कवठे यमाई - 'कसं लंगड मारतय उडून तंगड...'

'कसं लंगड मारतय उडून तंगड...' हे उभ्या महाराष्ट्रात आजही तमाशा रसिकांच्या मुखी गुणगुणले जाणारे गीत लोकशाहीर व ज्येष्ठ कवी बी.के. मोमीन कवठेकर यांनी लिहीले आहे. मात्र, हे गीत लिहिणारे दुर्लक्षित आहेत....

'कसं लंगड मारतयं उडून तंगडं, सारं हायब्रीड झालं, हे असंच चालायचं, खरं नाही काही हल्लीच्या जगात, फशनचं फड लागतंय ग्वाड, घरात टी.व्ही., मिक्‍सर हवा, चल मळ्यात जाऊ सखू सखू, लई जोरात पिकलाय जोंधळा, मारू का गेणबाची मेख, बडे मजेसे मॅरेज किया, मेरे गले में घोग़डं आया' आदी लोकगितांसह बाईनं दावला इंगा, इष्काने घेतला बळी, तांबडं फुटले रक्ताचे, भंगले स्वप्न महाराष्ट्रा, भक्त कबीर, सुशीला क्षमा कर, इत्यादी अनेक वगनाट्ये लोकशाहीर बी.के. मोमीन कवठेकर यांनी लिहिली व ती तमाशाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. संगीतरत्न कै. दत्ता महाडीक पुणेकर यांनी मोमीन कवठेकरांचे कस लंगड मारतय उडून तंगड, कुणी कुणाला नाय बोलायचं हे असंच चालायचं ही लोकगीते आपल्या मंजुळ व सुमधुर आवाजात गात अजरामर केली आहेत.

एके काळी गाजलेल्या तमाशा संगीत बा-यां पैकी चंद्रकांत ढवळपुरीकर सह मा. दत्ता महाडीक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम गावात आला रे आला की, तो कार्यक्रम पाहण्यासाठी तुफान झुंबड उडायची. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संगीतरत्न कै. दत्ता महाडीक पुणेकर यांचे रंगबाजीतील अस्सल मराठी भाषेतील ढंगबाज सोंगाड्याचे पात्र, ते वगनाट्यात वठवत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका व महत्त्वाचे म्हणजे ते आपल्या सुमधुर व पहाडी आवाजात गात असलेली द्विअर्थी लोकगीते हे होय. त्या काळात दरवर्षी दत्ता महाडीक पुणेकर यांचे एक तरी गाणे सुपरहिट होत असे. त्यांनी गायलेल्या गाण्यांना उपस्थित प्रेक्षकांकडून वाहवा मिळत असे व वन्समोअरची मागणी वारंवार होत असे. कै.महाडीक हे स्वतः:च संगीतरत्न होते. ते स्वतः:च गीताला चाल लावीत असत व स्वतः:च आपल्या सुरेल आवाजात तमाशा रसिकांसमोर सादर करीत असत. त्यामुळे मंत्रमुग्ध झालेले रसिक प्रेक्षक त्या काळात ही शंभर, दोनशे रुपयांची थेट बक्षिसे त्या गाण्याला देत असत.

सोंगाड्या व वगनाट्यातील भूमिकांव्यतीरिक्त दत्ता महाडीक पुणेकर हे कशामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले असतील तर ते म्हणजे त्यांनी गायलेल्या लोकगितांतून. महाडीक जी लोकगीते तमाशा रंगमंचावरून सादर करीत त्या लोकगितांचे रचनाकार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्‍यातील कवठे येमाई गावचे लोकशाहीर बी.के.मोमीन कवठेकर (बशीरभाई कमृद्दीन मोमीन) हे होत. आपली उभी हयात गिते, वगनाट्ये,नाटके व लोकशाहीरी लिहिण्यात घालवत समाज उपयोगी लेखन साहित्य निर्माण करण्यात घालविलेले मोमीन कवठेकर हे दुर्लक्षित तर आहेतच पण उपेक्षेचे जिणे त्यांना जगावे लागत आहे.

शिरूर तालुक्‍यातील कवठे येमाई हे मूळ गाव असणारे लोकशाहीर बी.के.मोमीन कवठेकर यांचे शिक्षण आंबेगाव तालुक्‍यातील लोणी येथे जेमतेम 9 वी पर्यतच झाले. शालेय जीवनातच त्यांना शाहिरी व काव्य लेखनाचा छंद जडलेला. सन 1957 पासून ते आजतागायत म्हणजे 58 वर्षांपासून लेखन, शाहीरीगिते, लोकगीते व लोकसाहित्य क्षेत्रात कार्य करीत आहेत. याचा बरोबर त्यांनी वण्या, गण, भावगीते, भक्तिगीते, गवळणी, भारुडे, पोवाडे, गण, कविता, बडबडगीते, कलगीतुरा, देशभक्तिपर गीतांची रचना करीत लेखन साहित्याचा ठेवा निर्माण करून ठेवला आहे. गेली 58 वर्षे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जाऊन मोमीन कवठेकर यांनी जनजागृती करीत लोककलेचा वारसा जिवापाड जतन केला आहे. साक्षरता, हुंडाबंदी, व्यसनबंदी, व्यसनमुक्ती, एड्‌स, ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान यासाठी कलापथके तयार करीत बी.के. मोमीन कवठेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर विविध विषयास अनुसरून कार्यक्रम सादर करीत जनजागृती केली. लोकशाहीर मोमीन कवठेकरांना ख-या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली असेल तर ती म्हणजे संगीतरत्न दत्ता महाडीक पुणेकर यांनी. मोमीन कवठेकरांनी लिहिलेली अनेक लोकगीते त्यांनी तमाशातुन गात महाराष्ट्रभर लोकप्रिय केली.महाडीक यांच्या बरोबरच मोमीन कवठेकरांचे नाव ही तमाशा रसिकांमध्ये महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले. आज ही मोमीन कवठेकर यांनी लिहिलेली व दत्ता महाडीक पुणेकर यांनी तमाशातून गायलेली अनेक गाणी रसिकांच्या ओठांवर आहेत.

त्या काळात मोमीन कवठेकर यांनी लिहिलेले व महाडीक यांनी गायलेले बघां लंगडं मारतयं उडून तंगडं हे लोकगीत संपूर्ण महाराष्ट्रात तुफान गाजले.

दिस आल्यात कसं हो रांगडं ।
आंधळं म्हणतंया फुटलंय तांबडं
चाचपून हातानं,चालतंय बेतानं
उरफाटं घालून आंगडं
तरी लंगडं मारतयं उडून तंगड ।।

येतो उन्हाळ्यात नदीला पूर।
बफ पेटला निघतोय धूर
छक्का काढतो नदीला जोर।
बायको पुढं नवरोबा गारं
इथ रेडा गाभण,अंडी घालून
दूध देतयां पाटीखाली कोंबडं............

या शिवाय सारं हायब्रीड झालं, हे असंच चालायचं, खरंनाही हल्लीच्या जगात, फशनचं फड लागतंय ग्वाड, घरात टी.व्ही., मिक्‍सर हवा, चल मळ्यात जाऊ सखू सखू, लई जोरात पिकलाय जोंधळा, मारू का गेणबाची मेख, बडे मजेसे मॅरेज किया, मेरे गले में घोग़डं आया आदी लोकगितांची मोमीन कवठेकरांनी स्वरचित निर्मिती केलेली असून यातील बहुसंख्य गिते ही संगीतरत्न दत्ता महाडीक पुणेकर यांनी गायलेली आहेत. मोमीन कवठेकरांनी लिहिलेली वगनाट्ये दत्ता महाडीक पुणेकर, रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंडळाने महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर देखील सादर करून ख्याती मिळवली आहे. काही ऐतिहासिक नाटकांसह अन्य काही पुस्तके ही मोमीन कवठेकर यांनी लिहिलेली असून, त्यांनी निर्माण केलेल्या लेखन साहित्यावर अभ्यास करीत चाकण येथील एका प्राध्यापकांनी पुणे विद्यापीठातून पि. एच डी. साठी प्रभंद सादर केला होता. मोमीन कवठेकरांना साहित्यातील विशेष लेखननिर्मितीला विविध पुरस्कार मिळाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मागील वर्षी कलागौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. असे असले तरी आज त्यांचे जिने उपेक्षितच आहे.

आज महाराष्ट्रात तमाशा ,लोकनाट्यकला लोप पावण्याच्या अवस्थेत असून, लोकशाहीर बी.के.मोमीन कवठेकर यांचे सारखे ग्रामीण ढंगाची व अस्सल बदलत्या जमान्याची नाडी ओळखून लोकगीते लिहिणारे लोकशाहीर, लोककवी औषधाला ही शिल्लक राहणार नाहीत. त्यांच्या सारख्या जुन्या व जाणत्या लोककलावंताचा, लोकशाहीर, लेखकाचा शासन दरबारी उचित मान सन्मान होणे अत्यंत गरजेचे आहे.

- सुभाष शेटे


संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही