शिंदोडी - 'भय ईथले संपत नाही'

शिंदोडी येथे गेल्या १० दिवसापासून चोरांच्या दहशतीमुळे घबराट पसरली असून, चोरांनी प्रामुख्याने महिला व मुली यांनाच लक्ष केले असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महिला दिवसासुध्दा शेतात काम करण्यास धजावत नसून गावातील प्रत्येकजण जागून रात्र काढत आहेत. त्यामुळे 'भय ईथले संपत नाही' अशीच काहीशी अवस्था शिंदोडीकरांची झाली आहे.

भौगोलिक परिसर
शिंदोडी गाव हे घोडनदीच्या कडेला असलेल बारमाही बागायती गाव. गावच्या पुर्व, दक्षिण, आणि उत्तर या तीनही दिशांना घोड धरनाच्या पाण्याने वेढा टाकलेला आहे. पच्छिम दिशेला एकच रस्ता असून तो गावात येतो. त्यामुळे घोडधरण झाल्यास आजतागायत ५५ वर्षात गावात कधीच चोरी झाली नसल्याचे जेष्ठ वयोवृद्ध नागरीक सांगतात. गावच्या तीनही दिशेला पाणी आणि एकाच दिशेला रस्ता. त्यामुळे गावाला नैसर्गिकरीत्या तीनही बाजूने पाण्याचच कुंपणच असल्यामुळे कधीही चोरांनी या गावात चोरी करण्याच धाडस केल नाही.

नक्की चोर येतात कुठून?
या वर्षी सगळीकडे दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने घोड धरणाच्या पाणी पातळीतही प्रचंड मोठया प्रमाणात घट झाली आहे. धरणाच्या उत्तर व पुर्व दिशेला असलेल्या राजापुर, माठ, म्हसे, चिंचणी या गावातून नदीपात्रात जाण्यायेण्यासाठी रस्ता मोकळा झाला आहे. त्यामुळे हे चोर याचाच फायदा घेऊन नदीच्या पलीकडून येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळेस ऊसात लपायला जागा असल्याने नदीपात्राच्या कडेने असलेल्या ऊसातच ते लपत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

नक्की चोरीच्या उदेशाने येतात का?

शिंदोडीत गेल्या १० दिवसात दोन महिला व एका १२ वर्षाच्या मुलीवर चोरांनी हल्ला केला. परंतु, नंदा वाळूनज यांचा अपवाद वगळता चोरांनी सोन्याचा ऐवज चोरला नाही. फक्त महिलाना हाताला धरुन ओढन्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिलांच्या अंगावर सोन्याचे दागिने असतानासुध्दा चोर ते घेण्याच्या ऐवजी महिलांना ओढत का नेतात? हाच मोठा प्रश्न आहे. नक्की या चौराना काय पाहीजे? की फक्त महिला व ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे?

ग्रामस्थ भयभीत का?
शिंदोडीत आजपर्यंत अनेक ग्रामस्थांनी चोराला पाहिले. परंतु चोरांनी त्यांच्यावर हल्ला न करता पळ काढला. गावात १० दिवसात एकही घरफोडी झाली नाही. रस्त्याने जाताना कोणत्याही ग्रामस्थाला मारहाण झाली नाही. त्यामुळे हे नक्की चोराच आहेत की अजून कोण? या बाबत ग्रामस्थ साशंक आहेत. गावातील शाळेत जाणारी लहान मुले चोर पळवून नेतात या अफवेमुळे पालक भयभीत झाले आहेत. परंतु, असा कोणताही प्रकार झालेला नाही.

युवकांचा जागता पहारा
शिंदोडी गावात गावठान, मानेवस्ती, भिल्लवस्ती, कडावस्ती, दत्तवाडी, कोळपेवस्ती अश्या अनेक वस्त्यावर तरुणांनी गट केले आहेत. रात्रभर हे तरुण आपापल्या भागात पहारा देत असतात. हातात काठी, कुर्हाड, बॅटरी अशा पूर्ण बंदोस्तात रात्रभर हे तरुण दुचाकीवर आपापल्या वस्तीवर फिरुन पहारा देतात. गावातील काही युवकांनी सोशल नेटवर्क असलेल्या whatsapp वर 'खबरबात शिंदोडी गावची' या नावाचा ग्रुप तयार केला आहे. त्यामध्ये गावातील विविध भागातील ९० सदस्य आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून गावात कुठे काय चालले आहे याची माहिती एका क्षणात मिळत आहे. चोरांना अटकाव करण्यात यश येत आहे. गावात एखादया ठिकाणी चोरची चाहुल लागल्यास सर्व युवक तो परिसर पिंजून काढत आहेत.

अफवांवर विश्वास ठेऊ नका

शिंदोडी, निमोणे, गुनाटसह आसपासच्या परिसरात पोलिसांची गस्त चालू आहे. शिरुर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी या परिसरातल्या सर्व शाळांमध्ये व ग्रामस्थांची भेट घेतली. या परिसरात लहान मुले पळवल्याचा कोणताही प्रकार घडला नसून पालक, ग्रामस्थ व युवकांनी अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही गावात काही अनुचित प्रकार घडल्यास ९५५२५२१५६५ या मोबाईल वर त्वरीत संपर्क साधावा असे www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.
- तेजस फडके
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही