'माझी कुठेही तक्रार करा, काहीही फरक पडणार नाही'

गुनाट, ता. 31 जुलै 2015 (तेजस फडके)-कृषी पिकविम्याची मुदत संपत आली असून येथील सजा कार्यालयात तलाठी निवडणूकीचे काम असल्याचे कारण सांगून तलाठी उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे शासनाने कृषीपिक विम्याची मुदत आणखी वाढवावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.

शिरूर तालुक्याच्या पुर्व भागात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात मूग, बाजरी, तूर, कांदा आदी पिके जळण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी वर्गात मोठे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे शासनाचा कृषी पिक विम्याच्या माध्यमातून काहीतरी पदरात पडेल या आशेने शेतकरी विमा काढण्यासाठी मोठी धडपड करत आहेत. पिक पाहणी अहवाल आणि सातबारे मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु, तलाठी भाऊसाहेब गावात येतच नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे.

याबाबत तलाठी श्री. सानप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "मला निवडणुकीचे काम असून पिकविम्याचे काम हे कृषीखात्याचे असल्याचे उत्तर दिले." परंतु, जर शेतकऱ्यांना सातबारेच मिळाले नाही तर पिकविमा काढायचा कसा? असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. तलाठी सानप हे शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरत असून माझी कुठेही तक्रार करा, मला काहीही फरक पडणार नाही असे बोलत आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. सानप यांच्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी तसेच पिकवीम्याची मुदत आणखी वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या