शिरूर - मद्यसेवनाचे डोळ्यांवरील दुष्परिणाम

सोशल मीडियाच्या जगात सोशल ड्रिंकिंग ही संकल्पनाही तितकीच वेगाने लोकप्रिय होतीय. 'मद्यसेवन हे व्यसन म्हणून करत नाही' असं म्हणणाऱ्यांची आणि त्या कृतीचे समर्थन 'कामाचा भाग' म्हणून किंवा 'समाजातील स्टेटस' म्हणून दाखवून देणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

अतिमद्यसेवनामुळे यकृतासह अन्य भागांवरही विपरीत परिणाम होतात हे आपण जाणतोच. मद्यसेवनामुळे डोळ्यांवरसुद्धा निश्चितच काही परिणाम होतात. रस्त्यावरील खूपसे अपघात हे दारूच्या अंमलाखाली गाडी चालविल्यामुळे घडू शकतात. 'मला काही झालेले नाही, मी नीट गाडी चालवू शकतो' असे म्हणत ही मंडळी वाहने चालवितात आणि दारुमुळे येणाऱ्या एकूणच खोट्या आत्मविश्वासामुळे अपघातास कारणीभूत ठरु शकतात. डोळ्यांवर नेमका मद्यसेवनाचा काय व कसा परिणाम होतो याबाबतची माहिती या लेखात दिली आहे.

दारूमुळे डोळ्यावर किंवा दृष्टीवर खालील प्रकारचे परिणाम होऊ शकतात-

१. दृष्टी आणि डोळ्याच्या कार्यक्षमतेत घट-
दृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे डोळ्याची बाहुली. डोळ्याच्या आत जाणारा प्रकाश नियंत्रित करण्याचे काम ही बाहुली करत असते. प्रकाश नियंत्रित केल्यामुळे कमी-अधिक प्रकाशाच्या परिस्थितींमध्ये आपल्याला सर्वोत्तम दृष्टी (ऑप्टिमम व्हिजन) मिळू शकते. उदाहरणार्थ आपण अंधारात थांबलेलो असलो आणि आजूबाजूला मंद प्रकाश असेल तर आपल्याला सर्वात चांगले दिसावे म्हणून प्रकाशाचे प्रमाण वाढविण्यासाठी डोळ्यातील बाहुली मोठी बनते. दुसऱ्या परिस्थितीत जर आपण प्रखर प्रकाशात उभे असू तर डोळ्यामध्ये जाणारा प्रकाश कमी व्हावा म्हणून बाहुली छोटी होऊन प्रकाश नियंत्रित करते. बाहुली मोठी किंवा छोटी होण्याची ही क्रिया कमी वेळेत होणे आवश्यक असते आणि तरच तिचा उपयोग होतो.

दारु पिण्याचा तत्काळ परिणाम म्हणजे डोळ्याची बाहुली मोठी किंवा छोटी होण्याचा वेग मंदावतो. उदा. रात्रीच्या वेळी दारु पिऊन गाडी चालवत असू आणि समोरील वाहनाचे दिवे प्रखर असतील तर डोळ्याची बाहुली लगेच छोटी झाली पाहिजे. दारुच्या सेवनामुळे बाहुली छोटी होण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे आपल्याला क्षणिक वेळेसाठी काही दिसेनासे होते व अपघात होण्याची शक्यता वाढते. अगदी कमी प्रमाणात दारु पिणाऱ्या व्यक्तीनेही हे लक्षात घेतले पाहिजे की दारु प्यायल्यानंतर आपली दृष्टी ही निश्चितच कमी कार्यक्षम झालेले आहे.

२. 'कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी'चा अभाव-

कमी प्रकाशात आपल्याला दोन वस्तू वेगवेगळ्या दिसतात व कळतात कारण त्या वस्तूंवरुन कमी-अधिक प्रमाणात परिवर्तित झालेला प्रकाश. याला 'कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी' म्हणतात. ही संवेदनशीलता दारु प्यायल्यामुळे कमी होते. म्हणजे दोन वेगवेगळ्या वस्तू या वेगळ्या आहेत हे डोळ्याला चटकन कळू शकत नाही. या कारणामुळेही रात्रीच्या वेळी अपघात होऊ शकतात किंवा एखाद्याला इजा होऊ शकते.

३. डोळ्यांचा कोरडेपणा -
मद्यसेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा आणखी एक प्रकार म्हणजे डोळ्याला येणारा कोरडेपणा. या मुळे दृष्टीचा दर्जा खालावतो. म्हणून दररोज मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींचे डोळे लाल दिसतात.

४. पेशी कमजोर होणे -
'अँटी-ऑक्सिडंट्स' हे 'फ्री रॅडिकल्स' कमी करतात. दारु प्यायल्यामुळे 'अँटीऑक्सिडंट्स'चे प्रमाण घटते आणि परिणामी 'फ्री रॅडिकल्स' वाढतात. त्यामुळे पेशी लवकर कमजोर होऊ शकतात.

५. मोतीबिंदूचे प्रमाण वाढते -
दारु अधिक पिणाऱ्या व्यक्तींमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण वाढते असे दिसून आले आहे.

६. जीवनसत्त्वांची कमतरता -
वर्षानुवर्ष दररोज आणि मोठ्या प्रमाणात दारु पिणाऱ्या व्यक्तींमध्ये दीर्घकाळ जीवनसत्त्वांच्या कमतरतेची (व्हिटॅमिन डेफिशियन्सी) शक्यता असते व त्यामुळे अर्धांगवायु (पॅरॅलिसिस) होण्याची किंवा डोळ्याचे स्नायू कमजोर होण्याचीही शक्यता असते. हे फारच क्वचित घडून येते. रात्रीचे कमी दिसते (रातांधळेपणा), बुबुळ पातळ होते, त्याला छिद्र पडते व डोळ्याला अंधत्वही येते. बऱ्याचदा दारु व तंबाखुचे सेवनही एकत्र करणाऱ्या व्यक्तींमध्ये वेदनारहित अंधत्व येते ज्याला 'ऑप्टिक न्युरोपॅथी' म्हणतो. वेदना झाल्या तर एखादी व्यक्ति वेदनेवरील उपाय म्हणून काहीतरी कृती करते पण जिथे दुखणे नाही आणि दृष्टी कमी होतीये हे लक्षात येत नाही, तिथे ती व्यक्ती गाफील राहते व त्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो.

- डॉ. संजय सावरकर
संचालक, मेडिलेसर कॅटरॅक्ट अँड लेसर सेंटर, फर्ग्युसन
महाविद्यालय रस्ता, तुकाराम महाराज पादुका चौक, पुणे
संपर्कः (०२०)३२५३३७७७; २५५३७७७०

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य