व्हॅनमधून कांद्याची चोरी; चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरखेड, ता. 25 जुलै 2015 (सुभाष शेटे)- माळवाडी येथील कांद्यावर डल्ला मारत व्हॅनमधून पळवून विक्रीसाठी चालवलेल्या कांद्याच्या गोण्यासह चोरटे शिरूर पोलिसांच्या गस्ती पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. सुमारे 30 हजार रुपये किमतीचा 24 पिशव्या कांदा चोरट्यांसह पकडला गेला आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून 3 चोरटे गजाआड करण्यात आल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 22) रात्रीच्या सुमारास माळवाडी येथील शेतकरी अंकुश भाकरे यांनी वखारीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर पिंपरखेड येथील अरुण बाळू ढोमे, गणेश बबन गाजरे, वैभव विलास गांधी या तीन चोरट्यांनी अरण फोडून सुमारे 24 पिशव्या कांदा चोरून नेल्या होत्या. शिरूर पोलिसांचे गस्ती पथक रात्रीच्या सुमारास बेट भागातील वडनेर परिसरात गस्तीवर होते. यावेळी त्यांना मारुती युको व्हॅन क्र.एम एच 12 जे यु 3170 या गाडीचा संशय आल्याने ती थांबविली. गाडीची तपासणी केली असता संबंधित चोरटे चोरलेला कांदा या गाडीतून विक्रीसाठी नेत असताना दिसून आले.

शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक गायकवाड, शेळके, पोलिस कॉन्स्टेबल अमित चव्हाण, पालवे, मंगेश थिगळे यांच्या पोलिस पथकाने या गाडीतील कांदा व व्यक्तींची चौकशी केली असता चोरट्यांनी हा कांदा माळवाडी येथील अंकुश भाकरे यांच्या शेतातून चोरल्याचेच सांगितले. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून, त्यांच्यावर शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या