कवठे यमाई - 'मूर्ती लहान पण कीर्ती महान...'

'मूर्ती लहान पण कीर्ती महान' या म्हणीच्या प्रत्यक्ष प्रत्ययाचा उदाहरण येथे पहावयास मिळत आहे. येथील मंगल कारभारी शिंदे (वय ५०) या अविवाहित असून, जेमतेम तीन फूट उंची आहे. मेहनत, कष्ट व जिद्दीने स्वसामर्थ्यावर त्यांनी प्रेरणादायी उदाहरण दाखवून दिले आहे....

कु. मंगल कारभारी शिंदे या निसर्गतःच अत्यंत कमी उंची लाभलेल्या. गरीब घरात जन्म घेतलेल्या 50 वर्षीय महिलेची सर्वच बाबतीत प्रतिकूल परिस्थिती. मात्र, परिस्थितीशी झुंज देत स्वसामर्थ्यावर ताठ मानेने उभी राहात जगण्याची खंबीर उमेद इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. जेमतेम 5 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या मंगल शिंदे यांची घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती. आई-वडील हातावर पोट भरून प्रपंच चालविणारे. मोठे कुटुंब त्यातील एक अत्यंत कमी उंची लाभलेली मंगल ही सदस्य. 1975 ला वयाच्या दहाव्या वर्षी जेवढी उंची होती, तीच उंची आजही. छोट्या-छोट्या आकाराचे हात पाय उंची अत्यंत कमी अशा परिस्थितीत डगमगून न जाता वयाच्या 15 व्या वर्षीच आपला पुढील सांभाळ कोण करणार? हा प्रश्‍न त्यांना सतावू लागला.

स्वसामर्थ्यावर जगायचेच हा निश्‍चय पक्का करून त्या वेळेसच त्यांनी ग्रामीण भागात अंथरूण व पांघरण्यासाठी लागणा-या गोधड्या शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. एक जागेवर बसून करता येणारा गोधड्या शिवण्याचा व्यवसाय जरी किचकट असला तरी सुरुवाती पासूनच या कलेत तरबेज झाल्या. मंगल शिंदे या सुई दो-याच्या साहाय्याने 5 दिवसात इतर कामे सांभाळत गोधडी तयार करतात.  गोधडी शिवण्याच्या त्यांच्या सुबकतेमुळे घरपोच ऑर्डर्स त्यांना मिळतात. 1999 च्या सुमारास एक गोधडी शिवताना त्यांना 40 रुपये मिळत व आता 150 रुपये मिळतात. परिसरातील अनेकांनी मंगल यांच्याकडून आकर्षक गोधड्या शिवून घेतल्या आहेत. उंची जेमतेम असूनही मंगल यांनी गेल्या 35 वर्षात सुमारे एक हजाराच्या वर गोधड्या शिवण्याचा पराक्रम केला आहे.

शासनाकडून मिळालेल्या घरकुलात त्या 15 वर्षांपासून स्वतंत्र पणे एकट्याच वास्तव्य करीत आहेत. त्यांचा गोधड्या शिवण्याचा व्यवसाय अव्याहत पणे सुरू आहे. शासकीय निराधार योजनेचा व एपीएल धान्य योजनेचा त्यांना जरी लाभ मिळत असला तरी त्यांच्यावर असलेली आई, भाऊ व त्याच्या मुलांची जबाबदारी ही त्या खंबीरपणे व यशस्वीपणे सांभाळत आहेत.  त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने येथील अंबिका महिला बचत गटाच्या त्या गेल्या 10 वर्षांपासून सक्रिय सभासद आहेत. वयाच्या पन्नाशित असूनही तरुणांना लाजवेल अशा प्रकारे खंबीरपणे जगण्याचा लढा देत आहेत. अंबिका महिला बचत गटात कार्य करताना महिलांमध्ये जनजागृती करण्याचे काम मंगल शिंदे करीत आहेत. गावात महिलांसाठी होणा-या विविध विधायक उपक्रमांत त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. त्यांच्या सारख्या अत्यंत कामी उंची लाभलेल्या पण जगण्यासाठी कुबड्यांचा आधार न घेता सुरू असलेली संघर्षमय जीवनातील खंबीर लढाई इतरांसाठी निश्‍चितच स्फुर्तीदाई ठरेल यात शंका नाही.

- सुभाष शेटे

संबंधित लेख

  • 1