शिक्रापुरातील आंदोलनाची पाचव्या दिवशी कीर्तनाने सांगता

शिक्रापूर, ता. 28 नोव्हेंबर 2015 (शेरखान शेख)- चासकमानचे पाणी उजनीस देण्याच्या निर्णयास विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाची शुक्रवारी (ता. 27) पाचव्या दिवशी कीर्तनाने सांगता झाली. शेतकरी आता तीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत.

सरकारने चासकमान चे पाणी उजनीला देण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पाच दिवस शांततेत चक्री उपोषण सुरु होते. यावेळी एकोणपन्नास गावांतील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. सर्व गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजन करत आंदोलन करत होते. यामध्ये अनेक महिलाही सहभागी झाल्या होत्या.

शुक्रवारी पाचव्या दिवशी सकाळ पासून सणसवाडी, भांबर्डे, कासारी येथील शेतकऱ्यांनी भजन करत निषेध केला. दुपारी  ह.भ.प. विनोदाचार्य महादेव महाराज शिंदे यांचे अन्यायावर कडाडून आसूड ओढणारे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कीर्तनाने आंदोलनाची सांगता करण्यात आली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चासकमानचा प्रश्न अधिवेशनात मांडणार- वळसे पाटील
शिक्रापूर,
ता. 27 नोव्हेंबर 2015
(शेरखान शेख)- चासकमानचे पाणी उजनीस देण्याच्या निर्णयास विरोध करण्यासाठी निषेध करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने चासकमान विभागीय कार्यालय येथे सुरु करण्यात आलेल्या चक्री उपोषणास भेट देऊन पाठींबा दर्शवत चासकमानचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

वळसे पाटील म्हणाले, 'पाणी देण्याचा निर्णय आमच्या विरोधात गेला, त्यामुळे न्यायालय व लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा पर्याय निवडावा लागला. तरी देखील सरकारला जाग आलेली नाही. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावा लागेल. याबबत पाठबंधारे मंत्री गिरीश महाजन, गृहमंत्री राम शिंदे यांचेशी चर्चा केली आहे. या ठिकाणी चासकमानच्या असलेल्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्यात. यांनतर देखील जर सरकारला जग आली नाहीच तर अन्यायाचा प्रतिकार केल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही. प्रत्येक वेळेस शेतकरी शांततेत आंदोलन करतील असे नाहीच तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईन.'

आंदोलन स्थळी चासकमानचे सहाय्यक अभियंता सौ. एस. जि. शहापुरे, शाखा अभियंता एस. एन. भुजबळ, शाखा अभियंता एस. बि. संतीकर उपविभागीय अभियंता यु. जि. मुंडे हे आले असता चार दिवसानंतर आलेल्या अधिकाऱ्यांवर आंदोलक शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार करत फैलावर धरले. या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी या ठिकाणच्या क्षेत्रातील कोणत्या तळ्या खाली किती क्षेत्र ओलिताखाली आहे हे या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारले असता त्यांना ते सांगता आले नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या व भावना वरिष्ठापर्यंत पोहचविणार असल्याचे यावेळी सहाय्यक अभियंता सौ. एस. जि. शहापुरे यांनी सांगितले. या ठिकाणी शिक्रापुरातील कल्पतरू महिला भजनी मंडळाने दिवसभर भजन करत उपोषण केले. शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शिक्रापुरातील चक्री उपोषणात शेतकऱ्यांसह महिलांचा पाठिंबा
शिक्रापूर,
ता. 26 नोव्हेंबर 2015
(शेरखान शेख)- उजनी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात शिरूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सुरू केलेल्या चक्री उपोषणात मंगळवारी परिसरातील 12 गावांतील शेतकरी व पक्ष कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांसह महिलांचा देखील वाढता पाठींबा मिळत आहे.

उपोषण सुरु असताना आज अनेक शेतकऱ्यांसह परिसरातील अनेक महिलांनी देखील पाठींबा दर्शविला आहे. आज या भागातील शेतकऱ्यांसह महिलांच्या वतीने चासकमान विभागीय कार्यालय शिक्रापूर येथे भजन करत निषेध केला. आंदोलनात आता महिला देखील आक्रमक झाल्या आहेत.
चासकमानचे पाणी सोडण्याच्या निषेधार्थ चक्री उपोषण
शिक्रापूर,
ता. 25 नोव्हेंबर 2015
(शेरखान शेख)- उजनी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, येथील चासकमान विभागीय कार्यालयाजवळ शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पाच दिवसाचे चक्री उपोषण सुरु करण्यात आले आहे.

उजनीत चासकमानचे पाणी सोडण्याच्या निर्णयानंतर येथील चासकमान विभागीय कार्यालयास टाळे ठोकण्यात आले होते. त्यानंतर येथील कार्यालयासमोर सदर निर्णय रद्द करण्यासाठी शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने व करंदी, पिंपळे, वाघाळे, कोंढापुरी, भांबर्डे, निमोणे, गुणाट, बुरुंजवाडी यांसह आदी दहा ते पंधरा गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने शासनाच्या निर्णयाचा निषेध करत सदर निर्णय रद्द करण्यासाठी चासकमानचे शिक्रापूर येथील विभागीय कार्यालय समोर भजन करत चक्री उपोषण सुरु करण्यात आले आहे. या चक्री उपोषणासाठी दररोज दोन ते तीन गावांतील शेतकरी या ठिकाणी शुक्रवार २७ नोहेंबर पर्यंत उपोषणास बसणार आहेत.

या निर्णयाची सुनावणी ३० नोहेंबर रोजी होणार असून तो पर्यंत हा निर्णय रद्द न केल्यास सिंचन भवन पुणे येथे अमरण उपोषण तर चासकमान धरण येथे आंदोलन सर्व लोकप्रतिनिधी व वरिष्ठ नेत्यांत्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. चक्री उपोषणासाठी विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्रापूरमध्ये चासकमानच्या कार्यालयास ठोकले टाळे
उजनीत पाणी सोडण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांनी केला निषेध

शिक्रापूर, ता. 20 नोव्हेंबर 2015 (शेरखान शेख)- शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उजनी धरणात दहा टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णय घेतल्यामुळे चासकमान प्रकल्पातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज (शुक्रवार) चासकमान विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकले.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने उजनी धरणात दहा टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयासाठी मंगळवारी (ता. 17) बैठक बोलावली होती. यावेळी निर्णय न झाल्याने शुक्रवारी (ता. 20) बैठक घेण्यात येणार होती. याबबाय चर्चा करून योग्य सुनावणी घेण्यात येणार होती. परंतु, त्या दिवशीची स्थगिती रद्द न करता लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अचानक पुन्हा उजनी जलाशयात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शिरूर तालुक्यातील सर्व संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत जिल्हा परिषद माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागचे चासकमान प्रकल्प विभागाच्या कार्यालयाकडे धाव घेतली. उजनी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाचा निषेध करत येथील कार्यालयांना टाळे ठोकले. तर हा निर्णय म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा खून असून, प्रकल्पावर आधारित शेतकऱ्यांचा विश्वासघात असल्याचे देखील यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी झालेला निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पाचुंदकर यांच्यासह शेतकरी संघटना शिरूर अध्यक्ष सुहास काटे, कोंढापुरीचे सरपंच आशिष गायकवाड, गणेगावचे रमेश तांबे, रांजणगावचे नवनाथ लांडे, पिंपरी दुमालाचे मोहन चिखले, खंडाळेचे राजेंद्र नरवडे, बुरुंजवाडीचे दत्तात्रय टेमगिरे, सागर गावडे, अमोल धरणे, अनिल कोल्हे, नरसिंग ढोकले, सुहास बांगर, विलास बांगर, संदीप तांबे, संतोष थोरात, बापू शिंदे, जावेद इनामदार यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, संचालक व आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निर्णय रद्द न केल्यास जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करू
चासकमानचे पाणी उजनी जलाशयात सोडण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. हा निर्णय त्वरित रद्द न केल्यास माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन सोमवारी चाकण आणि शिक्रापूर या ठिकाणी मोठे रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे शेखर पाचुंदकर यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या