धामारीत आजीला वाचविताना नातीचा गेला जीव

धामारी, ता. 19 सप्टेंबर 2015 (सुभाष शेटे)- पाण्यात पडलेल्या आजीला वाचविण्यासाठी तेरा वर्षांच्या नातीने प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ओढ्यातील पाण्यात पडून डफळपूर येथील चिमुकलीला जीव गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी (ता. 18) घडली. यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

डफळापूर येथील सरपंच वस्ती जवळून वाहणा-या ओढ्यात पुलावरुन वाहणा-या पाण्यातून रस्ता पार करताना पाण्याच्या लोंढ्याने पुलाच्या एका बाजूचा भराव वाहुन गेला आहे. त्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्याचा व ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने आजी त्या खड्ड्यात पडली. हे पाहुण आजीला वाचविण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाण्यात उडी घेतल्याने व ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने मुलीचा ओढ्यातील पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जवळच शेती कामासाठी आलेले नरहरी गायकवाड, माउली केंजळे, संभाजी गायकवाड व ग्रामस्थांनी पाण्यात वाहून चाललेल्या मुलीस वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण, त्या मुलीचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत आजी बचावल्यात आहेत.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष घटना स्थळी भेट दिल्यानंतर प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थ व मुलीची आजीकडून मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवारी सकाळी १०च्या दरम्यान डफळापूर येथील तनुजा दत्तात्रय डफळ (वय १३) ही विद्यार्थिनी आपली आजी भीमाबाई कोंडीबा डफळ (वय ६५) यांच्या समवेत धामारी येथील शाळेत जाण्यासाठी असलेल्या एकमेव कच्च्या रस्त्याने पायी निघाली होती. या परिसरात पहाटे पासूनच जोरदार पाऊस सुरु होता. ओढे, नाले भरून वहात होते. याच रस्त्यावर असणा-या सरपंच वस्ती नजीकच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलेले होते. शाळेत सायकल मिळण्यासाठीचा अर्ज भरुन द्यायचा असल्याने तनुजा सोबत आजी भीमाबाई याना घेवून निघाली होती. या ओढ्याला पुलावरुन पाणी वहात होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या एका बाजूचा भराव वाहून गेल्याने मोठा खड्डा पडलेला होता. पाण्यातून जात असताना आजी भीमाबाई त्या खड्ड्यातील पाण्यात पडल्या. हे पाहून तनुजाने आपल्या आजीला वाचविण्याच्या हेतूने पाण्यात उडी घेतली. पण ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तनुजा लांब पर्यत वाहून गेली. आरडा ओरडा झाल्याने जवळील शेतात असणारे नरहरी गायकवाड, माउली केंजळे, संभाजी गायकवाड व ग्रामस्थांनी पाण्यात वाहून चाललेल्या मुलीस वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे २०० फुट अंतरावर पळत जात त्या मुलीला ओढ्यातील पाण्यातून बाहेर काढले. पण त्या मुलीचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. आजी भिमाबाईना मात्र वाचविण्यात यश आले. या घटनेने डफळापूर,धामारी परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, डफळापूर ते धामारी या दरम्यान दळण वळणासाठी असणा-या या एकमेव रस्त्यावरील ओढ्यावर उंच पूल बनविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांची केली आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या