शिक्रापूर पोलिसांमुळे बेपत्ता मुलगा १२ तासात पालकांकडे

पोलिस उपनिरीक्षक चेतन थोरबोले यांची कामगिरी
शिक्रापूर, ता. 6 जुलै 2015- पुणे पोलिस अधिक्षक डॉ. जय जाधव यांनी पुणे जिल्ह्यात १ जुलै ते ३१ जुलै या काळात बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी शोध  मोहीम राबविली असून, या मोहिमेमध्ये कमी वयातील बेपत्ता मुलांचा शोध घेत ती मुले त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. त्या मोहिमे आधारे बेपत्ता मुलाचा शोध घेऊन त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे.

याबाबत माहिती कि, 'ऑपरेशन मुस्कान मोहीम' सुरु झाल्या नंतर शिक्रापूर येथून सौरभ संजय पवार (वय १६) हा युवक बेपत्ता झाला होता. दोन-तीन दिवस शोध घेऊनही सौरभचा पत्ता न लागल्यामुळे बेपत्ता मुलाचे चुलते नितीन रखमा पवार (रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे मूळ राहणार पोखरी. ता. पारनेर जि. अहमदनगर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली होती. तक्रार दाखल होताच पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन थोरबोले हे बेपत्ता मुलाचा शोध घेत असताना सौरभच्या एका मित्राला त्याचा फोन आल्याची माहिती मिळाली. थोरबोले, पोलिस हवालदार ब्रम्हानंद पोवार, संदीप जगदाळे, पोलिस नाईक धमाल यांनी शोध मोहीम राबवीत मिळालेल्या मोबाईल नंबरचे लोकेशन तपासात बेपत्ता मुलाला शोध सुरू केला. वाघोली येथे जाऊन सौरभ पवार यास ताब्यात घेतले. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आणत त्याच्या आई वडिलांना बोलून त्यांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, तक्रार दाखल होताच बारा तासाच्या आत पोलिसांनी बेपत्ता मुलाचा शोध घेऊन त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिल्याने मुलाच्या पालकांनी देखील पोलिस उपनिरीक्षक चेतन थोरबोले व अन्य पोलिसांचे विशेष आभार मानले. अद्यापही काही बेपत्ता बालकांचा शोध आम्ही घेत असल्याचे थोरबोले यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या