रांजणगाव गणपती - गाथा कमलबाईंच्या संघर्षाची आणि कर्तृत्वाची

साधारण १० ते १५ वर्षापूर्वी शेतामध्ये मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी महिला लाखोंच्या घरात उलाढाल असलेल्या व्यवसायाची मालकीण बनते हे तसे अविश्वसनीय वाटते. रांजणगाव गणपती ( ता. शिरूर) येथील नुकत्याच निधन झालेल्या कमलबाई जयवंत शिंदे यांच्या संघर्षाची व यशाची ही एक गूढ कथा बनून राहिली आहे. कमलबाई रांजणगाव येथील महागणपती मंदिराच्या आवारात 'अन्नपूर्णा' नावाने भोजनालय चालवायच्या. फक्त दुसर्‍या इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्या कमलबाईंनी त्यावेळी शाळा महाविद्यालयांतून उद्योजकता विकासावर व्याख्याने दिली. ही निश्चितच कौतुकास्पद बाब होती. कमलबाई १९९५ पर्यंत मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवित होत्या. मात्र, ग्रामपंचायतीच्या बचत गटाच्या कामामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना पुण्यात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या व्यवसाय व उद्योजकता प्रशिक्षणाचा लाभ घेण्याची संधी मिळाली.

हा प्रशिक्षण कार्यक्रमच कमलबाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. चारचौघात बोलण्यासही घाबरणा-या कमलबाईंना हजारो लोकांसमोर भाषण देण्याचा आत्मविश्वास आला. या आत्मविश्वासातूनच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. रांजणगाव हे अष्टविनायक क्षेत्र असल्यामुळे येथे भाविकांची नेहमी वर्दळ असे. या भाविकांसाठी भोजनाची चांगली व्यवस्था त्यावेळी उपलब्ध नव्हती. ही गरज लक्षात घेऊनच कमलबाईंनी भोजनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

कमलबाईंनी ऑक्टोबर १९९५ मध्ये रांजणगावच्या महागणपती मंदिराच्या आवारात अन्नपूर्णा भोजनालयाची सुरूवात केली. याकामी त्यांना त्यावेळचे मंदिराचे विश्वस्त, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व बँक ऑफ महाराष्ट्र यांचे सहकार्य मिळाले. या सहकार्याबरोबरच त्यावेळी कमलबाईंना काही लोकांचा विरोधही सहन करावा लागला. परंतु, कमलबाई या सर्व विरोधाला धीरोदत्तपणे सामोरे गेल्या. 'अन्नपूर्णा' भोजनालयात त्यावेळी सरासरी २०० जण दररोज जेवण करीत. यात भाविकांबरोबरच शेजारील औद्योगिक वसाहतीतील कामगारदेखिल नियमितपणे या भोजनालयात येत. उत्तम दर्जाचे चवीष्ट जेवण, स्वच्छता व अगत्यशीलता यामुळे अनेक भाविक अन्नपूर्णा भोजनालयाचे कौतुक होत असे. अनेक राजकीय नेते, चित्रपट कलाकारांनी त्यावेळी येथील भोजनाचा अस्वाद घेऊन, कमलबाईंचे कौतुक केले होते. 

स्वतःबरोबरच इतर महिलांचाही विकास व्हावा या हेतूने कमलबाईंनी बचत गटांतील महिलांनाच आपल्या भोजनालयात कामासाठी घेतले होते. या व्यवसायामुळे आपण खुप धाडसी झाल्याचेही कलमबाई त्यावेळी सांगत. स्त्री आधार केंद्रासाठीही त्या काम पाहत होत्या. अनेक महिलांवरील अन्यायाला त्यावेळी त्यांनी वाचा फोडली होती.

कमल बाईंच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा 'मिटकॉन' तर्फे मोहन धारिया यांच्या हस्ते १९९६ मध्ये सत्कार करण्यात आला होता त्यांच्यासाठी विशेष गौरवाची बाब म्हणजे सन २००० मध्ये जागतिक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रिजने त्यांना यशस्वी उद्योजकाचे २१०००/-  रूपयांचे पारितोषिक प्रदान केले होते.  या संस्थेने त्यांना अमेरिका व कॅनडाच्या अभ्यास दौर्‍यावर जाण्याचेही आमंत्रण दिले होते. मात्र, तो योगायोग आला नाही. कमलबाईंचे निधन झाले असले तरी कमलबाईंची ही संघर्षाची व यशाची गाथा ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांसाठी कायम स्फुर्तिदायक ठरत राहील अशीच आहे.

- सतीश  डोंगरे, शिरूर. 9970196630

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही