शिरूर - बॉलिवुड.. ग्लॅमर..एंटरटेंमेंट अन 'ती' सिनेपञकार

गोरीपान,देखणी, बिनधास्त, जहरीली लेखणी असणारी देवयानी चौबळ. देवी ह्या नावाने प्रसिद्ध होती. साठ-सत्तरच्या दशकात अफाट लोकप्रियता तिला आणि तिच्या लेखणीला मिळाली होती. एखाद्या सिने कलाकाराला ती प्रसिद्धीच्या शिखरावर चढवायची तर एखाद्याची संपूर्ण सिने करिअर ती बरबाद करायची.अक्षरशः त्याला होत्याचा नव्हता करून पायदळी तुडवायची.तिला स्टुडीओच्या आवारात वावरताना पाहिल्यावर मी मी म्हणणारे कलाकार टरकायचे ! उद्या कुणाच्या धांदोट्या निघणार? कोण प्रसिद्धीच्या शिखरावर चढणार तर कोण नामशेष होणार याचं भय सर्वाना व्यापून टाकायचं. होताच तिचा तसा दरारा आणि तिच्या लेखणीची ताकद ही तशी !


लहानपणापासून तिला सिनेमाचं प्रचंड आकर्षण होतं.मुंबईला श्रीमंत कुळात तिचा जन्म झाला होता१९४२मध्ये. तिचे वडील बॅरिस्टर होते.ती ऐश्वर्यात लोळत होती.सिनेकलाकारांची ती वेडी होती. जबरदस्त आकर्षण होतं तिला त्यांचं. खरं म्हणजे तिला नटीच व्हायचं होतं पण नशिबाने तिला साथ दिली नाही अन ती झाली सिने पत्रकार. star & style मध्ये frankly speaking हा स्तंभ ती लिहायची.त्या काळात रसरंग चित्रलेखा अशी काही मराठी सिने मासिकं होती पण मला त्यातलं लेखन मिळमिळीत वाटायचं. star dust, film fare, अशी इंग्लिश सिने मासिकं पण होती.

शोभा किलाचंद म्हणजे आधीची शोभा राजाध्यक्ष. प्रसिद्ध मॉडेल (गौतम राजाध्यक्षची चुलत बहीण) आताची शोभा डे. ही star dust मध्ये लिहायची. सर्व मासिकांतून बहुतेक गॉसिपिंगच असायचं. पण मला देवयानी चौबळचंच लिखाण आवडायचं.

देवयानी अर्थात देवीचं लिखाण सर्वांपेक्षा वेगळ असायचं.ते नुसतं गॉसीप नव्हतं तर त्यातल्या बहुतेक बातम्या संपूर्णपणे खऱ्या असायच्या.मसालेदार,चटकदार, धारदार,चिंधड्या उडवणाऱ्या किंवा शिखरावर नेऊन बसवणाऱ्या अशाच प्रकारच्या बातम्या असायच्या. तिच्या सौंदर्यामुळे व ऐश्वर्य संपन्न जीवन शैली मुळे ती ह्या कलाकारांत सहजपणे मिसळून जायची.सिनेमातील कलाकारांचे सेक्रेटरी , त्यांचे चमचे, त्यांचे प्रतिस्पर्धी या सगळ्यांशीच तिचे मैत्रीपूर्ण संबंध होते. तिच्या व्यक्तीमत्वात अशी काही जादू होती की लोक संमोहित व्हायचे.

दिवसभर ती ह्या स्टुडीओतून त्या स्टुडीओत फिरत असायची.तसेच रात्रीही सर्व सिनेपार्ट्यांना जायची. तिची स्मरण शक्ती इतकी विलक्षण होती की लिखाणाला बसली की ती कुणाचाही मुलाहिजा ठेवायची नाही. ह्या बाबतीत ती क्रूर होती अन ताठरही. विश्वासाने तिला सांगितलेली सगळी रहस्य खमंग तडका देऊन तिच्या frankly speaking मध्ये उतरायची आणि सगळ्यांची दाणादाण उडवून द्यायची.तिने सिनेमा पेक्षा त्यातील कलाकारांना चित्रित केलं. त्यांची लोकविलक्षण जीवनशैली त्यांची प्रेम प्रकरणं, ऐश्वर्य, आशा, निराशा, त्यांचं एकटेपण, वैयक्तिक जीवनातील हेवे दावे त्यांना माणूस म्हणून तिने लोकांच्या समोर आणलं.

सिने पञकार म्हणुन काम  करत असताना अनेकांचं शत्रुत्वही तिने ओढवून घेतलं होतं. तिचं स्वतःचं आयुष्य पण वादळी होतं. तिच्यावर राज कपूरचा प्रभाव होता. RK girl सारखी ती पण पांढऱ्या उंची साड्या नेसायची. राज कपूरने तिला स्ट्रीकिंग करायला भाग पाडलं होतं असं म्हणतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचं प्रेम जेव्हां ऐन भरात होतं तेव्हां हेमा बद्दलच्या तिच्या सततच्या खोचक लिखाणामुळे संतापलेल्या गरम धरमने टर्फ क्लब वर झालेल्या एका कार्यक्रमात तिला वाईटरीतीने मारलं होत. त्या वेळी तिच्या बाजूने कोणीच उभं राहिल नव्हतं.या उलट बरी अद्दल घडली असाच सर्व सिनेकलाकारांचा दृष्टीकोन होता.

राजेश खन्नाला सुपर स्टार ही पदवी तिनेच मिळवून दिली. त्याच्या लोकप्रियतेच्या विविध कथा छापून ती त्याचा डांगोरा पिटायची आणि शिखारावरची एक एक पायरी वर चढवायची.राजेश खन्ना बरोबरचे आपले प्रेम संबंध तीच जगजाहीर करायची. पण त्या संबंधांना नाव मिळालं नाही.तो अंजू महेंद्रूच्या प्रेमात होता. हिंग्लिश चा वापर प्रथम तिने सुरु केला.नंतर शोभा डे ने पण तिला अनुसरलं. आज भरत दाभोळकरने आपली हिंग्लिश नाटकं, पृथ्वी आणि एनसीपी सारख्या ठिकाणी गाजवून त्यांना एक दर्जा मिळवून दिला.

तिच्या ह्या बेफिकीर, तुफानी, वावटळी जीवनाचा व्हायचा तोच परिणाम झाला. १९८५मध्ये तिला पक्षाघाताचा झटका आला. सिने सृष्टी खूप क्रूर आहे. तुमचं काम संपलं की कोणी तुम्हांला विचारात नाही. तिचे शेवटचे दिवस एकाकीपणे प्रकाशाच्या झोतापासून दूर बेडवर पडून गेले. १९९५ साली हे वादळ कायमचं निद्रिस्थ झालं.
                                                 लेखिका
सुरेखा मोंडकर
(ठाणे)

संबंधित लेख

  • 1