शिरसगाव काटा - ससून रुग्णालयात अपंगांची अग्नि परिक्षा...

ससून रुग्णालयात अपंगत्व प्रमाणपञ मिळविण्यासाठी पुणे जिल्हा व शहरातून अनेक अपंग येत असतात. सदर ठिकाणी नुकताच जाण्याचा योग आला. यावेळी अपंगाना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अग्नि परिक्षा द्यावी लागते, हे अनुभवता आले. खरोखरच, अपंगांची हेळसांड थांबावी, हि सरकारला नम्र विनंती....

काळी ९च्या सुमारास वडीलांच्या अपंगत्व प्रमाणपञासाठी मी व अंध वडील त्या ठिकाणी गेलो. तेथे पोचल्यानंतर दर बुधवारी व गुरुवारी मोफत प्रमाणपञ दिले जाते हे समजले. या दोन दिवशी रोज १२० अपंगानांच टोकन देउन प्रवेश दिला जातो. १२० अपंगांना प्रवेश दिला जात असल्याने या दोन दिवशी इतरांना माघारी पाठविले जाते. यामुळे पहिल्या 120मध्ये नंबर लागावा यासाठी पहाटे पाचपासूनच अपंग नागरिक रांगा लागतात.

खेड, मंचर, नारायणगाव, इंदापुर, दौंड, टाकळी हाजी, शिरुर व पुणे शहर आदी भागातील कानाकोप-यातून अनेक अपंग आशेने येत असतात. अपेक्षेपोटी काही जण आदल्या दिवशीच मुक्कामी येतात.
१) सकाळी संबंधित ठिकाणी येउन रांगेत उभे राहावे लागते
२) सकाळी ७:३० ते आठ च्या आसपास संबंधित कर्मचारी कामावर हजर होतात व टोकन नंबर देतात.
३) त्यानंतर अपंग व्यक्तींनी जाउन केसपेपर काढायचा व पुन्हा रांगेत जाउन उभे राहायचे.


अपंगांनी ही परिक्षा दिल्यानंतर १-४० व्यक्तींना आतमध्ये प्रवेश दिला जातो. सोबतच्या व्यक्तींना बाहेर पाठविले जाते. या ठिकाणी प्राथमिक तपासणी व नोंदणी केली जाते. यानंतर केसपेपरवर पुढील तपासणीसाठी वॉर्ड नंबर लिहुन त्या ठिकाणी पाठविण्यात येते. अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्यांना दिलेला वॉर्ड शोधावा लागतो. अपंगामध्ये काही मुकबधिर, काहींचे पायात अपंगत्व तर काहींना चालताच येत नसल्याने थेट दोन्ही हातात उचलुन अपंगत्व तपासणी साठी न्यावे लागते. ससूनमधील वॉर्ड शोधता शोधता नाकेनऊ येते. शिवाय, कर्मचारी माहिती सांगण्याचे अजिबात कष्ट घेत नाहीत. रुग्णाला तिथपर्यंत न्यायचं कसं हाच पहिला प्रश्न सोबत आलेल्या नातेवाईकांना पडतो.

पण थांबा... हा प्रवास इथेचं संपत नाही हा. तपासणी नंतर परत संबधित अधिका-यांच्या राहिलेल्या दोन सही शिक्क्यासाठी पुन्हा तो वॉर्ड शोधायचा, झेरॉक्स काढायच्या, ग्रामीण भागातला असेल आणि एसटी बस अपंग प्रमाणपञ काढायचे असेल तर पुन्हा नवीन जिल्हा परीषद गाठायची, तेथे पुन्हा एकदा परिक्षा देऊन प्रमाणपञ बनवायचे. एवढे सगळे झाल्यानंतर मोठ्या आनंदात घरी परतायचे. यामध्ये महिलांसह अपंगाच्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. यामध्ये शौचालयासारखे प्रश्न आहेत. या सर्व प्रकारात प्रमाणपञासाठी पहाट ते दुपार कशी होते हे, खरोखरच समजत नाही. नातेवाईंकापेक्षा रुग्णाला एवढे अग्निदिव्य केले तरच प्रमाणपञ मिळते. ससूनमध्ये अशाप्रकारे रुग्णाची मोठी हेळसांड होत असून हा प्रकार कुठेतरी थांबावा व सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी व्हाव्यात एवढी सरकारला नम्रतेची विनंती. दररोज प्रमाणपञ मिळावे तसेच दूरवरून येणा-यांसाठी वेळ बदलावा. यामागे अपंगांसह रुग्णांचे हाल थांबावेत एवढीच अपेक्षा.
- सतीश केदारी

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य