वाघाळे - माणसाची प्रतिष्ठाच घालतेय हुंड्याला खंत पाणी(रविवार विशेष)

हुंडा पद्धतीच्या बाबतीत आज समाजातील प्रत्येकच माणूस जवळजवळ डुप्लिकेटच आहे. वधू पक्ष असेल तर हुंडापद्धतीला शिव्याव्याप दिले जातात. वर पक्ष असेल तर हुंड्याचे समर्थन केले जाते. याला कारण, हुंड्यासाठी जेवढा वर पक्ष जबाबदार आहे, तेवढाच वधू पक्षही जबाबदार आहे. या पद्धतीला दोन्ही पक्षांकडून आजपर्यंत मिळत आलेल्या प्रतिसादामुळेच अनेक मुलींना आत्महत्या करण्याचा मार्ग स्विकारावा लागला आहे.आणि या हुंडा देण्या आणि घेण्याला वर आणि वधू कडील दोन्ही पक्ष तेवढेच जबाबदार आहेत व हुंडा हे एकप्रकारचे  प्रलोभन आहे.

महाराष्ट्रात आणि विशेषत; मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रशन ऐरणीवर आला होता परंतू आत्ता याच मराठवाड्यात हुंडा देण्यासाठी शेतकरी बापाकडे पैसे नसल्याने मुलीही आत्महत्या करत आहेत. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकरी बापाकडे हुंडा देण्यासाठी पैसे नसल्याने एका वर्षात दोन मुलींनी आत्महत्या केल्या होत्या, या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.आपण म्हणतो हुंडा घेवू नका आणि हुंडा देवू नका परंतू हुंडा देऊ नका म्हणनारेच लोक हुंडा देतात अन् मोठ्या तो-यात सागतात आम्ही एवढा हुंडा घेतला तुम्ही किती घेतला ? अंस म्हणून प्रत्येक जण हुंडा घेतो आणि देतो. त्यामुळे या हुंड्याला माणसाची प्रतिष्ठाच घालतेय खतपाणी.

आणि हे जर मिळत असेल  तर आणि हमखास हुंडा  मिळतोच म्हणून केवळ अपवादात्मक अपवाद वगळता, लाखात एखादा वर पक्ष हुंडा घेण्यास नकार देतो व शिवाय हुंडा घेणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षणही  मानले जाते.जितकी हुंडा रक्कम मोठी तितका अधिकचा मोठेपणा, बडेजाव मिरविण्याची संधी अधिक महत्त्वाची मानली जाते. महत्त्वाचे म्हणजे याच वर पक्षाने प्रत्येक मुलीच्या लग्नाच्या वेळी वर पक्षाच्या अपेक्षेइतका हुंडा मोजलेला असतो.

मुलीच्या लग्नाच्या वेळी वधू पक्षाला हुंडा मोजावाच लागतो. त्याशिवाय मुलींची लग्न होत नाहीत, अशी प्रत्येक वधू पित्याची हुंडा ही अगतिकता, अपरिहार्यता, मजबुरी असेल तर मुलाच्या लग्नाच्या वेळी हुंडा स्वीकारण्यात किंबहुना मागणी करण्यात, त्यासाठी अडून बसण्यातही काही गैर नाही, असा सर्वांचा समज आहे. हुंड्याच्या बाबतीत एक विचित्र मानसिकता समाजात आहे. कुठल्याही प्रकारे ही समस्या हाती लागण्यासारखी नाही. 

एकीकडे मुलीच्या लग्नामध्ये हुंडा द्यायला पैसे नाहीत, म्हणून गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. एवढेच नव्हे तर वडिलांच्या डोक्यावरचे ओझे कमी व्हावे, म्हणून लातूरच्या शितल वायाळ या तरुणीने आत्महत्या केल्याची घटनाही हल्लीच घडली. आजच्या काळामध्येदेखील या घटना कानावर पडल्या की मन सुन्न होते. दुसरीकडे लग्नातील वायफळ खर्चाला कात्री लावत काही तरुण जोडपी सामाजिक कार्यासाठी स्वेच्छेने आर्थिक साहय्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. आता या दोन घटनांमधून कोणती घटना समाजासाठी हितकारक आणि कोणती घातक आहे, याचा जरा गांभीर्याने विचार करायला हवा.

आज घराघरात हुंड्याचे समर्थक असल्यामुळे सर्व आया-बहिणी सासर आणि माहेरच्या तावडीत सापडून हतबल झाल्या आहेत. हा सर्व प्रकार फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत, कर्जाला बळी पडणार्‍यांना सहन करावा लागतो असा समज असेल, तर तोही चुकीचा आहे. उच्चशिक्षित आणि श्रीमंतांच्या घरांमध्येदेखील हे प्रकार सर्रास घडतात. आपल्याकडे लग्न ठरविताना मानपान, दागिने, बस्ता तसेच इतर अनेक गोष्टींसाठी पाण्यासारखा पैसा मोजला जातो.

आजही काही ठिकाणी लग्नाचा सर्व खर्च मुलीच्या कुटुंबीयांना करावा लागतो. त्यामध्ये मानपान ही एक महाभयंकर पद्धत असते. यामध्ये काही राहून गेले तर मुलाकडच्या मंडळींचे टोमणे ऐकावे लागतात. मग अशा वेळेस पैशाचे कशाही प्रकारे नियोजन करून मुलाकडच्या मंडळींना खुश करण्याची कसरत करावी लागते. या मानपानाच्या कारणास्तव भरमंडपामध्ये लग्न मोडल्याचे प्रकारदेखील घडतात. ताजे उदहारण द्यायचे झाले तर अलीकडेच लग्नाच्या जेवणामध्ये किती रसगुल्ले द्यायचे यावरून मुलगा आणि मुलींकडच्या मंडळींमध्ये वाद झाला. यामध्ये मुलीच्या वडिलांचा अपमान झाल्याने मुलीने लग्न मोडले.

लग्नासारखे पवित्र बंधन या अशा कारणांमुळे तुटते ही बाब खरंच गंभीर आहे. पूर्वी शिक्षणाअभावी तसेच समाजाच्या दबावामुळे परंपरा जोपासण्याचा प्रकार सुरू होता. मात्र, काही ठिकाणी मार्ग चुकीचा असल्याचे माहिती असूनदेखील त्याच मार्गाने जाण्याचा वेडेपणा केला जात आहे. आजही काही सुशिक्षित मुलगे हुंड्याला समर्थन देत असतात. केवळ आईवडिलांची मर्जी सांभाळण्यासाठी काही मुले हुंड्याची अपेक्षा करतात. हुंड्याची अत्यंत वाईट रूढी भारतीय समाजात खोलवर रुजली आहे. हुंड्याच्या हव्यासामुळे आजवर अनेक स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत. आज शहरी भागामध्ये प्रेमविवाह वगळले, तर रीतसर लग्न जमविण्यासाठी वधू-वर सूचक मंडळ किंवा नातेवाईक, मित्रमंडळींची मदत घेतली जाते.ग्रामीण भागामध्ये वधू-वर सूचक मंडळाचे जाळे इतके सध्या पसरलेले दिसत नाही.त्यामुळे तिथे काका, मामा, आत्याच्या ओळखीने लग्ने जमवली जातात. एकदा मुलामुलीच्या घरच्यांनी होकार कळविल्यानंतर लग्नाची बोलणी करण्यासाठी बैठक बोलावतात. मग यामध्ये एखादा मध्यस्थ किंवा नात्यातील माणूस हुंड्याची रक्कम निश्र्चित करण्यासाठी मदत करतो. कायद्याने असे लोकसुद्धा गुन्हेगारच ठरतात. त्यांनाही हुंडा देणार्‍या आणि घेणार्‍याइतकीच किंवा दोन वर्षांपर्यंत कारावास आणि रु.दहा हजारपर्यंत दंड होऊ शकतो.

निलेश चाळक जिरेवाडी मो, 9767894619
 (लेखक हे हुंडा निर्बंध समितीचे सदस्य आहेत)

संबंधित लेख

  • 1