मोरांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

रांजणगाव गणपती, ता. 19 नोव्हेंबर 2015 (पोपट पाचंगे)- आपल्या शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात होणारे नुकसान स्हन करूनही ऐन दुष्काळी परिस्थितीत मोरांना आपल्या स्वत:कडील असणारे धान्य टाकून व आर्थिक भुर्दंड सहन करून शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पर्यटन व्यवसायाला मोठया प्रमाणात चालना मिळाली असली तरी अद्यापपर्यंत तरी शासकिय पातळीवरून या मोरांना वाचविण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.

शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसार्इ, चिंचोली मोराची, सोनेसांगवी, गणेगाव खालसा, मलठण व वाघाळे या परिसरात गेल्या काही वर्षांपासुन मोठया प्रमाणात मोर व लांडोर वास्तव्य करीत आहेत. चिंचोलीत तर मोर जास्त प्रमाणात भटकंती करताना दिसून येत आहेत. चिंचोली, कान्हूर या सातत्याने दुष्काळीसदॄश भागात मोरांना पिण्याचे पाणी देण्याबरोबर धान्य देण्यासाठी या गावातील नागरिकांची मोठया प्रमाणात धांदल उडताना दिसते. शेतीवर अवलंबून असणारया शेतकरयांच्या घरीच मोर वास्तत्य करताना आढळून येत आहे.

शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान हे मोर करीत असले तरी देखील शेतकरी व ग्रामस्थ मोरांसाठी पाणी व धान्य उपलब्ध करून देत आहेत. शिरूर बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर हे गेल्या चार वर्षांपासून चिंचोलीतील मोरांसाठी सुमारे पंधरा ते वीस टन खाद्य तसेच येथील जय मल्हार कॄषी प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने गावातील मोरांसाठी मुबलक पाणी व धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून देखील या मोरांसाठी धान्य उपलब्ध करून दिले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, दरवर्षी पाणी व अन्न याच्या शोधार्थ या परिसरातील मोरांचे स्थलांतर होत असते. हे स्थलांतर टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने या मोरांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पुढे करण्यात आली आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या