कवठे यमाई - कल्पक बुद्धितून बनविले झाडू बनविण्याचे यंत्र !

'सोन्याच्या पावलांनी, लक्ष्मीच्या रूपाने दिवाळी आली घरा...' या उक्ती प्रमाणे घरी आलेल्या नवीन सुनबाईंचे दिवाळी सणास आपल्या घरी असणे जितके महत्त्वपूर्ण आहे, तितकेच झाडूच्या रूपात नवीन लक्ष्मी घरी आणून दिवाळी सणाच्या लक्ष्मीपुजनाच्या दिवशी प्रत्येक घरात तिचे पूजन करणे ही परंपरा, रितिरिवाजा नुसार महत्त्वपूर्ण मानली जाते. प्रत्येक घरातून झाडूच्या साहाय्याने साफसफाई, स्वच्छता केली जाते. ज्या घरात सदैव स्वच्छता असते तेथे सदैव लक्ष्मीचा सहवास लाभतो. म्हणूनच झाडूच्या रूपात असणा-या या साक्षात लक्ष्मीस घराघरांतून अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे कवठे येमाई येथील मातंग वस्तीतील (लक्ष्मी) बनवणारे रमेश मामा साठे, सुदाम पंचरास यांनी सांगितले.

हिंदू संस्कृतीत सर्वांत भव्य व थाटामाटात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीतील पाडवा, भाऊबीज या दिवसाबरोबरच लक्ष्मी पुजनाच्या दिवसास अनन्य साधारण महत्त्व आहे. घरातील धनधान्यांसह संपत्ती, वस्तूंचे पूजन व झाडूच्या रूपातील लक्ष्मीचे पूजन कुटुंबातील सर्वच सदस्य या दिवशी आवर्जून करतात. कवठे येमाई येथील मातंगवस्तीतील साठे, पंचरास यांच्या दहा ते बारा घरातून पारंपरिक पद्धतीने चालत आलेला लक्ष्मी (झाडू) बनविण्याचा उद्योग आज ही अव्याहतपणे सुरू आहे. सध्यातरी या वस्तीतील घराघरांतून दिवाळीस लक्ष्मी पुजनास लागणा-या लक्ष्मी बनविण्याचे काम जोरदार सुरू आहे.

रमेशसाठे या जेमतेम आठवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मातंग समाजातील तरुणाने नोकरीच्या मागे न लागता आपला पारंपरिक लक्ष्मी (झाडू) बनविण्याच्या व्यवसायावरच आपले लक्ष केंद्रित करून इतरांपेक्षा वेगळे, आकर्षक, टिकाऊ झाडू बनवत परिसरातील गावातून चांगलीच ख्याती मिळविली. हे काम करतानाच आपला प्रपंच जेमतेम परिस्थितीतून चांगल्यापैकी स्थितीत आणला. वडिलांचे छत्र लवकरच हरपल्याने घरची सर्वच जबाबदारी रमेश यांच्यावर पडली. जिद्द, चिकाटी, मेहनत व उत्तम प्रकारच्या, विविध आकाराच्या मजबूत झाडू बनविण्याची कलात्मकता या जोरावर गेल्या पंचवीस वर्षांपासून ते या व्यवसायात टिकून आहेत. उत्तम टिकाऊ झाडू बनविण्याकामी त्यांची पत्नी पारूबाई व घरातील इतर सदस्य मदत करतात. दिवाळी अगोदरच्या एक महिन्यात अहोरात्र कष्ट घेत साधारणतः दीड हजार लक्ष्मी (झाडू) लक्ष्मीपुजनाच्या सणा पर्यंत विकल्या जात असल्याचे ते सांगतात.

या एक महिन्याच्या कालावधित स्वतःच्या कलात्मकतेतुन बनविलेल्या झाडू विकून खर्च वजा जाता सुमारे पंधरा ते वीस हजार रुपये शिल्लक राहतात. वाढती महागाई व यांत्रिक युगात तयार होणा-या नवनवीन झाडूंच्या तुलनेत हाताने बनविलेल्या या झाडूंना लक्ष्मी पुजनाच्या सणाबरोबरच एरवीही व ग्रामीण भागातील ग्राहकांबरोबरच शहरी भागातील ग्राहकही आवर्जून पसंती देत असल्याने आजही हा व्यवसाय ब-यापैकी तग धरून आहे. साठे यांनी बनविलेल्या तीन फोडीच्या झाडूंना शिरूर तालुक्यात चांगली मागणी असते.

बदलत्या काळात हाताने झाडू बनविण्याच्या कामात तत्परता यावी म्हणून आपल्या कल्पक बुद्धीने स्वतंत्रातुन त्याला यांत्रीकतेची जोड देण्याचा यशस्वी प्रयत्न साठे यांनी यावर्षी केला आहे. मित्राची झाडू बनविण्याच्या कामातील वेगळी कल्पकता पाहून अशोक रेणके यांनी साथे यांना त्या कामी आर्थिक मदतीचा हात दिलाय. साठे यांनी स्वतःच्या कल्पक बुद्धितुन या वर्षी बनविलेल्या झाडू हाताने लोखंडी दात्र्या असलेल्या ब्रशने विरण्या ऐवजी विजेवर चालणारे तयार झाडू विकण्याचे यंत्र स्वतःच घरी तयार केले आहे. त्यासाठी त्यांना मात्र पाच हजार रुपये खर्च आला आहे. एरवी हाताने एक झाडू विरण्यासाठी लागणारा दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी त्यांनी तयार केलेल्या यंत्रावर झाडू विरण्यासाठी जेमतेम दोन मिनिटांचा कालावधी लागतोय. त्यामुळे सणासुदीच्या काळात चांगली मागणी असलेल्या झाडू बनविण्याच्या कामात जलदता आली आहे. दोन दिवसांत हाताने बनविलेल्या साठे ते सत्तर झाडूंना विरून तयार करण्यासाठी जेथे दोन दिवसांचा कालावधी लागत होता तेच काम त्यांनी बनविलेल्या झाडू विरण्याच्या यंत्रामुळे एका दिवसात होऊ लागले आहे. श्रम व वेळेची तर बचत होते आहेच पण झाडू पण जलद तयार करण्याच्या कामास गती मिळत आहे. त्यांचा हा उपक्रम मातंग समाजातील झाडू तयार करणा-या इतर कारागिरांना निश्‍चितच आदर्शवत आहे. बाराही महिने झाडूच्या व्यवसायातून उत्पना मिळत असल्याने समाजातील इतर ही तरुणांनी जीवनातील नैराश्‍य दूर करून निर्व्यसनी राहिले व जिद्‌द्‌, चिकाटीने मेहनत घेतल्यास त्यांना या व्यवसायातून प्रापंचिक जीवनात आर्थिक आधार निश्‍चितपणे निर्माण होईल अस विश्‍वास रमेश साठे यांनी व्यक्त केला आहे.

- सुभाष शेटे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य