रांजणगाव गणपती - पुणे-नगर महामार्ग अक्षरश: मॄत्युचा सापळा...

पुणे-नगर महामार्ग हा अक्षरश: मॄत्युचाच सापळा बनला आहे. या रस्त्यावर दररोज विविध ठिकाणी छोटे-मोठे अपघात होताना दिसतात. आजपर्यंत अनेकांना आपला प्राण गमावावा लागला आहे. या रस्त्यावरील फलकेमळा, बोरहाडेमळा, कारेगाव सहयाद्री चौक, खंडाळमाथा, कोंढापुरी, कासारी फाटा ते शिक्रापुर दरम्यानचा परिसर, एल ऍण्ड टी फाटा, सणसवाडी येथे तर आठवडयातुन एकदा तरी अपघात होत आहे. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यावरील कासारी फाटा ते शिक्रापुरचा 24 वा मैल हा परिसर तर अक्षरश: मॄत्युचा सापळाच बनलेला दिसुन येत आहे. या परिसरात गेल्या वीस दिवसात पाच ते सहा अपघातांमध्ये तेरा जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

गेल्या पाच वर्षात शंभरपेक्षा अधिक निष्पाप लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यातील बहुतांश अपघात हे दिवसा झालेले आहेत. मागील महिन्यात या परिसरातील 24 वा मैल येथे एक मोटार अचानक पलटी होवून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मॄत्यु झाला. कासारी फाटयावर एक पिकअप अचानकपणे रस्ता ओलांडत असताना येथून जाणाऱया वाळूच्या ट्रकने तिला धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी15 जून रोजी कामावरून घरी जात असताना एका दुचाकीस्वार कामगाराला पाठीमागुन भरधावपणे वेगाने जाणारया अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये कामगाराचा जागीच मॄत्यु झाला, तर सोमवारी 17 जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हॉटेल अर्चनासमोर एका पोलीस अधिकारयाच्या सफारी गाडीने नादुरूस्त कंटेनरला जोरदार धडक दिल्याने त्यात पाच जणांचा जागीच मॄत्यु झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

या रस्त्यावर असणारी मोठया प्रमाणात अवैध प्रवासी वाहतुक, नादुरूस्त वाहने कशाही पध्दतीने लावणे, वेगमर्यादा न पाळणे, वाहन बेशिस्तपणे चालविणे, शिस्तीचे पालण न करणे यामुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील हॉटेल, पेट्रोलपंप येथे तोडण्यात आलेले अनधिकॄत रस्ता दुभाजक आणि या सर्व बाबींकडे असणारे महामार्ग पोलीसांचे दुर्लक्ष यामुळे या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले दिसत आहे. या महामार्गावर पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे एवढे अपघात होत असल्याचे चिञ आहे. माञ, याकडे महामार्ग पोलीसांचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. महामार्ग पोलीसांनी पुणे-मुंबई रस्त्यावरील वाहतुकीप्रमाणेच या रस्त्यावरील बेशिस्तपणे चालणारया वाहतुकीवर वेळीच आळा घालण्याची गरज आहे. अन्यथा तसे न झाल्यास यापुढे तर या रस्त्याने प्रवास करणे सर्वसामान्य नागरिकांना जिकरीचे बनणार आहे.


- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य