निमगाव म्हाळुंगी - ध्येयवादी काका...

सूर्यकांत गुलाबराव पलांडे (माजी आमदार) शिरूर, जि. पुणे, गाव मुखई, जन्म करंदी येथे आजोळी श्री. ढोकले मामाचे घरी झाला. पलांडे कुटुंबाचा मुखई येथे पूर्वजांनी बांधलेला प्रशस्त वाडा आहे. इनामदार म्हणून अनेक गावे या घराण्याकडे होती. अगदी अलीकडे संस्थाने खालसा होईपर्यंत मोराची चिंचोली येथील देवस्थानचे मानपान या कुटुंबाकडे होते. श्री. सूर्यकांत पलांडे १९५७ मधील त्यावेळेच्या व्हर्नाकुलर फायनल परीक्षेत न्हावरा येथील प्राथमिक शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. निर्वी येथील प्रसिद्ध असलेले सोनवणे काका यांचेकडे राहून दररोज न्हावरा या ठिकाणी शिक्षणासाठी पायी ये-जा केली. १९६१ मध्ये घोडनदीच्या विद्याधाम प्रशालेतून दहावी उत्तीर्ण झाले.

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीतील नामवंत स. प. महाविद्यालयातून बी. एस.सी. ऑनर्स पदवी संपादन केली. विद्यार्थी दशेतूनच सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अंगी नेतृत्वाचे गुण असल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच पुण्यात "शिरूर तालुका महाविद्यालयीन विद्यार्थी' संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी युवकांच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेतला. पदवीनंतर तळेगाव ढमढेरे येथे २ वर्षे माध्यमिक शिक्षकाची नोकरी केली. पुढे पुण्याच्या आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशन कर्वेनगर येथून बी.एड.ची पदवी संपादन केली. याच काळात जनरल सेक्रेटरी (जी एस.) म्हणून निवडून आले. याचवेळी सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन संस्थेला सहकार्य करून लोकप्रियता संपादन केली.

कॉलेजचे शिक्षण चालू असतानाच समाजसेवेची प्रचंड आवड त्यांच्यात निर्माण झाली. खेड्यापाड्यातील गोरगरिबांसाठी जाणीवपूर्वक झटले पाहिजे. त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत, अशा प्रकारची इच्छा निर्माण झाली. याचवेळी समाजवादी विचारांचा प्रभाव त्यांच्या तरुण मनावर बिंबला होता. यावेळी समाजवादाची मशाल हाती घेतलेले राष्ट्रसेवादलाचे सैनिक बाबा आढाव, भाई वैद्य, बा. न. राजहंस, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, पन्नालाल सुराणा आदींच्या विचारांचा विद्यार्थी दशेतच सहवास लाभला. छोट्या-मोठ्या आंदोलनात सहभागी होण्याचा योग आला. या चळवळीतून मनावर सामाजिकतेची झालर निर्माण झाली.

१९६७ साली विधानसभा निवडणुकीत घोडनदी येथील पाच कंदील चौकात अखिल भारतीय संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष एस. एम. जोशी यांची प्रेमभाऊ खाबिया यांच्या प्रचारार्थ मोठी सभा झाली. या सभेचे अध्यक्ष त्यावेळेचे समाजवादी युवजन सभेचे विद्यार्थी नेते सूर्यकांत पलांडे हे होते. त्यानंतर १९६७ साली श्री. पलांडे यांनी पाबळ-केंदूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. त्यांची निशाणी उगवता सूर्य होती.

पुढे १९६९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले. संस्थानिकांची तनखे बंद केली. दगडी कोळशाच्या खाणीचे राष्ट्रीयीकरण केले. समाजवादी समाज रचनेसाठी क्रांतिकारी कणखर धोरणांची अंमलबजावणी केली. संपत्तीवर मूठभर लोकांचाच अधिकार न राहता, समाजातील उपेक्षित वर्गाला मोठ्या प्रमाणात सहभाग मिळावा, गोरगरिबांना सत्तेचा वाटा मिळावा हीच भावना त्यामागे होती. ती विचारात घेऊन नंतर सूर्यकांत पलांडे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यास सुरवात करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा स्वतःच्या आपल्या गावापासून सुरवात केली. गावातील तरुणांना एकत्रित करून संघटित केले. आदर्श तरुण मंडळाची स्थापना केली.

गोरगरिबांच्या लग्नकार्यात मांडव करण्यापासून, जेवणाच्या पंगती वाढेपर्यंतची सर्व लहान-मोठी कामे मोठ्या आनंदाने केली. कबड्डी, खो-खो या खेळांचे संघ व खेळाडू तयार करून खेड्यापाड्यांमध्ये ठिकठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या. दुष्काळी कामावरील मजुरांना महिना-महिना पगार मिळत नव्हता. त्या मजुरांना ताबडतोब पगार मिळावा म्हणून मोर्चा काढणे, चासकमान धरण मंजूर करावे आधी प्रश्‍नांना वाचा फोडण्यास प्रारंभ केला पुढे १९७२ साली संघटना कौशल्याची आणि परिसरातील तरुणांमधील लोकप्रियतेची दखल घेऊन कॉंग्रेसच्या नेत्यांनी श्री. पलांडे यांची पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड केली आणि याचवेळी ज्येष्ठ नेते नामदार शरदरावजी पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची ती सुरवात होती. त्यावेळी प्रा. रामकृष्ण मोरे जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या देहूगावामध्ये ४ ऑगस्ट १९७४ मध्ये युवक कॉंग्रेसतर्फे "एक गाव एक पाणवठा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ५ हजार लोकांचा समुदाय हजर होता. या सभेला राज्याचे तत्कालीन कर्तबगार गृहराज्यमंत्री शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी त्यावेळेच्या युवक कॉंग्रेसच्या कामकाज पद्धतीनुसार युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. त्याठिकाणी अध्यक्षस्थानी सूर्यकांत पलांडे यांचे नाव सुचविण्यात आले. त्या सभेत पवार साहेबांनी श्री. पलांडे यांचे भाषण ऐकले आणि तेव्हापासूनच श्री. पलांडे यांच्या राजकीय भाग्योदयाची मुहूर्तमेढ याच दिवशी त्यांच्या वत्कृत्वाने रोवली. या सभेनंतर पवार साहेबांनी त्यावेळच्या पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसच्या प्रमुख दोनशे-तीनशे कार्यकर्त्यांसमवेत इंद्रायणी काठी रात्री दोन वाजेपर्यंत गप्पा-टप्पा, युवकांची व्यक्तिगत विचारपूस त्यांचे परिसरातील प्रश्‍न याबाबत विचारपूस केली.

राम कांडगे, दिलीप ढमढेरे, अशोक म्हस्के, अशोक मोरे, रामकृष्ण मोरे, सुरेश कलमाडी, विजय कोलते, अशोक तापकीर, देवराम गोरडे असे कितीतरी युवक कार्यकर्ते पवार साहेबांशी एकरूप झाले होते. या काळात पवार साहेबांशी वेळोवेळी संपर्क झाला.

३ मे १९७५ साली तळेगाव ढमढेरे येथे शिरूर तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने "चासकमान धरण झालेच पाहिजे' या मागणीसाठी शेतकरी मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला ४० ते ५० गावातील सुजाण ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर गुढ्या व तोरणे उभारून व रांगोळ्या काढून या मेळाव्याला येणाऱ्या नेत्यांचे स्वागत केले. तत्कालीन पाटबंधारे मंत्री बी. जे. खताळ, शरद पवार, शंकरराव पाटील आदी नेते उपस्थित होते. तळेगावच्या वेशीतून सजवलेल्या ट्रॅक्‍टरमधून या नेत्यांची भव्य मिरवणूक काढली होती. "दुष्काळग्रस्त शिरूर तालुक्‍याची न्याय मागणी - द्या चासकमानचे पाणी' या घोषणेने संपूर्ण परिसर घोषणामय झाला होता. त्यानंतर झालेल्या सभेत पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस सूर्यकांत पलांडे यांनी आपल्या प्रभावी वक्तव्यामधून सर्व नेत्यांना चासकमान धरणाच्या कामाची मागणी मंजूर करण्याची विनंती केली. लोकभावनेची करद करणारे नेते शरदरावजी पवार यांनी हजारो उपस्थित शेतकऱ्यांचे चेहऱ्यावरील सुरू कृत्यांचे ते भाव...! जाणले आणि महाराष्ट्र सरकारकडून शिरूरच्या चासकमान धरणाला मंजुरी मिळवून देण्याची कार्यवाही केली.

१० ऑक्‍टोबर १९७६ रोजी त्यावेळचे मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्या हस्ते चासकमान धरणाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. अनेक वर्षांचे शिरूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले. (हे वाक्‍य उच्चारताना सूर्यकांत पलांडे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले आणि थोडावेळ त्यांच कंठ दाटून आला.' या कार्यक्रमातून सूर्यकांत पलांडे हा तरुण शिरूर तालुक्‍याचे भविष्यात नेतृत्व करू शकतो ही भावना नेत्यांच्या मनात कोरली, त्याचीच प्रचिती म्हणून १९७८ च्या निवडणुकीत शरद पवार यांनी त्यांना तरुण वयात विधानसभेची उमेदवारी दिली.

त्यांनी आतापर्यंत विविध पदांच्या जबाबदाऱ्या आपल्या नेतृत्व गुणांच्या जोरावर प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. १९७२ मध्ये पुणे जिह्ला युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस, १९७६ मध्ये पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, १९७८ साली महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस, १९८० मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर आमदार, १९७४ ते १९८१ मध्ये मुखई गावाच्या विविध कार्यकारी सोसायटीचे बिनविरोध चेअरमन, १९७६ मध्ये पुणे जिल्हा दुष्काळ निवारण समितीचे सदस्य, महाराष्ट्र विधानसभेत विविध विषयांवरील प्रश्‍नांवर सहभाग, शिक्षण, शेती, दुष्काळ, कांद्याचा प्रश्‍न, युवकांचे प्रश्‍न आदी विषयांवर प्रभावी भूमिका, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष, पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष, सार्वजनिक उपक्रम समितीवर सदस्य, विधानमंडळ कॉंग्रेस व नंतर कॉंग्रेस आय पक्षाचे "प्रतोद' म्हणून काम केले. विधानसभा आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी गाजवणारे आमदार म्हणून त्यावेळी परिचित होते. शिरूर मतदारसंघातील लोक त्याकाळात आकाशवाणीवर आवर्जून समालोचन व बातम्या ऐकत असत.

१९८५ नंतर कॉंग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वतन समितीवर सदस्य, नाशिक जिल्हा रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार चौकशी समितीचे अध्यक्ष इत्यादी राज्यस्तरीय समित्यांवर त्यांनी काम केले आहे.

शेवटी सूर्यकांत पलांडे म्हणाले की, शिरूर तालुक्‍यातील गोरगरीब जनतेने निरपेक्षपणाने केलेली मदत आणि प्रेम ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी कधीही न संपणारी शिदोरी आहे. त्या सर्वांच्या ऋणात राहण्याचा माझा प्रयत्न आहे. ह्या सर्व गोरगरीब मतदारांनी घरचे खाऊन स्वतःचे पैसे खर्च करून मला जी आर्थिक मदत केली, ती मी कधीही विसरू शकणार नाही. शरद पवार यांचे व शिरूरच्या आबालवृद्धांचे प्रेम ही माझ्या आयुष्यातील अपूर्व अशी अमोल संपत्ती आहे, ती मिळाली हे माझे भाग्यच आहे.

पवार साहेबांनी दिलेल्या विविध पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना प्रांजळपणे, प्रामाणिकपणे जे-जे करणे शक्‍य होते ते करण्याचा प्रयत्न केला आहे. जे करू शकलो नाही, ते पुढच्या पिढीकडून पूर्ण होईल असा विश्‍वास आहे. मिळालेल्या संधीमुळेच देशाचे स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी व शरद पवार, सोनिया गांधी, यशवंतरावजी चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील या नेत्यांच्या सहवासात जाण्याची पात्रता मिळाली. आपली बाजू, प्रश्‍न मांडता आले ते मार्गी लावून नेता आले, असे शिरूरच्या नागरिकांना त्यांनी शेवटी उद्देशून आपले विचार मांडले.

आजही न सुटणारे प्रश्‍न सोडून घ्यायचे म्हटले की, श्री. पलांडे काकांनाच लोक आग्रहाने बोलावतात. आपले अनेक वर्षांपासूनचे रखडलेले प्रश्‍न काकाच सोडवू शकतात. याची खात्री तालुक्‍यातील नागरिकांना वाटते. चासकमान धरणाचे पाणी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेतापर्यंत पोचले. परंतु, पूर्व भागात पाणी कधी येणार? १५-२० वर्षांचा कालावधी लोटला. २२-२३ गावातील शेतकरी कार्यकर्ते एकत्र आले व काकासाहेब पलांडे यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट २००३ रोजी क्रांती दिनाच्या दिवशी शिरूर तहसील कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी प्रचंड मोर्चा काढला होता. एवढा मोठा मोर्चा यापूर्वी तालुक्‍यात कधीही निघालेला नव्हता. सर्व शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. मोर्चातील मागण्यांची दखल राष्ट्रीय नेते शरद पवार व राज्याचे पाटबंधारे मंत्री अजितदादा पवार यांनी घेतली. मोर्चात केलेल्या मागणीनुसार एक वर्षांचे आत १२७ कि.मी. पर्यंत पाणी कॅनॉलद्वारे आलेच पाहिजे, तसेच आलेगाव पागाच्या शेतकऱ्यांच्या शेतीला त्वरित पाणी मिळाले पाहिजे, या प्रमुख मागण्या होत्या. अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन या कामासाठी पुढाकार घेतला. आज दुष्काळी शिरूर तालुक्‍याची ओळख पुसून, तालुका बागायती झालेला दिसून येत आहे.

- प्रा. नागनाथ शिंगाडे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य