शिरूर - लोकसभा निवडणूक होणार रंगतदार !

लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात 14 उमेदवार निवडणुक रिंगणात असले तरी या निवडणुकीसाठी खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार तथा भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम व शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात होणारी लढत ही “रंगतदार” होणार असुन, या निवडणुकीत आढळराव हॅटट्रीक करणार कि निकम हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला खेचुन आणणार याकडे मतदारसंघातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अशोक खांडेभराड, आम आदमी पक्षाचे सोपान निकम, बहुजन समाज पार्टीचे सर्जेराव वाघमारे यांसह 14 उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादीची प्रचार यंञणा व प्रचाराचे नियोजन जोरदार असताना महायुतीनेही प्रचाराचे नियोजन चांगल्या पध्दतीने राबविले आहे. या निवडणुकीत नवखे उमेदवार असलेले राष्ट्रवादीचे निकम हे वातावरणनिमिर्ती करण्यात आता यशस्वी ठरले असुन मागील काही दिवसात न वाटणारी निवडणुक आता खरया अर्थाने चुरशीची वाटत आहे. निकम यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कॄषीमंञी शरद पवार, प्रवक्ते नवाब मलिक, उपमुख्यमंञी अजित पवार, गॄहमंञी आर.आर. पाटील, छगन भुजबळ, नसीम खान, माजी मंञी बाळासाहेब शिवरकर यांच्या सभा झाल्या असुन, या सर्वांकडुन खासदार आढळराव यांना “टार्गेट” केले आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षीत अशा निकम यांना आपल्या भागाचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी, निवडुन देण्याचे आवाहन केले आहे. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे गावभेट दौरे व कोपरा सभा यांवर विशेष भर असल्याने निवडणुकीत रंगत येत आहे. राष्ट्रवादीचे निकम यांच्या प्रचाराची महत्वपुर्ण जबाबदारी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व त्यांचे प्रमुख कार्यकर्ते सांभाळताना दिसत आहेत.

आढळराव यांच्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, राजु शेटटी, सदाभाऊ खोत यांच्या सभा झाल्या. सर्वांनी प्रत्येक सभेत राष्ट्रवादीवर हल्ला चढविला असुन, आढळरावांना विकासकामांसाठी पुन्हा निवडुन देण्याचे आवाहन केले आहे. खांडेभराड यांच्या प्रचारात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेने खरी रंगत आणली. खासदार आढळराव यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे प्रमुख कार्यकर्ते व आपला उद्योग सांभाळताना कधीही मतदारसंघातील राजकारण व समाजकारणात न दिसणारे आढळराव कुंटुबीय स्वत: हाताळत आहे.

या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादीच्या माध्यमातुन झालेल्या कोटयावधी रूपयांच्या विविध महत्वपुर्ण विकासकामांच्या जोरावर यंदा या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचे निकम सांगत आहे. तर सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यावर आपण हॅटट्रीक करणार असुन, मागील निवडणुकीपेक्षा यावेळी आपल्या मताधिक्कयात वाढ होणार असल्याचा दावा आढळराव करत आहेत. मतदारसंघातील काँगे्रसच्या कार्यकर्तांची निकम यांना मिळत असलेली भरभक्कम साथ व सहाही तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गटतट व मतभेद विसरून सहभागी झाले असल्यानेच निकम यांची या निवडणुकीतील ही अतिशय जमेची बाजु आहे. केवळ निकम यांच्या उमेदवारीमुळेच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी एकञ प्रचार करताना दिसत आहे. निवडणुकवगळता अभावानेच दिसणारे पदाधिकारी व सर्वसामान्य मतदार यामुळे आढळराव यांना ही निवडणुक सोपी वाटत असल्याचे त्यांच्या जवळच्या कार्यकत्र्यांचे म्हणणे आहे. तर आपण नवखे असुनही काँग्रेस आघाडी व महायुतीच्या विरोधीतील लाटेचा आपल्याला नक्कीच फायदा होणार असल्याचे खांडेभराड मतदारांना सांगत आहेत.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खासदार आढळराव हे हॅटट्रीक करणार कि राष्ट्रवादीचे उमेदवार निकम हे राष्ट्रवादीचा एकहाती असणारा बालेकिल्ला खेचुन आणणार तर मनसेचे खांडेभराड यांचा प्रभाव कितपत पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य