गुनाट - पांडवकाली विहीर व पितळी घागर!

शिरूर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक प्राचीन तलाव, विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडू लागल्या आहेत. येथील "कधीही न आटणारी' अशी ख्याती असलेली ब्रिटीशकालीन विहीर गेल्या दोन वर्षांपासून मात्र, एेन पावसाळ्यात कोरडी पडू लागली आहे.

ही विहीर पांडवकालीन असल्याची अख्यायिका काही ज्येष्ठ नागरिक सांगतात. प्राचीन विहीर सुमारे ४० फुट खोल असून, पूर्णपणे मातीची आहे. या विहीरीला पूर्वी पायऱया होत्या. परंतु, १९५५ साली गावात "नारू' या रोगाची साथ आल्यामुळे या विहीरीच्या पायऱया काढून टाकण्यात आल्या व विहिरीच्या कडेने दगडी बांधकाम करून, पाणी काढण्यासाठी रहाट उभे करण्यात आले. गावातील सर्व ग्रामस्थ रहाटाच्या सहाय्याने पाणी काढतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून ही विहीर कोरडी पडू लागली आहे.

या विहिरीचे वैशिष्ट्ये म्हणजे १९७२ च्या दुष्काळातही आटली नव्हती, असे येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात. सध्या विहिरीच्या परिसरात बोअरवेल झाल्यामुळे या विहिरीच्या पाण्यावर त्याचा परिणाम झाला असावा, असा अंदाज माजी सरपंच रंगनाथ भोरडे यांनी व्यक्त केला. भोरडे सांगतात, या विहिरीतून पूर्वी अखंड हरीनाम सप्ताहाच्या वेळेस देवाची पितळी घागर निघायची. हि पितळी घागर बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक येत असत. १९७१ ते १९७४ या काळात पितळी घागर निघताना प्रत्यक्ष पाहिल्याचे अनेक साक्षीदार आजही गावात आहेत. या घागरीची गावातून ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढली जायची. परंतु, १९७५ नंतर काही कारणास्तव ही घागर पुन्हा निघाली नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

- तेजस फडके

संबंधित लेख