शिरूर - मुक्त-बंधनातुन

"मावशी ही संगीताच नं? ओ" "हो ग!" " कसं चाललय हीचं?" "शिवाजी नगरला फ्लॅट घेतलाय. मुलीचं लग्न केलयं . मुलगा इंजीनिअर झालाय". समोरुन चाललेल्या संगीताला पाहुन मी मावशींना विचारलं. निघण्याची वेळ झाली म्हणून राहुल नी मावशीच्या मुलाने थांबवलेल्या रिक्षात बसुन मावशींचा निरोप घेतला. संगीता होती अगदि तशीच आहे. फक्त केसात काही चंदेरी तारा नी चेहर्‍यावरचा आत्मविश्वास सोडला तर! रिक्षात बसल्या बसल्या चं मी वीस वर्षांपुर्वी भुतकाळात मागे गेले...

लग्न करून आले तेव्हा दाराला-दार होतं म्हणून शेजार च्या मावशींशी आधी ओळख, मग गाढ मैत्री झाली. फक्त दहावी शिकलेल्या मावशींकडे एवढे अनुभव  होते की त्यांच्या पुढे पदवीधर ही हात टेकतील. फावल्या वेळात मी मावशींकडे जाऊन बसायची नी तिथेच कधीतरी संगीता यायची. वयाने साधारण मावशी पेक्षा थोडी लहान असावी. काॅलनीच्या कोपर्‍यावर घर होतं तीचं. सास-यांचं सोन्याचं दुकान दिर बघायचा. एकत्र कुटुंबामध्ये राहायची ती. नवरा कंपनीत पर्मनंट नोकरीवर होता. एक मुलगा, एक मुलगी, सासु-सासरे, दिर, हि नी हीचा नवरा असे सातजण राहायचे कुटुंबात. गावाकडे शेती पिकायची. ते सगळं इकडे यायचं म्हणजे इकडे फक्त तेल मिठाचाचं काय तो खर्च. तशी खाऊन पिऊन सुखी-समाधानी होती. पण नवरा दारू पिऊ लागला नी होत्याच नव्हतं झालं.

सुरुवातीला समजावुन पाहीलं, भांडुन पाहीलं पण फरक पडायचं काय नाव घेईना. सासु सास-यांना बघवेना म्हणुन ते गावाला निघुन गेले. पण नव-यावर परीणाम झाला नाही. रात्री-अपरात्री दारू पिऊन पडत-झडत लडखडत घरात यायचा तो . तोपर्यंत पोरं झोपलेली असायची. नी दिर दुकानातच झोपायचा. ही त्याला आत घेऊन परत बिछान्यावर पडायची. तर हाही तिच्यावर उताना होऊन  घुरत राहायचा. तोंडा-अंगाला येणारा उग्र वास तीच्या समद्या शरीरात घुसायचा.त्याच्या तोंडातील पडणारी लाळ तिची साडी ओली करायचा. त्याचा हात छातीवरील पदराला जाताच ही ताकदीने त्याच्यापेक्षा अर्धी असुनही जीव खाऊन त्याला कोपर्‍यात ढकलायची. तो कोपर्‍यात कलमडायचा. पण थोडा जरी शुद्धीवर असला तरी तुडवतुडव तुडवायचा तिला. गोरीपान संगीता काळी निळी व्हायची.सुरवातीला दिर,शेजारी मध्ये पडत. पण 'रोजचं मढं त्याला कोण रडं' म्हणतात त्या प्रमाणे नंतर तेही येईनासे झाले.

असाच एक दिवशी मारत असतानां सहन न होऊन हीने तशीच उलटी एक लगावली त्याला.  पुरुषार्थ कुठेतरी दुखावला त्याचा. नी तो घर सोडुन निघुन गेला कायमचाचं. सुरवातीला बरीच शोधाशोध केली पण हा सापडला नाही मग हीने ही नाद सोडला. पण तरण्याताठ्या सुनेसोबत आपल्या दुसर्‍या लेकाला असाच कसा राहु देणारं? आगीजवळ लोणीच ठेवण्या चा प्रकार होता तो. म्हणून सास-यांनीं त्याचं लग्न लावुन वेगळा संसार मांडुन दिला. आता ही नी तीची पोरच एकटी राहु लागली या घरात.

तेव्हाच सावंत भेटला तीला. कोणता तरी पेपर काढायचा.तसेच एका बड्या पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता होता तो. आमदार साहेबांच्या मर्जीतला. हीला प्रेम नी त्याला आधार अशा तडजोडीवर त्यांचं नातं सुरू झालं. सुरवातीला चोरून मग राजरोस. पण अजुन तो तिच्याकडे राहायला आला नव्हता.

पंढरपुरच्या विठ्ठल दर्शनाला आम्ही बायका गेलेलो तेव्हा तिथल्याचं एका पाव्हण्या कडे निरोप आला की हिच्या नवर्‍याला एक्सीडंट झालायं. तशीच पायरीला हात लाऊन आम्ही परतलो. त्यानंतर संगीता कधीच ती पायरी पुन्हा चढली नाही. घरी आल्यावर कळले की नवरा जागेवरच मेला. त्याचा अंत्यविधी उरकून पुढील दहावा वैगरे झाल्यावर परिस्थीती निवळलेली पाहुन तीच्या माहेर सासरच्यानीं मिटिंग घेतली. हिचा नी तिच्या मुलांच्या जबाबदारी चा निर्णय घ्यायचा होता. माहेरचे तीला सांभाळायला तयार होते पण मुलांना नाही. सासरच्यांना फक्त मुलं हवी होती. हीच्यावर निर्णय सोपवण्यात आला.

ती मुलांना घेऊन घराबाहेर पडली. नवर्‍याच्या कंपनीतुन मिळालेली रक्कमेमधुन फ्लॅट विकत घेतला तिने. उरलेले पैसे सावंतला बिजनेसला दिले. सासर माहेरच्या प्रॉपर्टीवर कायद्याने हक्क मागीतला नी लढुन तो मिळवलाही. सावंत कितीही म्हटलं तरी बिनलग्नाचाच होता. आपला संसार झालाय पण त्याला कुणी तरी त्याची माणसं हवी म्हणून तीनेच पुढाकार घेऊन त्याचं लग्न लावुन दिलं पण सावंत हीच्याशी प्रामाणिकच राहीला. त्यांच्या नात्यात त्याच्या लग्नाने जास्त फरक पडला नाही.

हळूहळू हे प्रकरण सावंताच्या बायको पर्यंत पोहचलं तीने भांडायला सुरवात केली पण स्वतःचचं खरं करायची सवय असलेला तो ना बायकोला वदला ना संगीताला. त्याने एक लेकरू होऊनही बायकोला सोडचिठ्ठी दिली नी कायमचा हीच्याच घरी येऊन राहु लागला.

मध्यंतरी दगडफेक,आंदोलनाच्या भानगडीत सावंत जेलयात्राही करून आला. आता ते दोघच राहतात. संगीताचा मुलगा इंजीनिअरींग करून नोकरी साठी पुण्याला राहतोय नी मुलीचं नात्यातच चांगलं घर बघुन लग्न लावुन दिलयं संगीताने. चांगला बक्कळ हुंडा ही दिला. शेवटी पैशापुढे सगळीच पाप धुऊन जातात हेच खरं. बीन नावाचं बंधनात नसलेलं तरी एकमेकांना बांधुन ठेवलेलं एक नातं दोघंही इमाने-इतबारे निभावतायत. तेही राजरोस समाजापुढे.

(कथेचा गाभा सत्यघटनेवर आधारित असला तरी काही प्रसंग, नाव, स्थळ कथेच्या आवश्यकतेप्रमाणे काल्पनिक घेतले आहेत.)

मुळ लेखिका :
प्रिती सनी कातळकर
शब्दांकन :
सतीश केदारी

संबंधित लेख

  • 1