करडे - कारेगाव ते कर्डे रस्ता बनला ‘मॄत्युचा सापळा’

शिरूर तालुक्यातील कारेगाव ते कर्डे रस्ता ‘मॄत्युचा सापळा’ बनला असल्याचे उघड झाले आहे. तालुक्यातील महत्वपुर्ण अशा या रस्त्यावर गेल्या तीन वर्षांच्या काळात दुचाकी व कंटेनरच्या झालेल्या अपघातात सात ते आठ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. रांजणगाव एमआयडिसीतून सोलापुर, सातारा, सांगली, बेंगलोर येथे जाण्या येण्यासाठी हा रस्ता अतिशय जवळचा असल्याने या रस्त्यावरून अलिकडच्या काळात मोठया प्रमाणात राञंदिवस वाहनांची वर्दळ वाढली आहे. अतिशय अरूंद रस्ता, जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे व दोन्ही बाजूच्या उखडलेल्या साइडपटट्या यासारख्या गंभीर कारणांमुळे या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्यानेच या रस्त्यावर दुचाकी व कंटेनरच्या अपघातांचे प्रमाण वाढल्यानेच गेल्या तीन वर्षात सात ते आठ जणांना आपला प्राण गमवावा लागल्याचे उघड झाले आहे.
कारेगाव ते कर्डे हा सात किलोमीटरचा रस्ता पुर्वीपासूनच अस्तित्वात असला तरी तो मोठया वाहनांच्या वहतुकीसाठी योग्य नसल्याचे या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेवरून दिसून येत असले तरी अलिकडच्या काळात या रस्त्यावर वर्दळ वाढल्याने अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

रांजणगाव गणपती एमआयडिसी १९९३ साली झाल्यानंतर घोड धरणातून एमआयडिसीला पाण्यासाठी केलेल्या पाइपलाइनच्या दुरूस्तीसाठी अशी या रस्त्याची पहिल्यापासूनच ओळख होती. सध्या या रस्त्याच्या झालेल्या प्रचंड दुरावस्थेवरूनदेखील या रस्त्यावरून राञंदिवस टेंपो, कंटेनर व ट्रक अनेकदा भरधाव वेगाने येजा करीत असतात. या वाहनांनी वास्तविक पुणे-नगर रस्त्याने जाणे अपेक्षित असतानादेखील तेही जवळचा म्हणून या रस्त्याचा वापर करत असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठया खडयांचा तर अनेकदा या वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना अंदाजच येत नसल्याने हे दुचाकीस्वार घसरून पडल्याची अनेक उदाहरणे आहेत.

येथील एमआयडिसीतून कर्डे, चव्हाणवाडी, गुनाट, शिंदोडी, निमोणे, आंबळे, न्हावरे, कळवंतवाडी व सातकरवाडी येथील तरूणांना कामावर ये जा करण्यासाठी हा रस्ता अतिशय जवळचा असल्याने या रस्त्याचा या परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात वापर करताना दिसत आहे. मागील आठवडयात या रस्त्यावरून जाताना केवळ रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे कंटेनरची धडक होवून अप्पासाहेब जगदाळे व राजेंद्र बबनराव बांदल या तरूणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत सात ते आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1