वाघाळे - नाना, एकच विनंती परत या...!

बुधवार (ता. 3 सप्टेंबर 2014) साधारण वेळ सकाळी साडेनऊची... नेहमीप्रमाणेच मोबाईल खणखणला... आणी धस्स झालं.... पण विश्वास बसत नव्हता. काय करावे कळत नव्हते. एकामागून एक फोन सुरू झाले. एक फोन घेईपर्यंत पाच-पाच मिस कॉल पडत होते. प्रत्येकाचा प्रश्न एकच होता पण उत्तर काय द्यावे कळत नव्हते. प्रत्येकजण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता.... अखेर एक फोन आलं न समजलं आपले नाना गेले हो.....

सतत हसत-खेळत असणारे नाना सर्वांना हसत ठेवणारे नाना अचानक जातील यावर विश्वासच बसत नव्हता. नाना म्हणजे एक आगळे-वेगळे व्यक्तिमत्त्व. प्रत्येक क्षेत्रात नानांचा वावर. राज्यभर नानांचे हजारो मित्र. दिवसभर मित्रांच्या गराड्यात असणारे नाना पहायला मिळत. फोन तर त्यांचा सतत खणखणायचा. प्रत्येकाची अडचण ओळखून मदतीला धाऊन जात... वेळ, काळ कधी पहात नसत. अनेकांनी हा अनुभव घेतलेला. खरचं 'नाही' हा शब्द त्यांच्याकडे नव्हताच. नानांचे ऑफिस दिवसभर भरलेले पहायला मिळायचे. प्रत्येकाशी आपुलकीने बोलणारे, हास्य-विनोदाने वातावरण प्रसन्न ठेवणारे नाना पहायला मिळत. आपल्याकडे आलेल्या प्रत्येकाने चहा, नाष्टा करावा ही नानांची मनापासूनची इच्छा. आपुलकीने ते आग्रह करत.

नानांना भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती पहिल्या भेटीतच त्याच्या प्रेमात पडे. पुढे हे नाते कायमस्वरूपी घठ्ठ होताना पहायला मिळे. नानांच न माझं एकच गाव (वाघाळे, ता. शिरूर) शिवाय नातेवाईकही. परंतु, आमची ओळख गेल्या पाच वर्षांपूर्वीच झाली. पुढे ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. खरोखऱच मैत्री एवढी घठ्ठ झाली की आयुष्यभर न विसरण्यासाठी. नानांसोबत विविध विषयांवर तासनं तास चर्चा चालायची. प्रत्येक गोष्टीत नानांचा अभ्यास दांडगा होता. साहित्य, कला. चित्रपट, क्रीडा, राजकारण व समाजकारणावर उदाहरणासह भरभरून बोलाताना दिसत. शिरूर तालुक्यासाठी, मित्रांसाठी, युवकांसाठी काहीतरी वेगळे करावे त्यांची नेहमीची इच्छा.

शिरूर तालुक्याचे (www.shirurtaluka.com) हे संकेतस्थळ सुरू करण्यामागे नानांचा मोठा हातभार. संकेतस्थळाच्या संकल्पनेविषयी सांगितल्यानंतर नानांना मोठा आनंद झाला होता. अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत संकेतस्थळाशी ते जोडले होते. सोशल नेटवर्किंग हा नानांचा छंदच झाला होता. फेसबुकवर तर नानांना दोन खाती उघडावी लागही होती. दोन्ही खात्यांवर नाना नेहमीच कार्यरत असलेले पहायला मिळत. कधी चारोळ्या लिहीत तर कधी कवीत करून ती अपलोड करत. मित्रांचीही मोठा दाद मिळताना पहायला मिळे. प्रत्येकजण प्रतिक्रयांद्वारे कौतुक करताना दिसे. फेसबुकप्रमाणे व्हॉट्सऍपवरही नाना तेवठेच कार्यरत. थोडक्यात, प्रत्येक माध्यमातून ते मित्रांशी जोडले गेलेले पहायला मिळत.

नाना एवढं तुम्हाला कसे शक्य होते? या प्रश्नावर नानांच उत्तर... साहेब, आयुष्यात कितीही कमावलं तरी ते जागेवरंच राहतं. जिवाला जीव देणारे मित्र पैशाने खरेदी करू शकत नाही. मित्र हीच माझी मोठी संपत्ती आहे. खरोखरच हे शेवटी जाणवलं. अपघातानंतरच आयुष्य हे एक बोनस आयुष्य आहे. प्रत्येक क्षण हा आनंदाने घालवायचा. दुसऱयाला जेवढे देता येईल तेवढे द्यायचे बस.... आणि नानांनी हे शेवटपर्यंत केलेले पहायला मिळाले.

संकेतस्थळाच्या उद्घाटनापासून ते शेवटपर्यंत जोडले गेले होते. परंतु, नानांच्या निधनाची बातमी लिहायची वेळ येईल असे कधी वाटले नव्हते. परंतु, नानांच्या निधनाची बातमी लिहीताना वेदना होत होत्या. बातमी लिहीतीना शब्द कमी पडत होते... कितीही लिहीले तरी शब्दसंख्या कमीच पडत होती....

हसत असणारे नाना आपल्याला रडवून गेल्यावर शेवटच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकजण हळहळत होता. नाना... नाना... म्हणून अश्रू ढाळत होता. वाघाळे गावामध्ये प्रथमच एवढ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे वृद्ध सांगत होते. नानांना मित्र-परिवाराची गर्दी अत्यंत प्रिय होती. परंतु, गावातील ही गर्दी वेगळ्याच कारणासाठी होती. ही गर्दी पहायला नाना नव्हते हो.... केवळ नानांच्या प्रेमापोटी ही गर्दी झाली होती. नाना ही गर्दी पहायला तुम्ही हवे होते. किती आनंद झाला असता ना तुम्हाला....

गावची, तालुक्याची एकच विनंती आहे... नाना तुम्ही आमच्यात परत या हो...आजपर्यंत आम्ही फक्त तुमचं ऐकत गेलो. आमचे एकदाचं ऐका... आम्हाला हसविणारे नाना पहायचे आहेत.... नाना... परत... या....!

साहेब लवकरच तुम्हाला बातमी देणार....
गेल्याच आठवड्यात नानांची भेट झाली. भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. शेवटी बोलताना नाना म्हणाले, साहेब तुम्हाला लवकरच एक मोठी बातमी देणार आहे. माझा फोटो तुमच्याकडे असेलच. फक्त एकदा फिक्स झाले ना लगेच फोन करून सांगतो. खरोखरच नानांनी मोठी बातमी दिली...


- संतोष धायबर, 9881242616
santosh.dhaybar@gmail.com


Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य