शिरूर - ...तो गंजाडी आणि मनातले कैक प्रश्न

ये ताये रुक जरा..तिकीट काढून प्लॅटफॉर्मकडे जाताना आवाज आला.हो आवाज जरा ओळखीचाच होता. गंजाडीचा होता. मला त्याच नाव माहिती नाही. त्यालाही माझं नाव माहिती नाही. तो ताये म्हणुन आवाज देतो.आणि मी त्याला गंजाडी. दोघांनाही एकमेकांचं नाव जाणून घ्यावं असं कधी वाटलं नाही.


आमची ओळख तशी दहा बारा वर्षांपूर्वीची. क्राईम रिपोर्टिंग करत असताना त्याची माझी ओळख झाली. पिंपरीत एक रेल्वे कटींग झालं होतं. मी स्टेशन जवळच होते. फोनवर माहिती घ्यायला खूप वेळ जाईल. असही जवळच आहे तर स्पॉटवर जाऊ आणि माहिती घेऊ म्हणून मी स्पॉटवर गेले. त्यावेळी हा गंजाडी फुल टाईट होता. रेल्वे रुळावर इतस्ततः पसरलेल्या त्या अनोळखी देहाचं मांस, तुकडे गोळा करत होता. काही वेळाने आम्ही रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये आलो. हा सुद्धा त्याचं काम मार्गी लावून आला. तेव्हा त्याला विचारलं भेजा क्या बॉडी पीएम को ? त्या वेळी तो म्हणाला वो कहा बॉडी रहा था? सब तो तुकडा हो गया. अब पीएम वालो को कुछ तोडणे का काम नहीं रहा. हा सिर्फ देखना पडेगा कुछ हिस्सा मुझसे छूट तो नहीं गया उठाने का?

पहिल्याच भेटीत अगदी सहज बोलत होता. कळकटलेले हा शब्द ही त्याच्या कपड्याचं वर्णन करायला कमी पडेल, असे त्याचे कपडे. त्यावर नुकत्याच उचललेल्या प्रेताचे रक्ताचे डाग,अंगाला चिटकलेलं मांस, तोंडातून येणार गांजा-दारू यांचा संमिश्र वास....असा एकुण रुबाब. थोडा थांबला अन बाहेर नळावर जाऊन थोड्या पाण्यात अंग साफ केलं. अन निघून गेला. पुढं अनेकदा भेट होत गेली त्यातून ओळख झाली. मी पेपरात लिहिते हे त्याला समजलं. कोणत्या पेपरात, माझं नाव काय वगैरेशी तसं त्याला घेणं देणं नव्हतं. आजही नाही. नंतर वरचेवर भेट होत असल्यानं त्यानं माझा मोबाईल नंबर घेतला. कॅम्पात कुठं काही झालं की फोन करुन सांगतो. ताये ऐसा ऐसा हुवा. तु देख जरा. हे सांगून ड्युटीवर कोण, स्पॉटला कोण हे सांगतो.

नेहमीप्रमाने सकाळी मला 8.22 ची लोकल पडायची होती. उशीर झाला होता. हाक ऐकल्यावर हा गंजाडीच आवाज देतोय हे समजलं. मागे वळून बघत त्याला आवाज टाकला. अरे लेट हुवा जाती हु मैं. रात को मिलते है. आठ के लोकल सें आनेवली मैं. तर "रुक रुक रे जरा,म्हणत माग आला. तेरी लोकल लेट है". अस म्हणत सोबत चालायला लागला. मी शहरात काम करत नसल्यानं आमचं भेटणं कमी झालं होतं. पण काही मेजर झालं की गंजाडी फोन करून सांगणार हे पक्कं. तर माझ्यासोबत चालताना म्हणाला, "ताये तुझको परसो फोन लगा रहा था. लगा नहीं. एक साथ तिनो गये देख. फास्ट गाडी था. दो छोटे बच्चे थे. साला दो मिनिट मैं चिंथी हो गया. इत्ते सालो से बॉडी जमा कर रहेरा, पर परसो साला देख के मेरी झट से उतर गयी. फिर बोला जाणे दे उठाता है ऐसा ही. पर नहीं हुआ. फटाक से जाके लगाके आया. अब तु गाली देगी पता है, पर लगाया नहीं तो वो तुकडे जिसको तु बॉडी बोलती ना ओ उठा नहीं सकता काम होता नहीं रे"....तो सांगत होता.

"गंजाडी तु सुधरेगा नहीं देख. ये ले पचास. और लगाने के पहेल खा ले कुछ तो...क्यु इत्ता लगाता हे रे?" माझं आपलं सुरु. इकडं हे साहेब, पचास फाटक्या खिश्यात ठेवत चालतायेत सोबत. (अश्यावेळी माझ्याकडे जे लोक पाहत असतात त्यांची मजा येते. गंजाडी हे बरोबर टिपतो. मला म्हणतो ताये ओ देख कैसा देख रहेला है....साला तेरे साथ चलता हु तो भारी लगता है. वेसे तो कोई देखता भी नहीं.लेकीन अब देख तो आखे फट रहेली इनकी..साले***.) रेल्वे कटींग नंतर बॉडीची जी काही अवस्था होते ती पाहणं शक्य नसतं. इथं गंजाडी सारखे अनेक जण आहेत की ते हातात काही नसतात ते छिन्नविच्छिन्न झालेले तुकडे गोळा करत असतात.हे काम दुसरं कोणाला शक्य नाही. पाहूनच उलट्या होऊन चक्कर येऊन तिथेच कोसळतील.

ह्या आठवड्यात रेल्वे ट्रॅकवर सहा जणांनी शेवटचा निरोप घेतला. आणि ह्या सहा जणांना गंजाडी आणि त्याच्या सारख्याच त्याच्या मित्रांनी एकत्र गोळा केलं. पिंपरी रेल्वे स्टेशन, कत्तलखाना याठिकाणी असे अनेक गंजाडी आहेत. काही तर लहान मुलं आहे. हातभट्टी, चरस गांजा हाच त्यांचा चौरस आहार. ह्यातून ते आता बाहेर पडू शकत नाहीत. यासाठी पैसे लागतात. मग सकाळी पिंपरी मंडईत हमाली करायची. माल मंडईतुन लोकल मध्ये चढवून द्यायचा. पंधरा वीस रुपये मिळतात. एका फेरीचे. पिण्यापुरते पैसे जमा झाले की काम थांबलं. जायचं लावायची. अन मग प्लॅटफॉर्मचा कोपरा पकडायचा. असा दिनक्रम. पण हे करत असताना नजर सगळीकड. भेटल्यावर बोलताना मागची सगळी हिस्ट्री सांगणार. ताये, तु इत्ते दिन मिली नहीं, तो तब से अब तक ये ये हुआ...अश्यावेळी आपण फक्त ऐकायचं. कोणीतरी आपलं ऐकत यात खुश. मग चहा घ्यायचा...पचास--सौ जे काही असेल ते हातावर ठेवायचे अन अच्छा चल अब.और सुन पुरा लगाना मत पहले पेट भर के खा ले म्हणत निघायचं.(अर्थात खाण्याऐवजी,पुरी लगाने वाला है हे माहिती असतं पण)

तर बोलता बोलता गंजाडी बोलला.ये लोकल जाने दे ना आज. बहोत दिन बाद मिली चाय पिला. काय करावं समजत नव्हतं. पण म्हटलं चला. मग आम्ही चहा प्यायला स्टेशन बाहेर आलो. क्या रे क्या हुआ? विचारल. तर म्हणाला. ताये, कित्ते दिनो से ये सब उठा रहा अब याद भी नहीं. पर परसो सच्ची बुरा लगा. बच्चे छोटे थे रे. और उसके बाद लगा साला अपुन किस हाल मैं जायेगे पता नहीं... और उठाने को कोण आयेगा...तुझे कोण बतायेगा ये भी पता नहीं....एवढं बोलला अन मध्येच म्हणाला चल मैं निकालात तु जा लोकल आयेगा...रहा तो फिर मिलुंगा.... अभी निकलता हूँ....

गंजाडी फिर मिलुंगा म्हणत गेलाय खरं...पण मनात अनेक प्रश्न पडायला लागलेत. ह्याची ही अवस्था का? कुणामुळे? व्यवस्था व्यवस्था बदलायची म्हणतो आपण,पण कोणती व्यवस्था? कोणासाठी बदलणार? कशी बदलणार? या अनाम शहरात नाव नसलेले असे अनेक गंजाडी आहेत.ज्यांना फक्त चेहरा आहे पण नाव नाही. नावावरुन ओळख नाही. त्यांना ओळख कधी मिळणार...? प्रश्न पडत असतानाच कानावर आवाज आला...कृपया ध्यान दे. लोणावला से पुणे जानेवाली लोकल कुछ ही समय मैं प्लॅटफॉर्म नंबर एक पे आ रही है...चलती गाडी पकडेना का प्रसाय ना करे.....

अश्विनी सातव-डोके(पञकार)
पुणे

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही