शिरूर - शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...

तो पहिला दिवस शाळेचा आईचा हात सोडून जाताना,
भल्या मोठ्या वर्गात भांबावून आईकडे पाहताना,
कुणीच नाही इथे आपले असेच वाटत आसताना,
हळुवार गुरुजींनी पाठीवर हात फिरवताना,
शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...आज परत हे सगळे लिहिताना |१|

हळू हळू एक एक मुळाक्षर हात धरून गिरवताना,
एक एक चेंडू मोजत उजळणी शिकतांना,
जास्त मिळते सुकडी म्हणून पाढे पाठ करताना,
बघू नाही कोणी म्हणून चुकलेले पान फाडताना,
शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...आज परत हे सगळे लिहिताना |२|

मला तुजीच पाटी पाहिजे असा तिच्याकडे हट्ट करताना,
देते पण मलाही तुझी पाटी दे असा तिनेही दम भरताना,
ये डब्बा मात्र एकत्रच खाऊ अशी लडिवाळ साद मिळताना,
दोन घास जास्त खाल्ले तू अशी रडवे सूर ऐकताना,
शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...आज परत हे सगळे लिहिताना |३|

लपून लपून वर्गात चिंच बोरे चोरून खाताना,
सांगू नये कुणी गुरुजीना म्हणून थोडी लाच देताना,
तरी पकडले जाऊन कोपऱ्यात ओणवे उभे राहताना,
गुरुजी आता सोडाना परत नाही अशी थाप मारताना,
शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...आज परत हे सगळे लिहिताना |४|

पावसात चिंब भिजत शिवणापाणी खेळताना,
रख्खा उन्हामध्ये रंगीत बर्फाचा गोळा खाताना,
कधी अक्कल येईल रे तुला आईचा धपाटा खाताना,
शाळा बुडेल रे उद्या बरे हो म्हणून आईने रात्र जागताना,
शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...आज परत हे सगळे लिहिताना |५|

एक एक दिवस चंद्राच्या कलेप्रमाणे हसणारा,
दिवसामागून दिवस रोपट्याचे झाड होताना,
अदज्ञानचा काळा मळभ हळू हळू सरताना,
तुज्याकडून मिळणारे दान पदरी सामाऊन घेताना,
शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...आज परत हे सगळे लिहिताना |६|

वरचा वर्ग सर करत जुने गुरुजन दुरावताना,
पुढच्या वर्गात नाव काढ बाळ असा आशीवार्द घेताना,
निरोपाची वेळ येत तेव्हा हळूच डोळे पानावताना,
किती हे मोठे उनाड जग त्यात भीतीने पाउल टाकताना,
शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...आज परत हे सगळे लिहिताना |७|

कॉलेजचा कट्टा मित्रांची थट्टा आठवणी दिसतात विरताना,
शाळा संपली पाटी फुटली सगळेच दूर दूर जाताना,
पुन्हा मात्र नक्की भेटू अशी खोटी समजूत घालताना,
गेले ते दिवस आता फक्त आठवणी सारखे जिभेवर घोळताना,
शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...आज परत हे सगळे लिहिताना |८|

नवी नोकरी नवी चाकरी स्वताचीच गुलामी करताना,
सगळे साले खोटारडे कोणच नाही भेटत असेही दूषण लावताना,
एक मुलगा एकाच मुलगी अशी सोनेरी स्वप्ने पाहताना,
एकच कार आणि एकच बंगला पण अख्खे आयुष्य पणाला लावताना,
शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...आज परत हे सगळे लिहिताना |९|

कोणाच नाही सोबतीला पण तरीही उसने अवसान आणताना,
मुलगा गेला परदेशी मुलगी झाली परकी तरी उगीचच गालात हसताना,
खरे सुख शाळेनंतर कुठे कुठे होते त्याचा शोध परत घेताना,
हातात मात्र मोकळी झोळी जुन्याच आठवणी कुरवाळताना,
शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...आज परत हे सगळे लिहिताना |१०|

खूपच लवकर घडले सगळे थोडा आजून वेळ जर असताना,
मी खरच धमाल केली असती स्वतःचीच समजूत काढताना,
आता काही होत नाही खूप मज्जा होती आम्ही शाळेत असताना,
का दिले देवा मोठेपण लहानच बरे होतो अशी आळवणी करतांना,
शाळा...तुझी खूपच आठवण येतेगं...आज परत हे सगळे लिहिताना |११|

- अशोक खेडकर, ९८६०६१११४६
ashok.khedkar@gmail.com


संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य