विठ्ठलवाडी - 'तंटामुक्ती'चा अध्यक्ष...!

डगावं तसं लहानसे गाव, दूर डोंगराच्या कुशीत वसलेलं. हजार-दीड हजार लोकसंख्या असलेले हे गाव. गावाच्या तीनही बाजूला असलेले डोंगर गावाचे वादाळापासूनचे संरक्षण करत उभी आहेत. पावसाळ्यात खूप पाऊस पण इतर वेळेस पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. शेतीवाडी कमी असल्याने गावाची आर्थिक परिस्थिती बेताची. गावात शाळा असून देखील नसल्यासारखीच. गावातील अनेकजण अडाणी. गावात वरच्या आळीला राहणारा वसंता जमादार ही बडी आसामी. राजकारण त्याच्या नसानसांत भरलेलं. त्यामुळे आमदार, खासदार, मामलेदार, कलेक्‍टर यांच्यापर्यंत त्याची उठबस असे. पण एवढे सर्व असूनही त्याच्याकडे कुठलेही पद नव्हते. याची त्याच्या मनाला कायमच खंत होती. 15 ऑगस्टला ग्रामसभा होणार असून त्यामध्ये "तंटामुक्ती गाव समिती'च्या अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, अशी दवंडी नाम्या कोतवालाने गावात दिली.

वसंताचा चेहरा फुलला आणि लोकांशी अदबीने बोलून त्यांना चहा-पाणी करू लागला. दिसेल त्याला हाक मारत चहा पाजायचा असे रोजच घडू लागले. कधीही चहा न पाजणारा वसंता आज प्रत्येकाला आग्रह करू लागला. याचे प्रत्येकाला नवल वाटू लागले. जसजशी 15 तारीख जवळ येऊ लागली. तसतशी वसंता गावातील पोरांना घेऊन ढाब्यावर दारू-मटणांची पार्टी देखील देवू लागला. मग काय ज्याच्या तोंडात फक्त वसंताच वसंता. आत्तापर्यंत सगळ्या गावाने वसंताच्या पार्टीला हजेरी लावली होती. पण न्हाव्याच्या सद्या (सदानंद) मात्र कधीच गेला नव्हता. त्याला अख्ख्या गावाची खडा न खडा माहिती असायची. हा गडी खूप कामाचा आहे हे ओळखून वसंताने त्याला खूप आग्रह केला. पण सद्या मात्र वसंताच्या हाती लागला नाही. असा एक एक दिवस जात होता. वसंताचा पैसा आता बऱ्यापैकी खर्च झाला होता. लोकांनाही आता पार्टीची सवयच लागली होती. लोक रोज रात्री वसंताची वाट बघत बसायचे. वसंता मात्र त्या दिवसाची वाट पाहत होता. अखेर एकदाचा तो दिवस उगवला. वसंता "तंटा मुक्ती'बिनविरोध झाला. वसंताचे काम झाले होते. त्यामुळे त्याने चहापाणी पार्टी देणे बंद केले.

इकडे लोकांना पार्टीची सवय लागल्याने ते व्यसनाच्या आहारी गेले, घराघरांत भांडणे होऊ लागली. घरातील प्रेम, आपुलकी, शांती, समाधान केव्हाच हद्दपार झाले होते. घरातील भांडणं आता भावकीत होऊ लागले आणि भावकीचे भांडण आता गावकीत होऊ लागले. आजूबाजूच्या गावात आडगावंची ओळख आता भांडगांव (भांडणारे गाव) अशी होऊ लागली.

इकडे वसंताला या गोष्टीची सर्व माहिती असून देखील तो आता गप्प बसला होता. अध्यक्षपद मिळवण्यासाठी झालेला खर्च कसा वसूल करावा याचा विचार तो करू लागला. "सापडली आयडिया सापडली'असे स्वतःच पुटपुटत तो उठला आणि तडक गावात गेला. वाटेत न्हाव्याचा सदा भेटला. तो सुद्धा समितीचा सदस्य होता पण सद्याशी न बोलता तो तसाच पुढे गेला.

वसंता जसा गावात पोचला तसा रघू लोहाराची बायको घरातून ओरडत बाहेर पळत आली आणि "मेले मेले'म्हणून ओरडू लागली. वसंताने विचार केला चला आयते सावज मिळतयं, बोहणी करू या. तो रघूच्या घरात शिरला आणि त्याला समजावू लागला. रघू दारू पिऊन तर्रर्र झाला होता. तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि बायकोही माघार घ्यायला तयार नव्हती.

शेवटी नवरा-बायकोचे भांडण पोलिस स्टेशनपर्यंत गेलं. नव्हे ते वसंतानेच तिथपर्यंत व्यवस्थित पोचवले होते. कांबळे हवालदार वसंताच्या ओळखीचे होते. त्यांनी रघुला दारू पिऊन बायकोला मारल्याबददल तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. रघुला पंखा चालू असताना देखील दरदरून घाम फुटला होता. तो गयावया करू लागला. पण कांबळे साहेब अजिबात ऐकत नव्हते. शेवटी वसंताने रघुला आणि त्याच्या बायकोला बाजूला नेले आणि साहेबाला एक हजार रुपये देण्याची तडजोड केली. कांबळे साहेबांनी त्यांना केवळ वसंतामुळे तुम्हाला सोडून देत आहे म्हणून जायला सांगितले. अर्ध्या-अर्ध्याची वाटणी झाली आणि वसंता तिथून आडगावला निघून गेला. इकडे रघुला पैसे गेल्याच्या दुखाःपेक्षा वसंताने आपल्याला वाचविले याचाच जास्त आनंद वाटत होता. अशा रीतीने दिवसामागून दिवस जात होते. वसंताला रोज नवीन-नवीन शिकार भेटत होती. पोलिस स्टेशनला तडजोड करून त्यांना सोडून दिले जात होते.

एव्हाना वसंताच्या या कामगिरीची कल्पना गावाला आली होती. पूर्वीपेक्षा आता गावात भांडणेही कमी होऊ लागली. वसंताचा धंदा आता कमी व्हायला लागला. आता तर स्वतःहून गावात भांडणे लावू लागला. गाव आता वसंताला पुरते वैतागले होते. प्रत्येकाला वाटायचे त्याला धडा शिकवावा पण धाडस, मात्र कोणीही करीत नव्हते. कारण वसंताच्या ओळखी आता मोठमोठया नेत्यांपर्यंत झाल्या होत्या.

एक दिवस न्हाव्याच्या सद्या आणि सुताराचा गण्या या दोघांच्यात कडाक्‍याचे भांडण झाले. दोघांनीही एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहून, बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला. प्रकरण पार हातघाईवर आले. वसंताला तर आयतीच संधी चालून आली होती. सगळा गाव जमा झाला होता. पण हे दोघे कोणाचेच ऐकेना. लोकांच्यात चर्चा चालू झाली. आता हे दोघं दोन हजाराला खडडयात जाणार. कुणी म्हणे तीन हजाराला खडडयात जाणार. प्रत्येकाला या भांडणाची उत्सुकता लागली होती. वसंतला तर खूप आनंद झाला. नेहमीप्रमाणे प्रकरण पोलिस चौकीला गेले. हवालदार कांबळेंनी दोघांना दम देवून तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. सद्या आणि गण्या विनवणी करू लागले. कांबळे साहेब काही ऐकेना. नेहमीप्रमाणे वसंताने दोघांना बाजूला नेले. तीन हजार रुपयावर तडजोड करून प्रकरण मिटवायचे ठरले. दोघांनीही दीड-दीड हजार रुपये काढून वसंताच्या हातावर ठेवले आणि "यु आर अंडर अरेस्ट'असे शब्द कानावर आले. पाहतात तर काय समोर त्याच लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे अधिकारी. वसंताला त्यांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्याचे हात पाय लटलट करू लागले. त्याची बोबडी बंद झाली होती. स्वतःला वाचविण्यासठी कसाबसा त्याने नेत्यांना फोन लावला. "साहेब कामात आहेत', "साहेब बाहेर गेलेत' अशी उत्तरे येऊ लागली. वसंताला अटक झाली. त्याच्या जबाबावरून हवालदार कांबळेनाही अटक झाली.
ही वार्ता आडगावला वायासारखी पसरली आणि गावात सगळीकडे आनंदी आनद झाला. न्हाव्याचा सद्या तर मुख्य हिरो ठरला होता. ते दोघे गावात पोचल्यावर गावकऱ्यांनी त्यांची मिरवणून काढली. आज सद्या निवडणूक न लढता तसेच एक रुपया खर्च न करता विजयी झाला होता.

इकडे वसंताला सहा महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि हवालदार कांबळे यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर पुढच्या वर्षी आडगांवाने "तंटामुक्ती गाव'चे प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस मिळवले. ते देखील तंटामुक्ती गाव समिती अध्यक्षांच्या अर्थात "सदाजीराव' यांच्या मार्गदर्शनाने.

- किसन गवारी 9527184200
ksgaware@gmail.com

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही