गणेगाव खा. - नागरिकांनी अफवांबाबतीत सजग असायला हवं...

सध्या सोशल मिडियाचा  जमाना  असल्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्ट फोन सहज  उपलब्ध आहे, काळाची गरज म्हणून तो असायलाच  हवा.प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे तोटे असतात तसेच सोशल मीडियाचेही आहेत, सध्या अफवांना मोठया प्रमाणावर पेव फुटले आहेत आणि त्यावरती विश्वास ठेवणाऱ्यांचे प्रमाणही तितकेच मोठे आहे.

नुकताच घडलेला प्रसंग असा की 'भारत के वीर' या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना भारतीय नागरिकांकडून काही आर्थिक मदत मिळावी या हेतूने मदत निधी गोळा होत असताना, मदतीचे मोठे प्रमाण पाहून काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी बनावट वेबसाईट तयार करून त्या नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या.नागरिकांनीही त्याची पुष्टी न करता त्यावरती विश्वास ठेवून मदत पाठवायला सुरुवात केली.परिणामी माननीय केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना जनतेला या बनावट वेबसाईटवर मदत न पाठविण्याचे आवाहन करावे  लागले.

सांगण्याचा उद्देश एवढाच की, चुकीच्या अफवांवरती विश्वास ठेवल्यामुळे अनेकांना आपल्या प्राणालाही मुकावे लागले आहे,तर काहीजणांना आर्थिक भुर्दंड ही बसला आहे.अफवांवरती विश्वास ठेवण्याचे परिणाम हे गंभीरच असतात याची इतिहास साक्ष देत आहेच.खास करून येथे तरुणाईला आवाहन करावेसे वाटते की प्रत्येक गोष्टीचे बनावटीकरण खूप लवकर केलं जातं व ते आपल्या पर्यंत तेवढ्याच लवकर पोहवलं ही जातं,त्याचं कारण अफवांवरती विश्वास ठेवण हेच आहे. म्हणून नागरिकांनी स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीवरती विश्वास ठेवून त्याची योग्य की अयोग्य अशी खात्री पटेपर्यंत कोणतीही माहिती पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी व आपल्याबरोबर समाजालाही योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत करावी,ही विनंती.

                                        -संतोष पंढरीनाथ कड
गणेगाव खालसा. ता.शिरूर, जि.पुणे.

संबंधित लेख

  • 1