शिरूर - ते धडधडणारे ह्रदय..हरवलेली माणुसकी अन मी

साधारण दुपारची वेळ..घरची इतर कामे आटोपुन नेहमीप्रमाणे बातमीच्या शोधात..मिञासोबत मीही निघालेलो..काही मिनिटांत गर्दी दिसते..अगदी गर्दीचा रुखही वेगळा..थांबुन पाहतो तर माझ्याच काळजाचा ठोका चुकला..तरुण निपचित पडलेला तर युवतीचे ह्रदय धडधडतयं ..अन मी व मिञ मदतीसाठी याचना करतोय..पण समोरचे गर्दीतले अन बघेही ढिम्मच. आणि आम्ही ही अखेर नियती पुढे हरलोच..!

गेल्या दोन दिवसांपासुन मनांत विचारांचे काहुर माजलयं.सतत अस्वस्थता जानवतीय.त्याला कारणही तसंच आहे.त्या दिवशी घरुनच जरा निघण्यास उशीर झाला होता.आज एक स्पेशल स्टोरी करायचीय..एका शाळेत भेट द्यायचीय..एका  राजकारण्याची मुलाखत घ्यायचीय अन कामे आटोपुन घरी नियाचयं असं संपुर्ण दिवसाचं पुर्ण प्लॅनिंग केलेले.त्यानुसार घरुनच उशीर झाला.तितक्यात पुण्याचे मार्गदर्शक व जिवलग मिञ जाणीव जागृती फौंडेशन चे अध्यक्ष गणेश सातव वाघोलीवरुन खास भेटायला येत असल्याचा फोन आला.त्यानुसार पुन्हा काही कामे रद्द केली अन त्यांना भेटायला निघालो.स्थळ न्हावरे फाट्यावर भेटायचं ठरलेलं ठिक दुपारी दोन वाजता.त्यानुसार दुचाकि चा स्पीड वाढवला अन मी माझ्याच विचारात तल्लीन होउन निघालो.ठरलेल्या ठिकानी भेट रद्द करुन दुसरीकडे भेटायचं ठरलं अन पुन्हा चेंज.मी माञ ठरलेल्या ठिकाणी येउनही थोड्या अंतरावर जाउन पुन्हा भेटीच्या ठिकाणी गेलो.तेथुन थोडक्यात आटोपुन पुन्हा वळलो.मुख्य रस्त्याने चाललेलो.काही मिनिट येत नाही तोच ज्या रस्त्याने काहि सेकंदाने मी गेलेलो तेथे गर्दी जमलेली.बघ्यांची गर्दी..दुचाकी-चारचाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या..कुणी गाडी थांबवुन  पाहतोय..कुणी गाडीतुन पाहतोय..कुणी फोटो घेतोय..तर कुणी सेल्फीही घेतोय.तोंडी हळहळही अनेकांच्या..समोरचे दृष्य माञ ह्रदय पिळवटुन टाकणारं.

दुचाकिवरील मुलगा जागीच गतप्राण झालेला तर मुलगी गंभीर जखमी झालेली.मी थांबुन ताबडतोब पोलीस,अॅम्बुलन्सला फोन लावतोय..गणेश ट्रॅफिक तुंबु नये यासाठी वाहनांना अडवतोय..तेही मदतीसाठी विनवण्या करतायत..मी संपर्क करतोय..कोणी म्हणतोय आमच्याकडे सेवा उपलब्ध नाही..कोणी म्हणतोय ड्रायव्हर नाही..मीही वाहनचालकांना विनंती करतोय..पाया पडतोय..काही डोळे वटारुन आमच्याकडे पाहतात.तर काही रागाने.काही जवळ आल्यावर काचा वर घेउन निमुट निघुन जातायेत.मयताच्या शरीर छिन्न-विछिन्न अवस्थेत पडलेलं जवळ कापड टाकण्याचे देखिल कोणी धाडस करत नाही.स्वत:होउन एक साडी उचलली अन मयताच्या शरीरावर टाकली.निपचित पडलेला देह टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईलचे कॅमेरे टपलेले.देह झाकुन टाकल्यावर जरा बरं वाटलं किमान आतातरी कॅमे-यातुन या देहाची सुटका व्हावी.सोबत धडधडणारे ह्दय अन मदतीसाठी जखमी मुलीचे नेञ माझ्याकडे लागलेले.मी मनात प्रचंड अस्वस्थ होत वाट पाहतोय गर्दीतुन-चालकांकडुन मदतीची.पण सर्वांचेच हात वर.अखेर थेट पोलीसांकरवीच एक अॅम्ब्युलन्स दाखल झाली.त्या जखमी मुलीचे नेञ थेट माझ्या काळजात घुसले.अखेर त्या अॅम्ब्युलन्स चे आभार मानले.पोलीसांना योग्य ती माहिती दिली.अन पुढे मार्गस्थ झालो.काहि वेळात ती मुलगी देह सोडुन गेल्याचे समजले अन शल्य देखिल जीव्हारी लागले.प्रयत्न करुनही नाही वाचवु शकलो आम्ही तो जीव.एकप्रकारे राग येतोय समाजाविषयी..माणसांविषयी...अन गर्दीतील बघ्यांविषयी

आता प्रश्न हा पडलाय की खरंचं समाजात माणुसकि अन आपलेपणा हरवत चाललाय की काय? अपघात घडल्यानंतर जबाबदारी झिडकारुन फक्त बिभत्स फोटोच काढणार आहात का? सोशल मिडियावर मदतीच्या बढाया मारणारे अन सुविचारांचे डोस पाजणारे अपघातसमयी का मदत करु शकत नाही.अपघातातील दुसरी-तिसरी कोणी नसुन आपल्यातीलच कोणाची बहिण असते कोणाची आई असते.कोणाचा बाप असतो तर कोणाचा भाउ...जाउद्या कशाला पोलीसांचा ससेमिरा अन कशाला डोक्याला कटकट असे म्हणुन नका रे जबाबदारी झटकु...किमान तळमळना-या जिवासाठी तरी  इथुन पुढे प्रयत्न कराल ना ?
सतीश केदारी - शिरसगाव काटा.

सतीश केदारी - शिरसगाव काटा.
सतीश केदारी
(कार्यकारी संपादक)
8805045495/7776002255
शिरुर तालुका डॉट कॉम

संबंधित लेख


वाघाली येथील रस्ता दुरूस्तीचे विकासकाम नक्की कोणाचे?
 ऍड. अशोक पवार
 बाबूराव पाचर्णे
 प्रशासन
 अन्य