करंदी - हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....

हाटे पाच-साडेपाच वाजले की गणपती माळावरचा आवाज स्पष्टपणे कानावर पडतो आणि रोजचीच साखरझोप उडते. दोन-चार लहान मुलं रडत आहेत, एकीकडे भांड्यांचा आवाज येतोय... बायका आपल्या मुलांना ओरडून गप्प करत आहेत, बैलांच्या गळ्यातल्या घुंगरमाळांचा आवज येतोय...

बैलगाडीच्या चाकाला वंगान लाऊन चाक हलवण्याचा देखील आवाज स्पष्टपणे जाणवतोय, एखादा बैल हंबरतोय..., बैलांचे मालक एकमेकांना हाक मारून आटपले की नाही याची खत्री करत आहेत. काहींच्या गाड्या तर रस्त्याला पण लागल्यात....कर्रर्रर्रर्रर्र.....~ कर्रर्रर्रर्रर्र... ~ "हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र हयना बांड्या" असा काहीसा आवाज दररोज कानावर पडतो... कोण सरळ गावच्या दिशेने, कोण पाटाने खालती तर कोण वरती जातो...,  ही सारी लगबग सूरू असते ती आमच्या शेतात ऊस तोडायला येणाऱया ऊस तोडणी कामगारांची...

बैलगाडीत चार-पाच लहान लेकरं ज्यांच्या आंगावर भोकं पडलेली कपडे, एखादी शेळी, पाण्याचा रिकामा हंडा दोन-तीन ताटल्या भाकरीचं गाठोडं उसाच वाढं त्यावर आपल्या बाळाला दुध पाजत बसलेली आई आणि पूढे बैल हाकणारा तीस-पस्तीस वर्षाचा बाप आणि कडाक्याची थंडी... ऊसाच्या फडात पोहचताच प्रत्येकजण बैलांना दोन-तीन वाढ्याचं भेळं (भेळं चा अर्थ पेंडी असा होतो) टाकून कोयता हातात घेतो व त्याच्या वाट्याला आलेल्या चार-पाच ऊसाच्या सर्या सपासप तोडायला सुरवात असा करतो जणू त्याच्या आयुष्यात असणार्या दु:ख आणि कष्टावर कोयत्याने वार करतोय. त्याने तोडलेल्या ऊसाच्या मोळ्या बांधण्याच काम त्याची अर्धांगिनी जणू त्याच्या कष्टाची जूळवाजुळव करत आहे. १०-१२ वर्षाची मोठी मुलगी उरलेल्या वाढ्याचं भेळं (पेंड्या) अनवानी पायाने आवळून बांधत आहे...

दुपारचं कडक ऊन भूकेलेली लेकरं आंगावर सदरा आहे तर विजार नाही, विजार आहे तर सदरा नाही.... डोळ्यांतून आश्रूंच्या धारा, नाकातून पिवळासर शेंबूड ओठांवर येतोय, तोंडात येण्याच्या भितीने मनघटाने गालावर पांगवला जातो.. रगरगत्या ऊन्हाचे चटके जीव कासावेस करत आहे, जीव पिळवटून जातोय जीवाची लाही-लाही होतेय. वाढलेल्या केसातून आणि गालावरच्या काळ्याभोर धाडीतून घामाचे टीपके पाचटात विलीन होत आहेत. भूक लागली म्हणून हातावरचं भाकरीचे तूकडे मोडतोय आणि भोवताली आंगावर उड्या मारणार्या त्याच्या पिल्लांना देखील भरवतोय. खर तर याच्यातच तो त्याच्या आयुष्याच सुख शोधतोय असं वाटतं...

उसाचा ट्रक आला म्हणून लगबगीने अर्धपोटी बैलजोडी जूंपून ऊस वाहतूकीला सुरवात करतो. तीस-तीस, पन्नास-पन्नास किलो वजनाच्या मोळ्या छातीवर झेलतो व बैलगाडीतून ट्रकमध्ये भरतो. ट्रक भरायला किमान रात्रीचे आठ वाजून जातात. दिवसभर तोडलेल्या ऊसाची वाढी दारोदारी जाऊन विकतो. मिळलेल्या पैशातून आतपाव तेल, पावशेर साखर, एक-दोन अंडी घेऊन पून्हा गणपतीच्या माळावर आपल्या पाच बाय दहाच्या कोपीत पोहचतो दोन घास खातो आणि गाढ निवांत झोपतो.

आठवड्यातून एकदा मेलेली कोंबडी कमी भावात मिळते म्हणून लेकरांना बायकोसोबत खाऊ घालतो. आठवड्यातून एकदा अंगोळ करून तीच कपडे धूवून पून्हा घालतो. आँक्टोबर ते पून्हा मे पर्यंत असाच दिनक्रम रोज नजरेस पडतो. बदल मात्र शुन्य. गेले ८-१० वर्षापासून करंदी गावात मी सगळी हीच परिस्थिति पाहतोय... आणि अनुभवतोय.

गरज आहे फक्त बदलाची गरज आहे सहानुभूतिची... जेष्ठ नेते तर यांच्यावर सहानुभूती सोडाच पण हसू येण्याजोगे वक्तव्य करतात, याचच फार मोठं दु:ख वाटतं.... असो आज शेतकर्यांचीच आशी परिस्थिति आहे तर कामगारांची कशी असेल याचा विचार न केलेलाच बरा....!

- विशाल वर्पे, 9860080879 करंदी.
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही