निमगावात विद्यार्थ्यांनी घेतले वृक्षसंवर्धनाचे धडे!

निमगाव भोगी, ता. 29 जुलै 2015 (पोपट पाचंगे)- येथील वनविभागाच्या जागेत ढोकसांगवी व येथील शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली असता त्यांना वनविभागाच्या अधिकारयांनी वॄक्षसंवर्धनाचे धडे व महत्व सांगितले.

निमगाव भोगी येथील जाधव वस्तीजवळ असणारया वनविभागाच्या 25 एकर जमिनीवर शिरूर वनविभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपूर्वी 5216 व गेल्या वर्षी 4916 झाडांची लागवड करण्यात आली होती. आज येथे सुमारे दोनशे झाडांची लागवड करण्यात आली. नैसर्गिक पुननिर्मीतीच्या आधारे लावण्यात आलेल्या या झाडांचे संवर्धन व देखभाल करण्यासाठी येथे भिमाबाई शेवाळे या महिला स्वयंसेवक मागील दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून वाघ, तरस व बिबटयांबाबतची माहिती वनविभागाचे नियतक्षेञ अधिकारी आर.आर. मोमीन यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ व ढोकसांगवी आणि निमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विद्यालयातील विद्याथ्र्यांच्या हस्ते नवीन दोनशे झाडांच्या लागवडीला सुरूवात करण्यात आली. लावण्यात आलेल्या झाडांमध्ये लिंब, पिंपळ, वावळा, करंजे, रेनट्री, शिसम व उंबर यांचा समावेश आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली ही झाडे येत्या दोन वर्षांत चांगली बहरल्यानंतर हा परिसर हिरवागार होणार असल्याचे मोमीन यांनी यावेळी सांगितले. यावेळी निमगावच्या उपसरपंच उषाताई रासकर, ढोकसांगवी शाळेचे मुख्याध्यापक एस.टी.फंड, विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.सी.सोनवणे, निमगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.भोस, सर्पमिञ सागर लष्करे, शौकत शेख यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.विद्याथ्र्यांच्या वनभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या