ढोकसांगवी - विवाहातील सत्काराची रक्कम अनाथ आश्रमाला!

विवाहातील सत्कार समारंभ व अनाठायी खर्चाला फाटा देत सुमारे ३१ हजार रूपयांची रक्कम अनाथ आश्रमाला देऊन, येथील पाचंगे कुटुंबियांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

येथील प्रगतिशील शेतकरी नामदेव पाचंगे यांची कन्या सोनाली व रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते सुदाम पवार यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर यांच्याशी नुकताच साखरपुडा झाला. वेळी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी हजेरी लावली होती. यावेळी या कार्यक्रमातच पाचंगे कुटुंबियांकडून विवाह समारंभातील सत्कार व अनाठायी खर्चाला फाटा देत सुमारे ३१ हजार रूपये निधी सपकाळ यांच्या सासवड (ता. पुरंदर) जवळील "ममता बालसदन' या अनाथ आश्रमाला भेट दिली.

आदर्शशाळा कर्डेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्ताञेय सकट यांनी शाळेच्या कॄतज्ञता निधीतून तीन हजार १०० रूपये निधीही यावेळी सपकाळ यांच्याकडे सुपूर्त केला. सपकाळ यांनी यावेळी पाचंगे कुटूंबियांचे ऋण व्यक्त करीत, या कुटूंबियांचा समाजाने आदर्श घ्यावा असे आवाहन केले.

सपकाळ यांच्याकडे हा संपुर्ण निधी तालुका मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष बाबुराव पाचंगे यांनी सुपूर्त केला. यावेळी बाजार समितीचे संचालक मानसिंग पाचुंदकर पाटील, शिरूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, राजेश लांडे, प्रमोद गायकवाड, ढोकसांगवीचे सरपंच मल्हारी मलगुंडे पाटील, उपसरपंच भाऊसाहेब पाचंगे, माजी सरपंच संभाजी मलगुंडे, खंडू मलगुंडे, पंढरीनाथ मलगुंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दशरथ पाचंगे, देविदास बत्ते, उत्तम व्यवहारे, कारभारी भंडारे आदी उपस्थित होते.

दरम्यान, या विधायक उपक्रमाचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे, राजेंद्र गावडे, भिमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, पंचायत समितीच्या सदस्या मनिषा पाचंगे, दिपाली शेळके व पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी कौतुक केले.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1