शिरूर - शिरूर-हवेलीतील निवडणूक 'काँटे की टक्कर'

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात होत असलेली निवडणूक ही 'काँटे की टक्कर'च असल्याचे बोलले जात आहे....

राष्ट्रवादीकडून आमदार अशोक पवार, भाजपकडून माजी आमदार बाबूराव पाचर्णे, शिवसेनेचे संजय सातव पाटील, काँग्रेसचे कमलाकर सातव, मनसेचे संदिप भोंडवे, बहुजन समाज पक्षाकडुन बाळासाहेब आवारे, अपक्ष रमेश पाचुंदकर, डॉ. ससाणे असे प्रमुख उमेदवार रिंगणात असून खरी लढत पवार व पाचर्णे या जुन्या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच होणार असली तरी, इतर पक्षातील उमेदवारांना किती मते मिळतात यावरही या मतदारसंघातील बरेच काही अवलंबून असल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले आहे.

दोन्ही काँग्रेसमधील आघाडी व युती तुटल्याने येथील राजकीय समीकरणे आता बदलली आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व काँगे्रस एकमेकांसमोर उभे ठाकल्याने मतदारांना उमेदवार निवडीसाठी अनेक पर्याय मिळाले आहेत. त्यात हा मतदारसंघ शिरूर तालुक्यातील 58 गावे व हवेलीतील 40 गावे यात पसरला असल्यामुळे येथे स्थानिक समीकरणे महत्वाची ठरणार असल्याने उमेदवारांचा या निवडणुकीत कस लागणार आहे. या मतदारसंघात 1 लाख 63 हजार 124 एवढे पुरूष मतदार असून, महिला मतदार 1 लाख 46 हजार 362 असून तीन लाख नऊ हजार 486 एवढे मतदार आहेत.

आमदार म्हणून भरीव विकासकामांच्या माध्यमातून विकासकामे केल्याने पवार यांनी शिरूर व हवेली तालुक्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाजपचे उमेदवार माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांना भाजपची लाट, राष्ट्रवादीतील नाराजी यामुळे पाचर्णे यांना आपल्या विजयाची आशा आहे. येथे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या माध्यमातून तळागळात रोवलेली शिवसेना आणि शिवसेनेकडुन येथे निष्ठावंत शिवसैनिक संजय सातव यांना मिळालेली उमेदवारी त्यामुळे सातव यांना आढळराव यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे यामुळे त्यांना नेमकी किती मिळतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. काँग्रेसचे कमलाकर सातव हे हा मतदारसंघ काँग्रेसचाच असून, काँग्रेसच्या माध्यमातील कामामुळे आपला विजय होणार असल्याचा विश्वास आहे. राज ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित झालेला तरूण वर्ग व वेगवेगळया माध्यमातून केलेली विकासकामे यामुळे मनसेचे भोंडवे यांना आपणच विजयी होणार असे वाटते.

या विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेले प्रदीप कंद यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व शिरूर बाजार समितीचे सभापती मंगलदास बांदल यांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापतीपद मिळाल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या ताकदीत मोठी भर पडणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारयांची एकजूट राहिली तर पवार यांचे पारडे जड राहिल, असा राष्ट्रवादीचा दावा आहे. राष्ट्रवादीच्या नाराजीचा फायदा करून घेण्यास पाचर्णे सरसावले असून, गतवेळची होणारी मतविभाजणी यंदा टाळल्याकडे पाचर्णे यांचे लक्ष आहे.

दरम्यान, या मतदारसंघातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असली तरी नेमके कोणता उमेदवार किती मते मिळविणार यावरच येथील निकाल जरी अवलंबून असला तरी या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागून आहे.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य