सणसवाडी - ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर

'महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा बाज असलेल्या लावणीला अकलूजने वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. अकलूजच्या लावणी महोत्सवातून माझ्या सारखे अनेक कलावंत घडले. अकलूजला आम्ही लावणी कलाकारांचे माहेरघर मानतो, त्यामुळे अकलूज लावणी महोत्वाच्या निमित्ताने मला जाहिर झालेल्या पुरस्कारामुळे मनस्वी आनंद होत आहे,' अशी भावना ज्येष्ठ लावणी कलावंत मीना परभणीकर यांनी शिरूर तालुका डॉट कॉमशी बोलताना व्यक्त केली.

लावणी क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील लावणी पुरस्कार यंदा ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी मीना परभरणीकर यांना जाहिर झाला आहे. अकलूज येथे २० ते २२ जानेवारीला होणाऱया राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेच्या दरम्यान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मीना परभणीकर या सणसवाडी येथील जय अंबिका लोकनाट्य कला केंद्राच्या आघाडीच्या लावणी नृत्यांगणा आहेत. या कलाकेंद्रातच घेतलेल्या भेटीदरम्यान लावणी कलेच्या प्रवासाबाबत त्या भरभरून बोलल्या. पुरस्कार मिळाल्याची भावना त्यांच्या चेहऱयावर ओसंडून वाहत होती.

त्या म्हणाल्या, लावणी हा आमचा पारंपारिक व्यवसाय. गेली २२ वर्षे मी या क्षेत्रात काम करतेय. या कलेचे बाळकडू मला घरातूनच मिळाले. माझ्या आईची पूर्वी मुमताज-अमिताज या नावाने संगीत पार्टीत नृत्य करायची. त्यानंतर पुढे कथ्थक नृत्ये व लावणीचे धडे घेतले. कोल्हापूरच्या बाबासाहेब मिरजकर यांना गुरुस्थानी मानले. त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. केवळ त्यांच्यामुळेच आज मी या क्षेत्रात उभी राहु शकले. त्यानंतर मी बहिणीला सोबत घेऊन, मीना-अमिना परभणीकर संगीत पार्टी काढली. या पार्टीच्या माध्यमातून शेकडो कार्यक्रम केले.

पुणे फेस्टिव्हल, मुंबई महोत्सव, ठाणे लावणी महोत्सव, औरंगाबाद लावणी महोत्सव, परभणी लावणी महोत्सव, मुंबई तमाशा मोहत्सव, पार्थ-फाईंडर लावणी महोत्सव अशा अनेक ठिकाणी संधी मिळाली. अकलूज लावणी महोत्सवात सलग तीन वर्षे सहभाग घेऊन, बक्षिसे मिळविली. मुंबईत एप्रिल २००० मध्ये माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, माजी सांस्कतीक मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. सिमला येथे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या समोर केलेला कार्यक्रम आजही डोळ्यासमोर आहे. त्यांनी माझ्या कलेला दिलेली दाद मी विसरू शकत नाही. लावणीच्या निमित्ताने देश-विदेशाचे दौरे केले. दुबईमध्ये "दुबईत रंगली लावणी' या आमच्या लावणी कार्यक्रमाला तेथील मराठी रसिकांनी मनसोक्त दाद दिली. ई टी.व्ही व सह्याद्री वाहिनीवरही संधी मिळाली.

आतापर्यंत अनेक पुरस्कार, बक्षिसे आणि सन्मान मिळाले, परंतु अकलूज लावणी महोत्सवात मिळालेला पुरस्कार मी सर्वोच्च मानते. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, रोशन सातारकर, गुलाबबाई संगमनेरकर, कमलाबाई कळंबकर, छाया खुटेगावकर, राजश्री नगरकर आदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मला या ज्येष्ठ कलाकारांच्या पंगतीत नेऊन बसविल्यामुळे मनस्वी आनंद होत असला तरी एक प्रकारचे दडपणही आहे. पुरस्काराने जबाबदारी वाढल्याची जाणीवही आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यातील लावणी कलाकाराला दिलेली दाद आहे असे मी मानते.

लावणीचे विविध प्रकार आणि ते सादर करण्याची माझी स्वतंत्र शैली यापुढेही अशीच बहरत राहिल. आपल्या या पारंपारिक कलेचा प्रसार व्हावा, हे माझे ध्येय आहे. त्यासाठी माझे प्रयत्न राहतील. नवीन कलाकारांनी उतावळेपणा न करता लावणीतील बारकावे समजावून तिचे सादणीकरण करावे, त्यामुळे ती अधिक खुलत जाईल, असे मीना पररभणीकर यांनी सांगितले.

- सतीश डोंगरे

संबंधित लेख

  • 1