आदर्श गावासाठी सदस्यांनी काम करावे- रामदास जगताप

जांबूत, ता. 29 जुलै 2015 (सुभाष शेटे)- खासदार संजय काकडे यांनी निवडलेल्या आदर्श सांसद ग्राम योजनेतील जांबूत गावाने यंदा आपल्या गावची ग्रामपंचायत निवडणूक सर्वानुमते व एक विचाराने बिनविरोध करीत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विकासाचे उद्दिष्ट ठेवूनच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली आहे. आदर्श गाव करण्यासाठी सर्व सदस्यांनी काम करावे, असे आवाहन पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी केले.

गेल्या दहा महिन्यांपासून आदर्श सांसद ग्राम या योजने अंतर्गत गावात विविध विकास कामे सुरू झाली असून, आज याच योजनेअंतर्गत गावातील 10 गरीब कुटुंबांना कोलते पाटील असोशियट पुणे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 3 लाख रुपयांचे एक घरकुल विनामूल्य बांधण्याच्या कामास आज सुरवात झालीय.

जांबूत गावचे नागरिक व पुण्याचे उपजिल्हाधिकारी असलेले रामदास जगताप यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ करण्यात आला. गावातील सलोखा कायम राहावा तसेच गावचा विकास समोर ठेवत उपजिल्हाधिकारी जगताप यांनी ग्रामस्थांना गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे केलेले आवाहन या गोष्टीकडे ग्रामस्थांनी लक्ष देत ही निवडणूक बिनविरोध केली. 13 जण सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत आता 7 महिलांना ही कार्य करण्याची संधी मिळाली आहे.

तरुणांना ग्रामपंचायतीचा कारभार सोपवत जुन्याजाणत्या गाव कारभाऱयांनी आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत गावचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट ठेवत एकमेकांविषयी असणारे मतभेद बाजूला ठेवत ही निवडणूक बिनविरोध केली. सर्व 13 नवीन ग्रामपंचायत सदस्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन ही जांबूत येथे करण्यात आले होते. या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य वसुदेव जोरी, सरपंच बाळासाहेब फिरोदिया, संजय जोरी, बाळकृष्ण कड, बाळासाहेब पठारे, कोलते असोशियटचे पदाधिकारी, पोपट फिरोदिया, माजी सरपंच बाबाशेठ फिरोदिया व अनेक मान्यवर उपस्थित होते.

गावाने सांसद आदर्श गाव करण्याचे ठरविले असून, यासाठी अनधिकृत वाळू अथवा मुरूम उत्खननाला ग्रामस्थांनी विरोध केला पाहिजे. वृक्ष लागवड करीत असताना वृक्षतोड थांबवायची आहे. काही दिवसांपूर्वी गावातील झाडाच्या फांद्या तोडल्या. ग्रामपंचायतीला याबाबत अगोदर कळविले पाहिजे. यापुढे अशी वृक्षतोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जगताप यांनी दिला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या