शिरसगाव काटा - मैञी..प्रेम..अन नात्यांविषयी बरंच काही...

मैञीचं नातं...प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेलं! किती गुंतुन जातो ना आपण यात.प्रत्येकाचं कशाना-कशाशी असलेलं. कोणाचं जीवापाड प्रेमाचं, कोणाचं अखंड मैञीचं, कोणाचं आयुष्यभर घेतलेलं शञुत्वाचं.परंतु जेव्हा-जेव्हा नाती तुटत असतात तेव्हा विरहाला सामोरे जावंचं लागतं.

खरंतर पुर्वीची लोकं भावनिक होती असे म्हणतात अन आताची लोकं प्रोफेशनल झाली असेही हल्ली अनेकजण म्हणतात.अगदी एकमेकांच्या जवळ राहुन कधीही तोंड न पाहणारी शहरी भागातील मंडळी पाहत असताना याउलट खेडेगावात जर डोकावुन पाहिलं तर उलटं चिञ दिसतं.कोणता माणुस कुठं राहतो अन त्याचे काय-काय उद्योग चालतात इथपर्यंत इत्थंबुत माहिती अपडेट ठेवणारी अशी काहि मंडळी गावाकडे पाहायला मिळायची.जरी गावात कुठं दुर्दैवी घटना घडली तरी क्षणात अख्खं गाव जमा व्हायचं.इथं जात-पात न पाहता सगळंचं बाजुला ठेवुन रक्ताचं नातं समजुन कोणी विचारपुस करायला तर कोणी सगळीच कामं करणारी,एकमेकांच्या सुख;सुखात सामील होणारी मंडळी असायची.गरीब घरातील लगीनकार्य म्हटलं तर सांगताच सोय न्हाय..आठ आठ दिवस अगोदर अख्खं गाव त्याच्या मदतीला हजर असायचं.यात आजही ग्रामीण भागात लग्न असो..श्राद्ध असो कि अन्य कोणताही कार्यक्रम. गावातील जाणती मंडळी आवर्जुन हजर असतात.महिला, स्ञीया या देखिल  जेवणाची पुर्व तयारी करण्यापासुन ते कार्य आटोपेपर्यंत कामं करायच्य.पण बडेपणा अन मोठेपणा न गाजवणारी मंडळी यानिमित्ताने आवर्जुन हजर असत. प्रसंगी पञावळी उचलण्यापासुन ते शेवट खरकटी, भांडी घासण्यापर्यंत नि:संकोच काम करणारी माणसं फक्त ग्रामीण भागातच पहायला मिळतात.

गावचा पार म्हणजे गप्पांचं गु-हाळचं.अन चहाची टपरी म्हणजे एकमेकांना आपुलकी अन प्रेम वाटणार अन वाढवणारं हक्काचं ठिकाण.चांद्यापासुन बांद्यापर्यंत अन गल्लीपासुन दिल्लीपर्यंतची चर्चा चहाच्या टपरीवर न ऐकायला मिळाली तर नवलचं.खरं तर गावाकडं सुख-दुख समजुन घेण्याचं हे एकप्रकारे हक्काचे ठिकाणचं. तालुक्यात काय चाललयं..राजकारणात काय घडतय अन गावाला काय पाहिजे इथ पासुन ते अमेरिका, पकिस्तान च्या चर्चा देखिल याच ठिकाणी तासनतास चालतात.शेवटी याचा काय संबंध म्हणत असाल तर चर्चा झाल्या तर अनेक गोष्टी कळतात.ओळख करायची असेल तर सर्वात सोप्प माध्यम म्हटलं कि हेचं समजायचं.

जन्माला आल्यानंतर माणसाला नाती निर्माण करावी लागतात.यातुनच तो स्वत:ला बंधनात बांधुन ठेवत असतो.जर नातीच नसती तर समाजात अराजकताच माजली असती.यात प्रियकर-प्रियसी,पती-पत्नी, बहिन-भाउ, अशी नात्यांची सुंदर गुंफणच सृष्टीने निर्माण केली आहे. त्यामुळेच कि काय पुर्वीचे मराठी अथवा हिंदी सिनेमे भावनिक कथानकावर आधारित असत.दिवसेंदिवस अनेक डे साजरे करण्याचे भारी फॅडचं आलयं.दररोज कुठलातरी डे चं निमित्त काढायचं अन तसा ट्रेंडचं निर्मान करण्याचं खुळ वाढत चाललय.त्यामुळे पुर्वापार चालत आलेल्या परंपराही हळुहळु कमी होत चालल्या असुन या निमित्ताने नात्यातील ओलावा कमी होउ लागला आहे.

आजच्या प्रगत दुनियेत नातेसंबंध जपायला किंवा त्या बद्दल विचार करायला कोणाकडे वेळच नाही. प्रत्येक जण आपापलं जीवन जगण्यात मग्न आहे. कारण परिस्थिती च तशी आहे. अडीअडचणीवर मात करत प्रत्येक जण या जगात आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय. गरज नसलेला नात्यातला ताणतणाव, चिडचिड, सहनशीलता, अतिविचार या गोष्टींमुळे  मानसिकरित्या आपण कमकुवत होत चाललो आहोत. त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो, नात्यात तणाव निर्माण होतो आणि पर्यायाने करियर वरच परिणाम होऊ लागतो आणि पुन्हा चिडचिड सुरु होते मग हे कालचक्र सुरुच रहात. या कालचक्रात अडकून कितीतरी लोकांच आयुष्य उध्वस्त झालेल आपण पाहतोय. त्यामुळे मला वाटत आज प्रत्येकाला गरज आहे ती "नात्यातली सुंदरता" जपण्याची. आपण आपली नाती सुंदरच बनवली पाहिजेत जेणेकरून नात्यात ताणतणाव येणार नाही खरं तर नाती ही मनाचं उत्तम टॉनिक आहेत ती मनाची ताकद वाढवतात.एकमेकांना नेहमीच नवीन उर्जा देत असतात. परंतु ती दिसत माञ कधीच नाही.

कठीण प्रसंगी एकमेकांना सांभाळण, जपन खुप महत्वाच आहे. त्यामुळे नाती टिकवण हे मानसिक स्वास्थ्यासाठी खुप आवश्यक आहे. नाती ही झाडासारखी असतात सुरवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते पण एकदा ती बहरली की आयुष्यभर कोणत्याही बिकट परिस्थितीत सावली देत राहतात. हीच नात्यातली सावली आणि नात्यातली ताकत माणसाला मानसिकरित्या प्रबळ बनवतात.

सध्याच्या धावपळीच्या प्रत्येक जण व्यस्त असतो.एकमेकांना भेटायला, मनसोक्त गप्पा मारायला, गप्पाचं शेअरिंगला वेळच देता येत नसल्याची खंत प्रत्येकजन बोलुन दाखवत असतो.परंतु  फेसबुक, टि्वटर अन व्हॉट्सअप च्या जमान्यात स्माइली टाकुन  खरी मैञी खरंच जपली जाते हा प्रश्न माञ डोक्यातच जातो.त्यामुळे मैञी टिकवायची असेल तर भावनिक असायलाच हवं. नाही जमलं तर किमान एकदातरी भेट घेउन विचारपुस केलीच पाहिजे. अन्यथा काळाच्या ओघात मैञीची ही रेषा समुद्राच्या लाटेसारखी अन वाळुत काढलेल्या नक्षीसारखी कशी अन कधी पुसुन जाइल.हाती केव्हा रिकामेपण येइल हे सांगताच येणार नाही.

मैञीदिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा!

सतीश केदारी
कार्यकारी संपादक,
शिरुर तालुका डॉट कॉम,शिरुर
मो नं : ८८०५०४५४९५

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही