तळेगाव ढमढेरे - क्रांतिकारी सिंह- हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे

हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे ऐतिहासिक स्मारक तळेगाव ढमढेरे येथे असून, नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या या क्रांतिकारकाची जयंती 2 जानेवारी रोजी साजरी होत आहे. पिंगळे यांच्या फाशीला 16 नोव्हेंबर 2015 रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त....

हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म 2 जानेवारी 1889 मध्ये तळेगाव ढमढेरे येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांची आई सरस्वतीबाई जडीबुटी औषधांचा वारसा चालवणाऱ्या जुन्या पद्धतीच्या उपासक होत्या. लहानपणी विष्णूची प्रकृती अशक्त होती; परंतु आईने त्यांना सशक्त बनविले. व्यायाम, सकस आहार, नित्य साधना यामुळे विष्णू बलदंड प्रकृतीचे बनले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील (तळेगाव ढमढेरे) शाळेत झाले. त्यानंतर पुण्यातील दाते वाड्यात राष्ट्रीय शिक्षण घेतले. याच वाड्यात लपण्यासाठी भुयारे होती. राष्ट्रीय शिक्षणाचा गुप्त रिपोर्ट ब्रिटिश सरकारला समजल्यानंतर पिंगळे तळेगाव दाभाडे येथे शिक्षणासाठी गेले. स्वतः श्रमाची कामे करून गुरूप्रेम संपादन करून त्यांनी येथील विद्यालयातील राष्ट्रीय शिक्षणातून देशभक्तीचा वसा घेतला. फायनलपर्यंतचे तत्कालीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पिंगळे यांच्या मनात परदेशात जाऊन तांत्रिक शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. अमेरिकेस जाण्याचा त्यांनी मनोदय केला. त्यासाठी लागणारा पैसा उभारण्यासाठी त्यांनी औसा या गावी हातमाग चालविले. कुस्ती जिंकून मिळालेली बक्षिसे व सहकाऱ्यांची मदत घेऊन पिंगळे अमेरिकेला शांघाय मार्गे बोटीने गेले.

वेषांतर करून कार्य
अमेरिकेत वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत इलेक्‍ट्रीक इंजिनिअर व वायरलेस टेलिग्राफीचा कोर्स त्यांनी पूर्ण केला. याच काळात ते बॉम्ब तयार करण्याची विद्या शिकले. राष्ट्रीय कार्यात पडून गदर पार्टीचे सभासद होऊन ते प्रहारी विभागाचे प्रमुख बनले. सरस्वतीचा हा उपासक स्वातंत्र्य लक्ष्मीचा भक्त बनला. अमेरिकेतील वास्तव्यात पिंगळे यांचा अनेक क्रांतिकारकांशी संबंध आला. हे सर्व गदर पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते होते. गदर पार्टीने गदर नावाचे वर्तमानपत्र काढले. ते इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी, बंगाली आदी भाषेतून प्रसिद्ध होत. 1857 च्या स्वातंत्र्य युद्धातील शौर्यगाथा, चित्रे या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत. यातील मराठी विभाग प्रकाशनाचे काम पिंगळे करीत असत. अमेरिकेत त्याचे प्रकाशन होत असे. गदर वृत्तपत्राच्या हजारो प्रती छापून त्या सैन्यात मोफत वाटल्या जात. भारतीय सैनिक देशप्रेमी बनविणे त्यास फितूर करून त्यांच्या मार्फत सैन्यात बंड घडवून आणून देश स्वतंत्र करणे हा उद्देश होता. त्यानंतर पिंगळे सॅलॅमीस नावाच्या बोटीने भारतात आले. काहीकाळ बंगाली पोशाख करून बंगालमध्ये राहिले. त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र पंजाब ठरविले आणि त्याप्रमाणे वेषांतर
करून नाव बदलून भारतात क्रांती कार्य करू लागले.

हसत हसत सुळावर
पिंगळे यांना अनेक भाषा अवगत होत्या. वेशांतर करण्यात ते पटाईत होते. त्यांच्या वक्तृत्वाने हजारो सैनिक देशभक्त बनले व आदेश मिळताच बंडाचा झेंडा हातात धरावयास सज्ज झाले; परंतु नियतीला त्यावेळी ते घडू द्यायचे नव्हते. मेरठच्या लष्करी छावणीत रात्रीचे काम करून एका बराकीत निद्रिस्तपणे पहुडलेला हा सिंह विश्‍वासघाताने पकडला गेला. पिंगळे त्याचवेळी उशाखाली एक पेटी घेऊन निद्रिस्त स्थितीत होते. त्या पेटीत 18 प्रभावशाली बॉम्ब, गण कॉटन कॅप्स, उठावाचा नकाशा, लष्करी केंद्राची नावे व अनेक स्फोटके सापडली. त्यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले. अशा या क्रांतीकारकाला 16 नोव्हेंबर 1915 रोजी लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. ते हसत हसत सुळावर चढले.

अखेरची प्रार्थना
देशासाठी बलिदान करताना अत्यंत निर्भयता त्यांनी दाखवली. एका दूरच्या प्रवासाला जाण्याच्या मनःस्थितीतच त्यांनी मृत्यूला आलिंगन दिले. तत्पूर्वी बेड्या काढून त्यांनी परमेश्‍वराची प्रार्थना केली. ते म्हणाले, ""हे परमेश्‍वरा, तू आमची अंतःकरणे जाणतोस, मी जे काही केले ते कोणत्याही जातीचा, पंथाचा किंवा धर्माचा द्वेष म्हणून हे कार्य केले नाही. मातृभूमीचे स्वातंत्र्य हीच माझी अंतिम इच्छा होय!''

- नागनाथ शिंगाडे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य