शिरूर - विधानसभेची लढत चौरंगी की तिरंगी होणार?

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात यंदा गेतवेळेसारखी चौरंगी लढत होणार की तिरंगी याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले असले तरी, सध्या तरी या मतदारसंघातील आगामी विधानसभेसाठी होणारी लढत मोठी चुरशीची होणार असल्याचे चिञ दिसत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जवळपास 54 हजार मतांचे मताधिक्य मिळाले. यामुळे या मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्तांमध्ये मोठा उत्साह दिसुन येत असला तरी आगामी विधानसभा निवडणूकीत या मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांच्या उमेदवारीच्या रस्सीखेसवरून तो दिसून येणार नाही. लोकसभा निवडणुकीत काही कार्यकारिणी सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच माजी आमदार बाबुराव पाचर्णे व राष्ट्रवादीतुन नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या जयश्री पलांडे यांनी आगामी विधानसभेसाठीची भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, या एकमेव आशेनेच आढळराव पाटील यांचे एकदिलाने व मनाने काम केले असले तरी व या मतदासंघाच्या विधानसभेची जागा भाजपला जरी असली तरी खासदार आढळराव पाटील हे सांगतील त्या व्यक्तीलाच भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा या मतदारसंघात जोरदारपणे ऐकावयाला मिळत आहे. भाजपतर्फे माजी आमदार बाबुराव पाचर्णे, पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदेश कार्यवाह मदन फराटे आदींच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच जिल्हा बँकेच्या संचालिका जयश्री पलांडे यांनी महिनाभरापुर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची मतदारसंघात मोठया प्रमाणात चर्चा आहे. भाजपमध्ये सध्या तरी उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत आहे.

शिरूर तालुका हा तसा पुर्वीपासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघातील सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांनी गेल्या साडेचार वर्षात केलेली विकासकामे ही राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे. याच विकासकामांच्या जोरावरच आमदार पवार हे आगामी निवडणुकीत पुन्हा विजयश्री खेचुन आणण्याची खाञी त्यांचे समर्थक व्यक्त करित आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप कंद, सदस्य मंगलदास बांदल, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक निवॄत्तीअण्णा गवारे आदींच्या नावाची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत बांदल हे भाजपकडून तर गवारे हे अपक्ष म्हणुन निवडणुक रिंगणात होते.

आमदार पवार व कंद यांचे अजित पवारांशी असणारे जिव्हाळयाचे संबंध पाहता यांची उमेदवारी अग्रस्थानी असण्याची शक्यता सर्वाधिक दिसत आहे. आम आदमी पक्षामध्ये काही महिन्यांपूर्वी दाखल झालेले जिल्हा संघटक विकास लवांडे, मागील वेळी अपक्ष म्हणुन निवडणुक लढलेले यशवंत साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंदे्र यांची भुमिका सध्यातरी गुलदस्त्यात असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हा संघटक  संदीप भोंडवे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. माञ, भोंडवे यांना विधानसभेसाठी मोठी ताकद उभी करावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भोंडवे यांनी जनसंपर्क सुरू केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत शिरूर हवेली मतदारसंघात सध्यातरी तिरंगी लढत होणार असल्याचे चिञ आहे.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही