वाघाळे - कर्मयोगी दादा

वाघाळे गावचे दिवंगत (आदर्श) सरपंच कुंडलिक (दादा) जिजाबा थोरात यांचे शिक्षण अवघे चौथी पर्यंत, परंतु, गावातील प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण घेऊन मोठे व्हावे. गावचा विकास करावा यासाठी दादांची वयाच्या ७१ व्या वर्षीही धडपड सुरू आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक, धार्मिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असतो. दादांशी बातचीत करताना प्रत्येक शब्दागणीक गावच्या विकासाचा ध्यास घेतलेले दादा दिसून येतात...

शैक्षणिक कार्य ः
दादांचे शिक्षण अवघे चौथीपर्यंत. परंतु, गावातील प्रत्येक मुलाने गावातच शिक्षण घेऊन मोठे व्हावे, गावचा विकास करावा यासाठी दादांची सतत धडपड सुरू आहे. गावात पाचवी पर्यंत मराठी शाळा होती. त्यानंतर गावातील मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागे. बाहेरगावी जाण्यासाठी वाहनांची सुविधा नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत, तर अनेक जण अर्धवट शिक्षण थांबवत. मुलींच्या शिक्षणाबाबत तर काही बोलायलाच नको, ही सल दादांना सतत खटकत होती.

गावात दहावीपर्यंत शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी दादांनी प्रयत्न सुरू केले. गावची लोकसंख्या अवघी दोन हजारच्या आसपास असल्याने ग्रामपंचायतही छोटी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी गोळा करून गावात हायस्कूल उभारले. हायस्कूल एक वर्ष स्वतः सांभाळून पुढे रयत शिक्षण संस्थेकडे दिले. हायस्कूलची सुरवात करताना शिक्षकांना तीन वर्ष वर्गणी गोळा करून वेतन दिले जात होते. बाहेर गावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीचे तिकिटे काढून देण्यात येत होती. सध्या गावामध्ये दहावीपर्यंतचे वर्ग असून, परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी गावात येत आहेत. सलग पाच वर्ष इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लावून, विद्यालयाने शिक्षणाची गुणवत्ता दाखवून दिली आहे. आता इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी दादांचे प्रयत्न सुरू आहेत. शाळेला भव्य कंपाउंड असून, लोक वर्गणीतून शाळेसाठी पाच खोल्या बांधण्यात आल्या आहेत.

सर्व शिक्षण अभियानातून मराठी शाळेसाठी खोल्यांचे बांधकाम मंजूर करून आठ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून, वर्गांमध्ये "सीसी टीव्ही' कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यातूनच तंत्रज्ञानाच्या बाबतीतही शाळा पुढे असल्याचे पहावयास मिळते. इयत्ता २ री पासूनच्या पुढील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बॅंचेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत कार्य ः
दादांनी दहा वर्ष गावचे सरपंचपद भूषविले असून, त्यांना २००१-२००२ मध्ये आदर्श सरपंच पुरस्कार देऊन राज्य सरकारने गौरविले आहे. स्वच्छतेमुळे ग्रामस्वच्छता अभियानाचा तालुक्‍यामधून गावाने पहिला नंबर मिळवला आहे. दादा दहा वर्षे तंटामुक्तीचे अध्यक्ष असून, गावातील खटले बाहेर जाऊन दिले जात नाहीत. ग्रामपंचायतीसाठी भव्य इमारत बांधली असून, व्यापारी संकुलासाठी १४ गाळे बांधण्यात आले आहेत. गावाच्या प्रवेशद्वारावर कमान उभी करण्यात आली आहे. सध्या गावामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी घाटाचे बांधकाम सुरू आहे. गावातील अंतर्गत रस्ते चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहेत. वाघाळे ते वरुडे गावांमधील तीन कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. गावातील अनेक युवक रांजणगाव "एमआयडीसी'मध्ये नोकरीसाठी जातात. त्यांना रात्री-अपरात्री नोकरीसाठी जावे लागते. त्यामुळे वाघाळे ते रांजणगाव हा रस्ता करण्यासाठी दादांचे प्रयत्न सुरू आहेत. गावामध्ये पूर्णपणे दारूबंदी आहे. सध्या गावात ७५ टक्के घरांमध्ये संडासाची सुविधा असून, एका वर्षात गाव हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. तसेच बंद नळातून पाणी पुरवठा करण्यासाठी दादा प्रयत्न करत आहेत.

सामाजिक कार्य ः
सतत गोरगरिबांना मदत करून सामाजिक कार्यात दादा नेहमीच पुढे असतात. मग ते कोणत्याही पद्धतीचे कार्य असो, अगदी विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून ते मुलीच्या लग्नापर्यंत मदत करतात. मदतीसाठी दादांकडे गेलेले नागरिक मोकळ्या हाताने फिरल्याचे ऐकिवात नाही. वेळप्रसंगी अनेकांवर (प्रेमाने?) रागवणारे दादा मदतीला सतत पुढे असतात. अनेकजण भेट घेण्यासाठी दादांच्या घरी येतात. घरी आलेल्या अतिथीला वेळेनुसार जेवण, चहा, नाष्टा केल्याशिवाय मागे फिरताच येत नाही, तशी दादांची आज्ञाच असते. ही आज्ञा मोडण्याचे धाडसही सहसा कोणी करत नाही. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या १५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा (आयटीआय) खर्च दादांनी उचलला होता. आज हेच युवक मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करताना दिसतात. गावातील अनेक मुलींची लग्न जमविण्यापासून ते लग्न पार पडेपर्यंत स्वतः जातीने उपस्थित राहून मदत करतात. काही लग्नांचा खर्च स्वतः उचलला आहे. गावातील वेगवेगळ्या अपघातात जखमी झालेल्यांनाही मदत केली आहे. यामधूनच दादांचे सामाजिक कार्य दिसून येते.

धार्मिक कार्य ः
गावातील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गावात नेहमी सप्ताह, स्वाध्यायचे कार्यक्रम चालू असतात. गावात महानुभव आश्रम असून, या मंदिरासाठीही मदत केली आहे. गेल्या दहा वर्षापासून दादांच्या घरी वर्षातून दोन वेळा कीर्तनाचे कार्यक्रम ठेवले जातात. यासाठी नामवंत कीर्तनकारांना आमंत्रित केले जाते.

दादांना मिळालेले पुरस्कार ः
  1. २००१-२००२ - आदर्श सरपंच पुरस्कार
  2. २००२-२००३ - समाजकल्याण विभाग व्यसनमुक्ती प्रचार केल्याबद्दल राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार.
  3. २००२-२००३ - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत पुरस्कार.
  4. २०१०-२०११ - ग्रामरत्न पुरस्कार - वाघाळे
'कर्मयोगी' कुंडलिकराव (दादा) पुस्तकाचे प्रकाशन

http://www.esakal.com/esakal/20110208/5252479140390186464.htm

http://www.agrowon.com/Agrowon/20110212/5621265882264471608.htm


पुस्तक प्रकाशनाचे फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

- शरद धायबर sharad.dhaybar@gmail.com

(टिप - या सदरासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील योग्य माहिती फोटोसहित या सदरामध्ये प्रसिद्ध केले जाईल. या सदरासाठी बालपनातील गावातील तुमच्या आठवणी, गावाविषयी माहिती, गावातील विविध अनुभव लिहून आमच्याकडे खालील पत्त्यावर पाठविल्यास प्रसिद्धी दिली जाईल. - धन्यवाद)

संपर्क -
गणेश पवार - ९७६६७३२७२९
शिरूर तालुका.कॉम,
ईश्वरी प्रकाशन, पुणे
ई-मेल - shirurtaluka@gmail.com
फॅक्स - 020-26052342.

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही