शिरूर - 'पाणी अडवा पाणी जिरवा' संकल्पनेची गरज!

गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी ऐन उन्हाळ्यात पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक गावांना सातत्याने भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एके काळी सतत दुष्काळी म्हणून गणना होणारा पण धरणे, कॅनॉल व नद्यांद्वारे वेळोवेळी मिळणारे पाणी यामुळे सुजलाम्‌ सुफलाम्‌ झालेला शिरूर तालुक्‍यातील बहुतांश भाग मागील काही वर्षांत पावसाचे ऋतू चक्रच बदललेले जाणवत आहे.

शिरूर तालुक्‍यातील अनेक गावागावातून असलेले ओढे, नाले यावर वेळी अवेळी पडणा-या पावसाचे पाणी अडविण्यासाठी योग्य ती जलसंधारणाची कामे होत नसल्याने तालुक्‍यातील अनेक गावात उन्हाळ्यात अनेकदा भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्या करिता ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ, युवक, तरुण मंडळांच्या व शासनाच्या मदतीने पावसाचे पडणारे पाणी अडविण्यासाठी तातडीने शक्‍य त्या अत्यावश्‍यक उपाय योजना करण्याची गरज आहे.

'पाणी अडवा पाणी जिरवा' ही संकल्पना आता गावागावातून प्रभावीपणे व तातडीने अमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्‍यातील भू भागाचा सर्वांगाने विचार केल्यास तालुक्‍यातून भीमा, घोड, कुकडी या मोठ्या नद्या तालुक्‍यातून जातात. अनेक छोट्या नद्या, छोटे-मोठे ओढे ही तालुक्‍यातील बहुतांश भागातून अस्तित्वात असलेले आपणास आढळतात. नद्यांवर झालेले बंधारे, चासकमान, डिंभा, कुकडी, घोड धरणांच्या कालव्यातून तालुक्‍यातील शेतीस कॅनॉल द्वारे वेळोवेळी उपलब्ध होत असलेले पाणी यामुळे अनेक गावातील बहुतांश शेती बारमाही बागायती झाल्याचे आपणास दिसून येते. तालुक्‍याचा पश्‍चिम भाग हा डोंगर द-यांनी सजलेला असून त्या मानाने पूर्व भाग हा बहुतांशी सपाट जमीन असलेला भाग आहे.

मागील काही वर्षात जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात असलेली अनेक धरणे 100 टक्के भरून ही पाण्याची असलेली मागणी लक्षात घेता ऐन उन्हाळ्यात अनेकदा पाणी टंचाईस तोड देण्याची वेळ अनेक गावांस आलेली आहे. डोंगर-पठारावरील गावांना तर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत असते. तालुक्‍यातील सर्वच गावात पडणा-या पावसाचे पाणी गावालाच फायदेशीर ठरावे या दृष्टिकोनातून आता गावपातळीवरच तातडीने व प्रभावीपणे जलसंधारणाच्या कामांना वेगात सुरवात केली पाहिजे तरच पुढील काळात गावागावातील नागरिकांना पाणी टंचाईस तोंड देण्याची वेळ येणार नाही.

पावसाचे पाणी गावातच अडविण्यासाठी गाव, वाड्या-वस्त्यांतुन वाहणारे ओढे, नाले यांची साफसफाई करून त्यांची योग्य त्या मापात खोली व रुंदी वाढविणे, डोंगर द-यातून खळखळत वाहणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी त्या ओढ्यांवर सरासरी 100 ते 200 फुटांवर पक्के सिमेंटचे बंधारे बांधावेत, या कामी ग्रामपंचायत, स्थानिक ग्रामस्थ, त्या परिसरातील शेतकरी यांनी पुढाकार घ्यावा. शासनाकडून ही अशा कामांना तातडीने पूर्ण होण्याकामी प्राधान्य मिळावे. महत्त्वाचे म्हणजे सर्वांच्याच दृष्टिकोनातून जिव्हाळ्याचे असणारे हे जलसंधारणाचे काम मजबूत व भ्रष्टाचार मुक्त होणे अत्यंत गरजेचे आहे.

गावागावातून जलसंधारणाची कामे करताना प्रत्येक वाड्यावस्त्यांवरील ज्येष्ठ, सुशिक्षित, प्रामाणिक व प्रामाणिक निःस्वार्थी नागरिकांचे नियंत्रण या कामावर असावे तसे अधिकार पण त्यांना ग्रामपंचायतीने द्यावेत. गावातील तरुण मंडळे, युवक व तरुण विद्यार्थ्यांनी ही या कामी स्वेच्छेने श्रमदान करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या वर्षी प्रकर्षाने जाणवत असलेली पाणी टंचाई लक्षात घेता तालुक्‍यातील गावागावातून जलसंधारणाची कामे वेगाने मार्गी लागल्यास पावसाचे पाणी त्या-त्या गावच्या शिवारातच अडेल. परिसरातील शेतीस तर त्याचा चांगला उपयोग होईलच पण शिवारातील विहिरी, कूपनलिका यांना ही पाणी वाढून शिवारातील भूगर्भाच्या पाणी पातळीत निशितपणे वाढ होईल. त्या-त्या परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल व पुढील दुष्काळाचा चटका जाणवणारच नाही. गरज आहे ती फक्त ही कामे गावपातळीवर तातडीने मार्गी लावण्यासाठी गावच्या एकत्रित विचाराची व सर्वांच्या दृढ इच्छा शक्तीची.

- सुभाष शेटे

संबंधित लेख

  • 1

शिरूर तालुक्यातील प्रशासन शेतीचे पंचनामे योग्य प्रकारे करत आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही