शिरूर - दारुपायी गेला म्हादा..(कथा)

गावात म्हादा गेल्याची वार्ता कळाली तसं सारं गाव जमु लागलं..कोणी हळहळत होतं तर लय वंगाळ झालं म्हणुन सारं गाव चर्चा करत होतं.म्हादा होताच तसा सा-या गावचा लाडका...

म्हादा...सा-या गावाचा लाडका. नेहमी प्रत्येकाच्या कामाला येणारा.पण म्हादाला सरळ बोलल ते गावं कसलं. लहाण पोरापासुन बाया-बापड्या पर्यंत सर्वांच्या कामी येणारा म्हादा लय भोळा. "ए म्हाद्या आरं एवढं सरपण फोडतो का रं ? असं कोणीतरी हाक मारावी अन म्हादानी बी आढे-वेढे न घेता, व्हय मावशे फोडतो कि" असे म्हणतच लगेच मोठ्या धारं ची कु-हाड घ्यावी अन लगेच धपाधपा मोठ्या लाकडाचं तुकडं करावं. म्हता-या माणसानं ही तसंच ए म्हादा आरं जरा तेवढं दळाण घेउन येतोस का रं असं म्हणावं अन म्हादानं ही लगेच दळाण आणुन पुढ्यात द्यावं. नदीवर गेला कि तरुण पोरींनी अन बायांनी ही म्हादाला, ए म्हादु आरं जरा एवढं गोधड्या आपटु लागतोस का रं असं म्हणावं अन म्हादानीही लगेच मोठं गाठोडं ची गाठोडं भर उन्हात आपटुन द्यावं.असा म्हादा समदया गावात चांगल्या अन भोळ्या स्वभावाचा म्हणुन परिचित. या म्हादुकडुन समदं गाव काम करुन घ्यायचं. कोणी कामाच्या बदल्यात खाउ घालायचं तर कोणी थोडंफार पैसंही खर्चायला द्यायचं. आलीच दया तर कोणी वर्षातुन एकदा नवी कापडं बी करायचं.गावच्या उरसाला म्हादाला गाव बिदागी द्यायचं अन नवे कपडे ही चपलांच्या जोडासकट.तेव्हा माञ म्हादाचा भलताच थाट असायचा.गावानं केलेली कपडे म्हादा घालुन सारा गाव पालथा घालायचा.समद्यांस्नी सांगत सुटायचा.म्हादा भलताच खुश असायचा.

म्हादाची कर्मकहाणी माञ फार वेगळी. आई-बापाला एकुलता एक होता म्हादा.घरची परिस्थिती श्रीमंतीची. आई-बापाचं लव मॅरेज झालेलं. त्यामुळे त्यांनाही नातेवाईकांनी वाळीत टाकलेलं. या नंतर नवरा-बायको यांनी मोठ्या कष्टाने अन जिद्दीने संसार उभा केलेला. पण अशाच एका अपघातात बापाचा अपघात झाला अन तो जागीच मेला. त्याच्या धक्कयाने हिने प्राण सोडलेले.यानंतर नातेवाईक अन आई-बाप म्हणणारे या दोघांच्याही शेवटच्या अत्यंविधीलाही नाय आले. सारं सोपस्कार गावानेच पार पाडले. यानंतर गावातील एका येड्या बापडीने म्हादाचा संभाळ केला. दरम्यानच्या काळात म्हादाला आई-बाप गेल्याचा धक्का सहन नाय झाला अन त्याच्याही डोक्यावर परिणाम झाला. गावातील लहानाचा मोठा केलेल्या त्या म्हातारीचाही कालांतराने ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. म्हादाच्या आई-वडीलांची असलेली सारी संपत्ती नातेवाईकांनी हडप केलेली.

पोरका झालेला म्हादा गावची कामं करुन गुजरान करत होता.दिवसेंदिवस माञ गावचं ही वातावरण बिघडत चाललं होतं. गावात गावठी दारु काढणारा वर्ग वाढु लागला.तसं गावात नवे-नवे ढाबे येउ लागले होते.गावची तमाशाच्या पुढं नाचणारी पोरं आता शहरात जाउन अॉर्केस्ट्राच्या पुढं जाउन नाचु लागली होती.रोज घरची भाकरी खाणारी आता ढाब्यांवर जाउन मटनाशिवाय खात नव्हती.घरचं अन्न गोड लागतच नव्हतं. मास्तरच्या पुढं न जाणारी पोरं ही मास्तरला वेडं वाकडं बोलायला कमी करत नव्हती. त्याला कारण हि तसंचं होतं दुष्काळी असलेलं गाव आता बागायती झालं होतं अन कष्ट करणारी पोरं ही आळशी बनलेली.गेल्या पंचवीस वर्ष एकच सरपंच, पोलीस पाटील अन चेअरमन सारा गाव-गाडा हाकत होतं अन सारं गाव गुण्यागोविंदानं राहत असताना निवडणुकिचं खुळ कुणाच्या तरी डोस्क्यात घुसलं अन गावाला नजरच लागली.

गावच्या काही खुळचट माणसांपायी गावात निवडणुकिवरुन वाद सुरु झाले अन हाणामारीही व्हायला लागल्या. गावचा तंटा मिटवणारे गाव कारभारीही हतबल झाले.काही जण दारुच्या आहारी जाउ लागले. अनेकांना व्यसने जडु लागली. या व्यसनापायी कित्येकांचे संसार उद्धवस्त होउ लागली. काहींना तर सकाळच्या चहाच्या वेळेलाच दारु ढोसल्या बिगर चैन पडत नसे नाहीतर बैचेन व्हायची काही मंडळी. घरातल्या बायका  माञ पार वैतागुन गेल्या होत्या. नवरा दारु ढोसुन आला कि बदड बदड बदडायचा.या मुळे बायकाही कंटाळुन गेल्या होत्या. पण 'पावसाने झोडलं अन नव-याने मारलं' सांगणार कोणाला? अशी गत  झालेली. त्यामुळे गावचा सारा रंगरुप बिघडुन गेला होता. वयाने ज्येष्ठ असणारी मंडळी अनेकांना विणवण्या करायची पण त्यांचं ऐकणार तरी कोण ?

असेल कोणता तरी सण. गावचा शिरपत सावकार. लय प्रतिष्ठित.पण कायम नशेत तर्रर्र असायचा.त्याही दिवशी फुल्ल दारु प्यायलेला. म्हादा आपला रस्त्याने चाललेला.तितक्यात सावकाराच्या बायकोने हाका मारली, "ए म्हाद्या आरं एक काम करतोस  कारं". हो करतो कि असं म्हादा बोलला. अन लगेचच लागला कामाला.सकाळपासुन आज म्हादाच्या पोटात अन्नाचा एक कण बी नव्हता. पण काय तरी मिळेल या आशेने काम करत होता.सावकारीन बाईंनी सांगितल्या प्रमाणं जवळच्या विहिरीवर जाउन पाणी शेंदुन आणुन म्हादाने समदा रांजण भरला. त्यानंतर छोटी मोठी कामं करु लागला. सगळी कामंही आता उरकत आली होती. तसा उन्हाचा तडाखा ही वाढला होता. पोटात आता म्हादाच्या कालवाकालव सुरु झाली. म्हादाने सावकारीन बाईंना जेवणाची मागणी केली,तशा सावकारीन बाईंनी जोरात खेकसत अरे कितिक काम केलयं रं तु, जरा तेवढी लाकडं फोडुन दे मगच तुला सुट्टी देते असे म्हणत मोठ्या लाकडाच्या ढिगा-याकडे बोट दाखवत काम चालु करायचा इशारा दिला. म्हादानेही जास्त न बोलता  कामाकडं मोर्चा वळवला.गाडीभर सरपन फोडुन दिलं अन सावकारीन बाईंना हाक मारणार इतक्यात सावकाराने हाक मारली. नशेत असलेल्या सावकाराकडे जात म्हादाने,"जी मालक बोला कि" असे उच्चारताच ए म्हाद्या अरे जरा दोन घोट घेतोस का रं असे म्हणत चेष्ठा करण्यास  सुरुवात केली. नको मालक म्या नाय असं कधी पायलो. नको नको म्हणत नकार दिला. पन जिद्दीला पेटलेला शिरपत सावकार मागं हटायला तयार नव्हता. हळुहळु म्हादाला सावकाराने दारु पाजायला सुरुवात केली.पोटात सकाळ पासुन अन्नाचा अन पाण्याचा कन नसलेल्या म्हादाच्या पोटात एकदम आग होउ लागली. कधीही दारु माहित नसलेल्या म्हादाला सावकार दारु बळजबरीने पाजतोय हे पाहल्यावर सावकारीन बाइने ही शिरपत सावकाराला समजुन सांगितलं. पण फुल्ल नशेत तर्रर्र असलेल्या सावकाराला कसलेच भान राहिले नव्हते. अचानक एकाएकी म्हादाला जोरात ठसका लागला अन जोरात म्हादा खाली कोसळला.

तितक्यात कशाचा मोठा आवाज झाला म्हनुन सावकारीन बाइ जवळ येउन पाहतात तर म्हादा निपचित पडलेला.डोक्यातुन रक्त वाहतयं अन शरीर थंडगार पडलेलं.म्हादाला निपचित पडल्याचे पहाताच नशेत तर्रर्र असलेल्या सावकाराचीही धुंदी उतरु लागली. तितक्यात कोणीतरी पाहिलं अन सा-या गावभर म्हादा गेल्याची वार्ता पसरु लागली. म्हादाला पहायला गाव जमा होउ लागला. गावक-यांनी सावकाराला बदड बदड बदडला.

नंतर गावक-यांनीच अंत्यविधी ची तयारी केली. चार तरण्या पोरांनी म्हादाला खांदा दिला. अन स्मशानात अंत्यविधीकरण्यात आला. म्हादाच्या अंत्यविधीला सारा गाव जमा झाला होता. कोणी हळहळत तर कोणी  हमहमसुन रडत होतं. म्हादाचं यात कुणीच नसतानाही जो-तो म्हादाला आपलाच म्हणुन रडत होता. म्हादाने उभ्या जन्मात कुणाच ऋण ठेवलं नव्हतं. म्हाता-या ज्येष्ठांना जवळ वाटणारा म्हादा आज कोणाजवळ नव्हता.त्याने सारा गाव आपलासा केला होता.दुस-याच्या दारुपायी समद्या गावचा म्हादा गेला म्हणुन सगळे हळहळत होते..सा-या गावचा लाडका म्हादा आज अनंतात विलिन झाला होता....

Satish Kedari(टिप: या  कथेतील नावे  व पाञ   काल्पनिक आहेत.याचा कोणाशीही संबंध नाही.)

 
- शब्दांकन

- सतीश केदारी
८८०५०४५४९५

Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

शिरूर तालुक्यातील वाळू तस्करांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे काय?
 होय
 नाही
 माहित नाही