कोंढापुरी - कलावंताचं जगणं अनुभलयं तुम्ही ?

शिरुर तालुकाच काय संपुर्ण महाराष्ट्र गाजवला त्याने स्वत:च्या कलेने..जेथे जाइल तेथे रंगमंच दणानून सोडला.. कित्येकांना हसवलंच पण त्यांच्या एकाही प्रयोगाला रडुन माघारी न केलेला रसिक विरळाच.. उत्तारार्धात भाऊ मेला... संस्था मोडकळिस आली.. शेवटी त्याच्या कलेला आश्रय दिला तो कोंढापुरीच्या ग्रामस्थांनी अन् गायकवाड कुटुंबाने...


होय... आज जरा वेगळ्याच विषयावर बोलणार अशा कलावंताविषयी ज्याने मराठी रंगभुमीची ३१ वर्षे स्वत:च्या कलेने गाजवली. जाणून घेऊया जाधव-काटे नाटयमंडळाचे प्रमुख व ज्येष्ठ कलावंत तुकाराम कोडिंबा जाधव यांच्याविषयी.

सुमारे १९८५ ते २००५ चा काळ गाजवला तो जाधव-काटे यांच्या नाटकांनी. त्या काळात शिरुर तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रात यांच्या नाटकांनी रसिकांना खो-खो हसवलं अन त्याहीपेक्षा कित्येक पटींनी रडविले. पण सुरुवात वाईट काळापासुन झाली माञ उपेक्षित जगणं माञ वाट्याला येउ दिलं नाही. पहा कसा आहे जीवनप्रवास. जाधव-काटे नाट्य मंडळाचे तुकाराम जाधव हे प्रमुख. त्यांचे मुळ गांव त्यावेळचे पारगाव (वाशी) उस्मानाबाद. आई वडीलांचे हे बारावे अपत्य. परंतु, वयाच्या अडीच वर्षाचे असताना आई-वडीलांचे निधन झाले. त्यानंतर सांभाळ केला तो मोठ्या बहिणीने. त्यामुळे जाधव यांची कालांतराने काटे अशी ओळख झाली. अत्यंत गरीबीत त्यांचे हे दिवस जात असताना शिक्षण हि घेतले. त्यामुळे ते उच्चशिक्षित ही झाले. १९७३ ला अकरावी, १९७८ ला बी.ए. पुर्ण केला. यातच छंद निर्माण झाला. अन् यातच जाधव-काटे  नाट्यमंडळांची स्थापना केली. सुरुवातीला केवळ १२ माणसं सोबत घेउन नाटकाचे प्रयोग सुरु केले. सत्यशील राजा हरिश्चंद्र, द्रौपदी वस्ञहरण, कृष्णाने फोडली बंदी शाळा, सुर्य भ्याला पतिव्रतेला, वेश्येघरी महादेव रंगला, झाला उद्धार चौरंगीनाथा ही त्या काळची अत्यंत गाजलेली नाटके. त्या काळी महिला कलावंत फारसे नसायचे. त्यामुळे नाटकांनी स्ञी पाञ हे जाधव यांनाच करावे लागे. तेही इतके हुबेहुब असायचं कि दिवसा जरी नाटकाचा प्रयोग असेल तरी कोणालाच स्ञी वेषात पुरुष आहे हे ओळखू येत नसे.

रक्तात न्हाहली कु-हाड  अर्थात रक्षाबंधन हे नाटक निमोणे या गावात सुरु होतं. प्रथम या नाटकासाठी गावातील शाळेचे आवार हवे होते. ते मिळत नव्हते. अखेर ते मिळाले अन् त्या राञीचा प्रयोग सुरु झाला. प्रयोग मध्यांतरावर असताना गावातीलच महिलेचा सख्खा भाऊ निर्वतल्याची बातमी आली. या प्रयोगाला रसिकांना इतकी दाद दिली कि सारे श्रोतेच हमसु हमसुन रडत होते. शेवटी त्या महिलेने जाधव यांना भाऊ मानले ते आजपर्यंत. या भावाला आल्याशिवाय आजतागायत कोणतीही रक्षाबंधन साजरी झाली नाही.

शिरुर तालुक्यात कुठेही जाधव काटे नाटक आलं असल्याची वार्ता कळाली कि रसिकांची तोबा गर्दीच गर्दी व्हायची. राज्यभर दौरे करत असताना परांडा तालुक्यात आंबी म्हणून पोलीस स्टेशन आहे. त्या गावी प्रयोग असल्याने प्रयोगाला परवानगी हवी असल्याने जाण्याचा योग आला. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर नाटय मंडळाविषयी माहिती दिली. रितसर परवानगीही दिली गेली. परंतु, त्या पोलीसांची अट एकच नाटकांमध्ये महिला नको म्हणून. राञी नाटकाचा कार्यक्रम सुरु झाला. स्टेजवर पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा हि लावणी सुरु झाली. तितक्यात त्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अन इतर कर्मचारी आले. स्टेजवर नाचणारी महिला बघून तळपायातील आगमस्तकात गेली. साहेबांनी तत्काळ फर्मान काढले या मालकाला बोलावण्याचे अन् प्रयोग  बंद करण्याचे. एक पोलीस जवळ आला अन साहेबांनी बोलावल्याचे सांगितले. यावेळी जाधव यांनी साहेबांनाच आत बोलावण्याचा निरोप दिला. परंतु, साहेब काय ऐकेना. शेवटी दोन तास महिला नाही तर पुरुषच आहे हे जेव्हा त्या साहेबांना पटले. तेंव्हा पासून कित्येक वर्षी पोलीसांनीच काय परंतु गावानेही साथ दिली.

पुणे, उस्मानाबाद, सातारा, सांगली, सोलापुर, नांदेड, औरंगाबाद अशा संपुर्ण महाराष्ट्रभर त्यांचे प्रयोग गाजायचे. ज्या काळी वाहतुकीची कुठलीच साधने उपलब्ध नव्हती. तेव्हा बैलगाडयामधून प्रवास व्हायचा. कालांतराने टेंपो ने प्रवास सुरु केला व सुमारे ५५ कलाकारांचा एकञित संच कसा उभा राहिला ते कळलेच नाही. प्रत्येक गावात पहिल्या राञीचा प्रयोग संपला कि सुर्योदयापुर्वीच गावच्या शाळेच्या पटांगणात वाहने उतरायची. त्या काळी मोढा असायचा गावात. (फारशा अंघोळ दररोज कुणी करत नसे. सणासुदीलाच अंघोळ लोक करायचे). परंतु, हे नाट्य मंडळ गावात पोहोचलं कि सगळे त्या दिवशी आंघोळ करायचे मगच नाटकाला येत असे. दिवसभर जनावरांची व घरची कामं उरकुन सगळी गावात एकञ जमायची. त्यावेळी गावातीलच काही मंडळी गावात राखनदारी करायची. सुरुवातीला ५० पैसे ते रुपया अशा दराने तिकिट विक्री व्हायची तेव्हा एका प्रयोगाला किमान दोनशे ते तीनशे रुपये जमायचे. यावरुन किती लोक जमा होत असतील याचा अंदाज येतो.

परांडा या गावात सहा सहा महिने प्रयोग चालायचे. १८० रुपयाला पाच खेळ ठरायचे. सर्वात पहिला प्रयोग इट (सोलापूर) या गावात झाला अन तिथुनच नाटयकलेला  खरी कलाटणी मिळाली. माहि जळगावला संसार थाटला. परंतु, दुष्काळाने पछाडल्याने गाव सोडले. दररोज प्रयोग होत होता. परंतु, एखाद्या दिवशी प्रयोग सुरु असताना रसिक रडलेच नाही तर कार्यक्रम फसला आहे असे वाटे. दररोज च्या कार्यक्रमात दोन तास अध्यात्मिक विषय, हसविणे व त्यानंतर घरी काय घेउन जायचं अन शेवटी रडविल्यानंतरच नाटकाचा शेवट होई अन् आलेला रसिक डबडबलेल्या डोळ्याने घरी तृप्त होउन न गेला तरच नवल.

एकेवर्षी फलटन, बारामती या गावांनी तुळशी वृंदावन हे नाटक चांगलेच गांजले. या नाटकातून तुळस दारी नसल्यावर काय होते हे प्रबोधन करण्यात आले होते. दुस-या वर्षी संपुर्ण गाव व परिसरात तुळशीच तुळशी दिसू लागल्या हि शक्ती कथानकात होती. स्ञी पाञ साकारत असताना बालगंधर्वांना लाजवेल असे पाञ ते साकारत होते. एकाचवेळी सतरा साड्या नेसायचे परंतु घडी काय इकडची तिकड होइल. ते उत्तम गायक, कलाकार, लेखक तर होतेच उत्तम मंजिरी वादक ही होते.

सर्व काही सुरळित असताना नाटकात भुमिका करणा-या सख्ख्या भावाचे अकाली निधन झाले. त्यानंतर खचून गेलेल्या जाधव यांची नाट्यकलाही मोडकळीस आली. परंतु ती विकली नाही. आजही यातील काही साहित्य जपुन ठेवलेले आढळते.

आज आपण ठिकठिकाणी पाहत असतो कलावंतानं उभं आयुष्य कलेसाठी वेचल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात  उपेक्षित जगणं वाट्याला येतं. तमाशा कलावंत असो, नाट्य कलावंत असो कि सिने कलाकार असो पैसा, प्रसिद्धी ग्लॅमर या नंतर आयुष्याच्या शेवटी नशिबाला वाईट भोग येत असतात. परंतु जाधव यांनी आयुष्याची फरफट होउ दिली नाही. राज्यभर कला सादर करत असताना  कोंढापुरी येथील डी. एल. नाना गायकवाडअरुण आबा गायकवाड यांच्याशी ओळख झाली. अडचणीच्या काळात असताना या दोघांनी गरज ओळखून मदत केली. ग्रामस्थांनी या थोर कलाकाराला आश्रय दिला. पानटपरी उभी करुन दिली. जागा देउन कलेला अन कलाकाराला सन्मान दिला. त्यामुळेच हा उमदा कलाकार कलेत वाहत न जाता ताठ जगला. दोन मुलींना अन् मुलाला उच्च विद्याभुषित केले. मुलींचेही चांगले शिक्षण करुन थाटात विवाह केले. अ्न समाजात आजही सन्मानाने जगतोय.

पैसा, मान प्रसिद्धी ग्लॅमर येत असते. झगमगाटात वावरत असताना तुम्ही काय कमावले याच्यापेक्षा कशी नाती जपलीय याच्यावरुन तुमची श्रीमंती ठरते. त्यामुळेच या थोर कलावंतानं उभं आयुष्य कलेसाठी वेचलं पण आयुष्याचा तमाशा माञ होऊ दिला नाही.

संपर्कः

तुकाराम कोडिंबा जाधव- 9623194743
- लेखक
सतीश केदारी
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही