय नसल्याने कोणत्याच व्यवसायातील कुठली ही माहिती अथवा अनुभव हाताशी नाही. पण अंगी असणारी जिद्द, मेहनत, कष्ट करण्याची मनापासून असणारी तयारी याच गुणांच्या जोरावर सोनालीने ५ वर्षांपूर्वी पतीच्या या व्यवसायात हातभार लावायचा संकल्प केला. स्वकष्टातून उत्पन्नाचा श्रोत कसा निर्माण होईल याचा विचार करीत पतीच्या व्यवसायात घर सांभाळत सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हातभार लावण्यास सुरवात केली.

सुरवातीस एक महिला असल्याने या कष्टदायक व्यवसायात थोडाफार त्रास व्हायचा, पण पती बबन यांची भक्कम साथ व वेळोवेळी योग्य मार्गदर्शनामुळे आज या व्यवसायात भरारी घेतली आहे. व्यवसायातून दिवसाला सुमारे एक हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे सोनाली अभिमानाने सांगते. आम्ही पति-पत्नी जरी कमी शिकलेलो असलो तरी आमच्या दोघा पती-पत्नीतील प्रापंचिक व व्यावसायिक समन्वय कायम ठेवत आमच्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित करणार असल्याचे सोनालीने सांगितले.

- सुभाष शेटे, ९४२३०८३३७६, ९९७५६७४२८६

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही