शिरूर - मी पाविञ्यचं सिद्ध करायचं का?- थेट गावातुन

अशीच शेजारच्या गावातील घडलेली ही घटना.अंगावर शहारे अाणणारी.१९९८ साली शाळा सोडली अन शेजारच्या पाहुण्या संगती फिरण्यास दुस-या गावी गेलो.तिथंचं शेजारच्या पालामधी एक स्ञी बाळंतपणाला अाली होती.तिचं दिस भरलं होतं.पावशेर खोबरं,पावशेर शेंगदाणे, पावशेर गुळ, अशा त-हेने अाहार देण्यासाठी वस्तु अाणल्या होत्या.संध्याकाळच्या वेळेला मुल जन्मायच्या वेळेस अंधारलेले वातावरण होते.वादळी पावसाची सुरवात होत होती.विजेचा होणारा कडकडाट वातावरणात अधिकच तणाव निर्माण करत होता.बाळंतपणासाठी माञ त्या बाईला पालापासुन दुर एकटीलाच बसविले होते.जसजशी कळ लागत होती,तिच्या वेदनेत भर पडत  होती.तिही मोठ्याने ओरडत  होती.विनंती करत होती.मदतीला माञ कोणी हि येत नव्हते.तशीच ती रक्तात माखलेली जीव वाचवण्यासाठी कसेबसे जवळच्या दवाखान्यात  दाखल झाली.सकाळीच निरोप अाला कि,पारध्याची लोंबी गेली...

तशी ती पुण्याची.हे तिचे तिसरे लग्न झालेले.पहिला नवरा लहाण होता म्हणुन सोडलेला तर दुसरा गुन्हेगारीमुळे जेलमध्ये गेलेला अन तिसरा बेवडा.हुंड्याचे २६००० घेउन मुलीच्या बापाने लग्न करुन दिले.लग्न तरी कसे हळद घेउन लावली अान गाठ बांधली कि झालं लग्न.

पावसाचे दिवस अाणि राञीची वेळ.भर पावसात त्या बाईला बाळंतपणासाठी पालाबाहेर ठेवलेले.वरुन धो-धो कोसळना-या पावसाच्या सरी अान ती माञ मदतीसाठी मोठमोठ्याने विनवण्या करत होती.कोणीही मदतीला पुढे येत नव्हतं ना अाक्रोष ऐकत होतं.

पालाच्या अातुन सासु म्हणणारी म्हणत होती,"अागं लोंबे,सांगुन टाक काहि पाप केलं असलं तर? कोणाच्या संगं गेली हुतीस ? खरं सांग तु गुन्हा केलाय का ?" अशाच प्रश्नाचा भडिमार लोंबीवर सुरु होता.तर ती माञ मदतीसाठी जमिनीवर डोकं अापटुन घेत होती.देवाला मरणासाठी साकडं घालत होती.काहि वेळानं नवरा म्हणणारा उठुन तिच्या जवळ गेला अन पोटावर कचकन पाय ठेवला व तिची एकदाची सुटका केली.यात पोटातलं मुल मेलं होतं पण ती माञ वाचली.रक्त अाता मोठ्या प्रमाणात भळाभळा वाहु लागलं होतं.

धो- धो कोसळना-या पावसात अन मोठ मोठ्या कडकडना-या विजांना सावरत उभा पाउस अंगावर झेलत ती वेदना सहन करत होती.दु:खाचा डोंगर नशीबी घेत पालापासुन थोड्या अंतरावर पोटच्या गोळ्याला एकदा अखेरचं कवटाळलं अन छोटासा खड्डा घेउन त्या बाळाला धरतीमातेच्या पोटात विलीन केलं.अशातचं नाळ हि पोटातचं तुटुन राहिली होती.अाता स्वत: ला अशा हि परिस्थितीत थोडं सावरत डोंगरद-या,काटयाकुट्यातुन रस्ता शोधत तिने दहा ते बारा किलोमीटर दुर असलेल्या दवाखान्याची वाट धरली. डोळ्यात अश्रु दाटलेले तर धो धो कोसळणारा पाउस झेलत पहाटेच्या पाच वाजता दवाखान्याच्या पायरीवर पोहोचली अन ती जागीच कोसळली.

सकाळी गावभर वार्ता पोहोचली लोंबी गेल्याची.सारा गाव गोळा झाला पण  लोंबीच्या प्रेताला माञ कोणी ही हात लावेना.सर्व नातेवाईक लांबुनच तमाशा पाहत होते. अखेर गावक-यांनीच गावाबाहेर टेकडीवर नेवुन तिचे दफन केले.सासु, सासरे,दिर, भावजयांनी शेवटपर्यंत लोंबीच्या प्रेताला हात लावला नव्हता.


लोंबी गेली पण जाताना खुप काहि ठेवुन गेली, देउन गेली अन शिकवुनही गेली. खरचं बाईचा जन्म असाही असतो? या हि जन्मात सितामाईसारखं पाविञ्य सिद्धचं केल्यानंतर तुम्ही स्विकारणार अाहात ? असे अनेक प्रश्न मनात ठेवुन...(कथा-सत्य घटनेवर अाधारित)

-लेखक नामदेव भोसले(मराशीकार)
मोबाइल नं  : ८८८८६९८८७०
शब्दांकन- :सतीश केदारी

संबंधित लेख

  • 1