रांजणगावमध्ये करंजावणे रस्त्याला अतिक्रमणांचा विळखा

रांजणगाव गणपती, ता. 19 नोव्हेंबर 2015 (पोपट पाचंगे)- येथून करंजावणे या गावाकडे जाणारया रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमणांचा विळखा झाल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे ही अतिक्रमणे काढून टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रांजणगाव गणपती येथील पुणे-नगर रस्त्यालगत एसटी स्टँड जवळून भांबर्डे व करंजावणे गावाकडे जाणारया रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत चालली आहेत. दररोज सकाळी व सायंकाळी या रस्त्याने करंजावणे व भांबर्डे तसेच गावातील नागरिकांना जाताना पादचारयांना अक्षरश: जीव मुठीत धरून जावे लागते. वाहन चालविताना दोन्ही बाजूने अतिक्रमण व त्यात हा रस्ता अरूंद यामुळे वाहने तासनतास एकाच जागेवर उभी असतात. त्यातच दोन्ही बाजूने अस्ताव्यस्त लावलेली दुचाकी व चारचाकी वाहने यामुळे मोठया प्रमाणात वाहनांची कोंडी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या रस्त्यावर विविध बँका, मंगलमूर्ती विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, रांजणगाव सोसायटी कार्यालय, खाजगी दवाखाने व लोकवस्ती आहे. यामुळे या रस्त्यावर रहदारी मोठया प्रमाणात वाढली आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर रस्त्यापर्यंत पञ्याचे शेड उभे करून अतिक्रमण केल्याने व त्यानंतर अस्ताव्यस्त लावलेली वाहने यामुळे वाहतूकीत मोठया प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. रस्त्याच्या एका बाजूला हातगाडया व छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले आहेत. त्यामुळे ही सर्व अतिक्रमणे त्वरीत काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आपल्या दुकानांसमोर पञ्याचे शेड उभे करून केलेले अतिक्रमण व वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे या रस्त्यावर रोज मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सबंधीत विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरीत हटविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांनी केली आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या